तिलारीच्या फुटलेल्या कालव्याचे काम संथ गतीने

बार्देश आणि पर्वरी येथे पाण्याची समस्या जटील

म्हापसा, २८ जानेवारी (वार्ता.) – तिलारीच्या फुटलेल्या कालव्याचे काम संथ गतीने चालल्याने बार्देश तालुक्यासह पर्वरी येथे २८ जानेवारी या दिवशी म्हणजेच सलग चौथ्या दिवशी मर्यादित पाणीपुरवठा झाला. पर्वरी येथे पाण्याविना लोकांचे हाल झाले आहेत. पर्वरी येथे गृहिणी पाण्यासाठी वणवण फिरतांना दिसत आहेत. अनेकांनी ‘मिनरल वॉटर’च्या बाटल्यांवर त्यांची तहान भागवली आहे. पर्वरी येथील सरकारी पोलीस वसाहत आणि गृहनिर्माण वसाहत येथे नळ कोरडे पडले आहेत. लोकांना अंघोळ आणि स्वयंपाक यांसाठीही पाणी मिळालेले नाही. पाणीपुरवठ्यासंबंधी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकार्‍यांकडून योग्य उत्तरे मिळत नसून, हे अधिकारी वेळ मारून नेत आहेत. पाणी समस्या दूर करण्यासाठी सरकारला अपयश आल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे. २४ जानेवारी या दिवशी कुडासे-दोडामार्ग येथे तिलारीचा कालवा फुटला; मात्र आता ४ दिवस उलटूनही याचे दुरुस्तीकाम पूर्ण झालेले नाही.

टँकरवाल्यांनी दर वाढवून नागरिकांची लूट चालवल्याच्या तक्रारी

सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी टँकरने पाणी पुरवू शकलेले नाहीत, तसेच पर्वरीवासियांना पाण्यासाठी टँकरही मिळणे कठीण झाले आहे. पाण्याच्या कमतरतेमुळे टँकरवाल्यांनीही दर वाढवून लूट चालवल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. म्हापसा येथे काँग्रेसने पत्रकार परिषद घेऊन बार्देश तालुक्यातील पाणी समस्येवर आवाज उठवला आहे. सरकारची आपत्कालीन सिद्धता ढिसाळ असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.

दुरुस्तीकाम पूर्ण होण्यास आणखी ३ दिवस लागण्याची शक्यता

कुडासे येथे फुटलेला कालवा ६ मीटर नव्हे, तर १२ मीटरचा आहे. दुरुस्तीकाम युद्धपातळीवर चाललेले आहे आणि ते पूर्ण होण्यास आणखी ३ दिवस लागणार आहेत, अशी माहिती जलस्रोत खात्याचे मुख्य अभियंता बदामी यांनी दिली आहे. अस्नोडा प्रकल्पाला साळ येथील शापोरा नदीतून, तसेच आमठाणे धरणातून पाणी पंपिंग करून घेतले जात आहे. अस्नोडा येथून पर्वरी येथे केला जाणारा पाणीपुरवठा अपुरा पडत असल्याने पाणीटंचाईचा प्रश्न तीव्र झाला आहे.

आमठाणे धरणाचे दरवाजे उघडण्यासाठी नौदलाचे पथक धरणात दाखल

तिलारी धरणाचा फुटलेला कालवा आणि आमठाणे धरणाचे दरवाजे यांसंबंधी तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने बार्देश तालुक्यासह पर्वरी येथे पाणीपुरवठा होत नसल्याने २८ जानेवारी या दिवशी सकाळी नौदलाचे  पथक आमठाणे धरणावर दाखल झाले असून धरणाचे दरवाजे उघडण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. २८ जानेवारीला रात्रीपर्यंत आमठाणे धरणाचे दरवाजे खुले होण्याची शक्यता जलस्रोत खात्याचे मुख्य अभियंता प्रमोद बदामी यांनी व्यक्त केली.

संपादकीय भूमिका

असा भोंगळ कारभार आणि जनतेप्रतीची असंवेदनशीलता पहाता भारत महासत्ता बनण्याचे केवळ स्वप्नच राहिल्यास नवल नाही !