वणी (यवतमाळ) येथील कोलेरा-पिंपरी ग्रामस्थांचे खाण बंद आंदोलन !

कोळसा खाण अधिकार्‍यांच्या मनमानी कारभाराचा परिणाम !

वणी (यवतमाळ), २८ जानेवारी (वार्ता.) – येथील कोलेरा-पिंपरी गावातील कोळसा खाणीतील स्फोटांमुळे घरे पडणे, धुळीचे साम्राज्य, कृत्रिम जंगल निर्मितीमुळे हिंस्र पशूंची गावाजवळ वर्दळ, गावातील संपूर्ण भूमी अधिग्रहित न करणे आणि पुनर्वसन प्रक्रियेसाठी चालढकलपणा करणे अशा अनेक समस्यांमुळे आणि त्याची कुठलीही नोंद न घेतल्याने गावकर्‍यांनी ‘खाण बंद’ आंदोलन आरंभ केले आहे. जोपर्यंत गाव समस्यामुक्त होत नाही किंवा त्यांचे पुनर्वसन होत नाही, तोपर्यंत आंदोलन चालूच ठेवण्याचा निर्धार कोलेरा-पिंपरी ग्रामस्थांनी केला आहे. (ग्रामस्थांवर अशी वेळ येणे दुर्दैवी ! प्रशासन त्यांच्या समस्या सोडवत का नाही ? समस्या निर्माण करणार्‍या आणि त्या न सोडवणार्‍या कर्तव्यचुकार अधिकार्‍यांना शिक्षा होणे आवश्यक आहे. – संपादक)