कोकण रेल्वेने गोवा-प्रयागराज मार्गावर ‘महाकुंभ एक्सप्रेस’ ही विशेष रेल्वे सोडण्यासाठी दर्शवली सिद्धता

पणजी – गोवा सरकारचा गोवा-प्रयागराज या मार्गावर विशेष रेल्वेसेवा चालू करण्याचा प्रस्ताव आहे. कोकण रेल्वे प्रशासनाने गोवा-प्रयागराज मार्गावर विशेष रेल्वे सोडण्यासाठी सिद्धता दर्शवली आहे; मात्र तूर्तास या रेल्वेविषयी अजूनही सविस्तर माहिती उपलब्ध झालेली नाही. वरिष्ठ सरकारी अधिकारी माध्यमांशी बोलतांना म्हणाले, ‘‘महाकुंभात सहभागी होण्यासाठी इच्छुक असलेल्यांसाठी गोवा सरकार गोवा-प्रयागराज मार्गावर विशेष रेल्वे चालू करत आहे आणि ही सेवा विनामूल्य असेल किंवा तिकीट अल्पदरात उपलब्ध केले जाईल. या रेल्वेला ‘महाकुंभ एक्सप्रेस’ असे संबोधले जाणार आहे. ही रेल्वे गोव्याहून थेट प्रयागराज येथे थांबणार आहे आणि रेल्वेला मध्यात कुठेही थांबा नसेल. यामुळे रेल्वे प्रवासाचा वेळ घटणार आहे. कोकण रेल्वे महामंडळाने १७ ते १८ डबे असलेली ‘महाकुंभ एक्सप्रेस’ चालू करण्यासाठी रेल्वे मंडळाकडे अनुज्ञप्ती मागितली आहे. गोवा सरकार लोकांच्या मागणीनुसार अशा स्वरूपाच्या २ किंवा ३ रेल्वे चालू करण्याच्या विचारात आहे. ‘महाकुंभ एक्सप्रेस’मधून प्रवास करणार्‍यांना एकत्रितपणे गंगा नदीवर नेण्यात येणार आहे, तसेच पूर्ण प्रवास सर्वांना एकत्रितपणे करावा लागणार आहे. रेल्वेचे वेळापत्रक लवकरच घोषित केले जाणार आहे.’’