२९ जानेवारीला मौनी अमावास्येच्या निमित्ताने दुसरे आणि सर्वांत मोठे अमृत स्नान होणार !
प्रयागराज – २९ जानेवारी या दिवशी मौनी अमावास्येच्या निमित्ताने महाकुंभ येथे द्वितीय आणि सर्वांत मोठे अमृत स्नान होणार आहे. या वेळी १० कोटींहून अधिक भाविक येण्याची शक्यता आहे. सुविधा आणि सुरक्षेच्या दृष्टीने प्रयागराज प्रशासनाने विविध प्रकारची सिद्धता केली आहे. पोलीस-प्रशासनाने महाकुंभात सहभागी होणार्या भाविकांनी कुठल्याही प्रकारच्या अफवांना बळी न पडता सतर्क राहून पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे. सुरक्षा आणि सुविधा यांच्या दृष्टीने भाविकांना सूचना देण्यात आल्या आहेत.
पोलिसांकडून आवाहन
या महाकुंभपर्वानिमित्त पोलिसांनी भाविकांना काय करावे आणि काय करू नये ?, याविषयी सूचना दिल्या आहेत.
काय करावे ?
१. भाविक ज्या घाटावर पोहचतील त्याच घाटावर त्यांनी स्नान करावे.
२. प्लास्टिक ऐवजी पर्यावरणपूरक वस्तू वापराव्यात
३. आवश्यक त्याठिकाणी पोलिसांचे साहाय्य घ्या
४. पवित्र स्नान झाल्यानंतर घाट परिसरात न थांबता लगेच वाहन तळाकडे पोचावे
५. गर्दीचे नियोजन करण्यासाठी पोलिसांनी दिलेल्या सुचनांचे पालन करावे
६. आरोग्य बिघडल्यास डॉक्टरांचे साहाय्य घ्यावे.
काय करू नये ?
१. एकाच ठिकाणी किंवा रस्त्यावर गर्दी करू नये
२. कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये
३. सामाजिक माध्यमांवर येणार्या माहितीवर विश्वास ठेवू नये
४. बॅरिकेड्सच्या (अडथळ्यांच्या) जवळून आणि पांटून पुलावरून चालतांना गाईघडबड करू नये.