मुंबई – बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार होत आहेत. इस्कॉनचे मंदिर जाळण्यात आले. त्यांच्या प्रमुखांना अटक झाली, तरीही केंद्र सरकार गप्प आहे. हिंदूंवर अत्याचार होऊनही केंद्र सरकार गप्प आहे. समस्त हिंदूंकडून माझी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती आहे की, जसे एका दूरभाषवरून त्यांनी युक्रेनचे युद्ध थांबवले, तसे बांगलादेशातील हिंदूंवरील अन्यायाविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूमिका घ्यावी, असे आव्हान उद्धव बाळासाहेब पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी १३ डिसेंबर या दिवशी पत्रकार परिषदेत केले.
या वेळी उद्धव ठाकरे म्हणाले, ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मणीपूरचे अन्याय कळले नाहीत, तसेच त्यांना हिंदूंवरचे अत्याचार कळले नसतील. शेख हसीना भारतात सुरक्षित आहेत; मात्र बांगलादेशातील गोरगरीब हिंदूंचे काय ? हे नरेंद्र मोदी यांनी सांगितले पाहिजे. हिंदू म्हणजे केवळ मते नाहीत. भाजपचे हिंदुत्व केवळ मतांपुरते शिल्लक आहे का ?’’