आज ‘गीता जयंती’ आहे. त्या निमित्ताने…
‘ब्रह्मज्ञान जाणून घेण्यास अत्यंत कठीण आहे. त्यासाठी विशिष्ट प्रकारची मानसिक, बौद्धिक क्षमता असावी लागते. सर्वसामान्य लोकांना ब्रह्मज्ञान सहजासहजी जाणून घेता येत नाही’, हे लक्षात घेऊन गीतेने ‘भक्तीयोगा’चे माहात्म्य सांगून सर्वसामान्य मानवी समाजाला मोठा दिलासा दिला आहे. ईश्वरप्राप्ती करण्यासाठी भक्तीमार्ग अत्यंत सुलभ आहे. भगवान श्रीकृष्ण भगवद़्गीतेच्या ‘विभूतीयोग’ या १० व्या अध्यायात सांगतात…‘यज्ञानां जपयज्ञोऽस्मि’, म्हणजे ‘सर्व प्रकारच्या यज्ञांमध्ये जपयज्ञ मी आहे.’
ज्ञानाचा विचार केला, तर ज्ञानप्राप्तीसाठी बुद्धीवर अवलंबून रहावे लागणार आहे. सामान्य माणसांना तेजस्वी बुद्धी लाभलेली असतेच, असे नाही. त्यामुळे त्यांच्यासाठी ज्ञानमार्ग हा खडतर आणि अशक्य ठरतो.
१. कर्मयोग आणि भक्तीयोग यांतील भेद
कर्मयोगाचा विचार केला, तर कर्म करतांना कोणत्याही प्रकारची इच्छा बाळगायची नाही. केलेल्या कर्माच्या फळाकडे लक्ष ठेवून कर्म करायचे नाही, ही अट आहे, म्हणजेच कर्मफळाची अनासक्ती साधल्यावरच कर्मयोग साध्य करता येतो. सर्वसामान्य संसारी माणसाला अनेक गोष्टींची आवश्यकता असते. त्यामुळे सर्वसामान्य संसारी माणूस हा ईश्वराला विविध प्रकारच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी साकडे घालत असतो. त्यामुळे कर्ममार्गही सर्वसामान्य माणसाला सहज साध्य होणार नाही.
भक्तीमार्ग हा त्यामानाने सोपा आहे. जसजशी भगवंतावर आपली श्रद्धा वाढत जाते, त्या प्रमाणात अन्य गोष्टींविषयी निर्माण झालेली आसक्ती कमी कमी होत जाऊन भगवंतावरील आसक्ती वाढते. आसक्ती अन्य गोष्टींवर असेल, तर ती हानिकारक ठरते; पण भगवंताच्या ठिकाणी असलेली आसक्ती मात्र आपल्या मनात कर्म फळाविषयी अनासक्ती निर्माण करण्याएवढी समर्थ आणि सशक्त आहे.
२. भक्तीमार्गाविषयी आद्यशंकराचार्य आणि लोकमान्य टिळक यांचे उद़्गार
गीतेचा विचार केला, तर अर्जुनाचा मोह ज्ञानयोगाने गेला नाही; पण भक्तीयोग किंवा भक्तीमहिमा ऐकल्यावर गेला. अर्जुनाने तसे भगवंताला स्पष्ट शब्दांत सांगितले…
‘मदनुग्रहाय परमं गुह्यमध्यात्मसञ्ज्ञितम् ।
यत्त्वयोक्तं वचस्तेन मोहोऽयं विगतो मम ॥
– श्रीमद़्भगवद़्गीता, अध्याय ११, श्लोक १
अर्थ : अर्जुन म्हणाला, माझ्यावर कृपा करण्यासाठी आपण जो अत्यंत गुप्त अध्यात्मविषयक उपदेश मला केला, त्याने माझे हे अज्ञान नाहीसे झाले.’
आद्यशंकराचार्य हे ज्ञानमार्गी, तरीसुद्धा ते भक्तीप्रेमात रंगून जातात. भक्तीवर अधिकाधिक भर देतांना ते म्हणतात, ‘मोक्षाकारण सामग्र्यां भक्तिरेव गरीयसी ।’ (आशय : विविध मार्गांनी मोक्षप्राप्ती करता येते; पण मोक्षप्राप्तीसाठी भक्तीच श्रेष्ठ ठरते.)
याविषयी ‘गीतारहस्य’ ग्रंथात ‘भक्तीमार्ग’ या प्रकरणात लोकमान्य टिळक लिहितात…‘शाळीग्राम हा केवळ दगड मानून त्याला पूजले, तर पदरात काहीही पडणार नाही. तथापि शाळीग्रामाच्या ठिकाणी विष्णूचा भाव ठेवला आणि त्याची श्रद्धापूर्वक पूजा केली, तर पूजा करणारा भक्त हा विष्णुलोकाला जाईल. या शाळीग्रामाच्या ठिकाणी विष्णुऐवजी राक्षस, भूत असा जर भाव ठेवला आणि त्याची पूजा केली, तर त्याप्रमाणेच फळ पदरात पडणार आहे. म्हणून मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करतांना इष्टदेवतेची त्यात प्राणप्रतिष्ठा केली जाते. मूर्तीच्या ठिकाणी परमेश्वराची भावना न ठेवता मूर्ती म्हणजे केवळ काही विशिष्ट प्रकारच्या आकाराची माती, दगड, अथवा धातू समजून तिची पूजा कुणीही करत नाही.’
३. जगद़्गुरु संत तुकाराम महाराज आणि लोकमान्य टिळक यांच्या दृष्टीने भक्तीभाव
म्हणून गीतेत भगवान स्पष्ट शब्दांत सांगतात, ‘ये यथा मां प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहम् । (श्रीमद़्भगवद़्गीता, अध्याय ४, श्लोक ११)’ याचा अर्थ ‘जे भक्त मला जसे भजतात, मीही त्यांना तसेच भजतो’, असा आहे. गीतेतील हा सिद्धांत आपण नेमकेपणाने जाणून घेतला की, आपल्या लक्षात येईल, जगद़्गुरु संत तुकाराम महाराज सांगतात, त्याप्रमाणे ‘देव हा भावाचा भुकेला आहे, प्रतिकाचा नाही.’
लोकमान्य टिळक यावर भाष्य करतांना म्हणाले, ‘मी ज्याची उपासना करतो, तेच ईश्वराचे स्वरूप किंवा प्रतीक खरे असून इतर प्रतीके खोटी आहेत, हा दुराग्रह रहात नाही. कुणाचेही प्रतीक असो, त्याद्वारे परमेश्वराचे भजन करणारे एका परमेश्वरालाच पूजतात परिणामी उदारबुद्धी उत्पन्न होते.’
(क्रमशः उद्याच्या दैनिकात)
– श्री. दुर्गेश जयवंत परुळकर, हिंदुत्वनिष्ठ लेखक आणि व्याख्याते, डोंबिवली. (९.१२.२०२४)