पुणे : विंग कमांडर श्री. विनायक डावरे (निवृत्त) यांच्या हस्ते ‘शतपैलू सावरकर’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. ‘शतपैलू सावरकर’ या पुस्तकाचे लेखक कै. ह.त्र्यं. देसाई यांचे पुत्र श्री. भरत देसाई हे कार्यक्रमाला उपस्थित होते. या वेळी श्री. सूर्यकांत पाठक हेही उपस्थित होते. हा प्रकाशन सभारंभ पुणे येथील वेदशास्त्रोत्तेजक सभागृह, विजयनगर कॉलनी, सारसबाग येथे ८ डिसेंबर २०२४ या दिवशी सायं. ५.३० ते रात्री ८ या वेळेत पार पडला. पुणे येथील स्वा. सावरकरप्रेमी मंडळाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचा आरंभ दीपप्रज्वलन करून, शंखनादाने, तसेच श्री गणेशाचे स्तवन आणि श्रीरामाचे गीत गायन करून झाला. पुस्तकाचा परिचय आणि प्रकाशन यांची पार्श्वभूमी श्री. विद्याधरपंत नारगोलकर यांनी सांगितली. विंग कमांडर श्री. विनायक डावरे (निवृत्त) यांचा सत्कार श्री. सूर्यकांत पाठक यांनी केला.
स्वातंत्र्यवीर सावरकर हे भारतरत्नच ! – विंग कमांडर विनायक डावरे (निवृत्त)
स्वातंत्र्यवीर सावरकर केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर उर्वरित भारतातही लोकप्रिय होते. ‘हिंदुहृदयसम्राट’ ही पदवी सर्वप्रथम सावरकरांना देण्यात आली होती. उत्तर भारतात अनेक ठिकाणी त्यांचे स्मारक आहे. अनेक ठिकाणी त्यांची जयंतीही साजरी केली जाते. प्रसिद्ध अभिनेते राज कपूर यांनी त्यांच्या आत्मचरित्रात सावरकर यांच्या लोकप्रियतेचा उल्लेख केला होता. त्यांच्या लोकप्रियतेविषयीच्या अनेक आठवणी माझ्याकडे आहेत. त्यामुळे त्यांना वेगळा भारतरत्न देण्याची आवश्यकता नाही; कारण ते भारतरत्नच आहेत.
पुस्तक प्रकाशनानंतर विविध मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख मान्यवरांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले. शेवटी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. सूर्यकांत पाठक यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचा शेवट ‘वन्दे मातरम्’ म्हणून झाला.
सावरकर यांचे कार्य दीपस्तंभासारखे मार्गदर्शक असल्याचे वक्त्यांचे मत !
‘शतपैलू सावरकरांच्या काही पैलूंची पुस्तकामध्ये ओळख करून दिली आहे. सावरकरांचे विचार आणि कार्य आजही राष्ट्राला अन् वैयक्तिक जीवनात दीपस्तंभासारखे मार्गदर्शक आहेत. असे हे मौलिक विचार जनसामान्यांपर्यंत त्यातही विशेषकरून युवावर्गापर्यंत पोचणे अत्यंत आवश्यक आहे’, असे वक्त्यांकडून सांगण्यात आले.
या कार्यक्रमात सनातन संस्थेने गेल्या २५ वर्षांत केलेल्या उल्लेखनीय कार्याविषयी संस्थेचा सन्मान करण्यात आला. हा सन्मान सनातन संस्थेच्या वतीने प्रा. विठ्ठल जाधव यांनी स्वीकारला. शाल, श्रीफळ आणि समानचिन्ह देऊन त्यांना गौरवण्यात आले.