१८.२.२०२४ या दिवशी सनातन संस्थेचे १०१ वे संत पू. अनंत आठवले (पू. भाऊकाका) यांनी लिहिलेला ‘अध्यात्मशास्त्रातील विविध विषयांचा बोध’ हा लघुग्रंथ प्रकाशित झाला. या प्रकाशन सोहळ्यात पू. भाऊकाका यांनी व्यक्त केलेले मनोगत पुढे दिले आहे.
१. समर्थ रामदासस्वामी यांनी मनाच्या श्लोकातून स्वभावदोष निर्मूलनाची आवश्यकता विशद करणे आणि परात्पर गुरु डॉक्टरांनी साधकांकडून स्वभावदोष निर्मूलनाची प्रक्रिया राबवून घेणे
‘तुम्ही सनातनचे साधक पुष्कळ भाग्यवान आहात; कारण तुम्हाला समर्थ गुरु मिळाले आहेत. ते तुम्हाला केवळ भक्तीमार्ग नाही, तर स्वभावदोष निर्मूलनाची प्रक्रिया शिकवून प्रगतीपथावर नेत आहेत. ‘समर्थ’ या शब्दावरून समर्थ रामदासस्वामी यांचे स्मरण होते. त्यांनी मनाचे श्लोक लिहिले आहेत. ते एकूण २०५ श्लोक आहेत. समर्थ रामदासस्वामी आणि तुमचे परम गुरु (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) यांच्यात साम्य आहे. त्यामुळे या क्षणाला मला समर्थांचे स्मरण झाले.
२. रावणाच्या उदाहरणातून ‘केवळ भक्ती करून मुक्ती मिळत नाही’, हे सिद्ध होत असणे, मुक्तीसाठी जनी निंद्य असलेल्या गोष्टींचा त्याग आणि वंद्य गोष्टींचे अनुसरण करावे लागणे
मनाच्या श्लोकांमध्ये पहिल्या श्लोकात श्री गणपति आणि श्री सरस्वती यांना नमन केल्यावर दुसर्या श्लोकात उपदेश करतांना समर्थ रामदासस्वामी म्हणतात,
‘मना सज्जना भक्तिपंथेची जावे ।
तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावें ॥
जनीं निंद्य ते सर्व सोडूनी द्यावे ।
जनीं वंद्य ते सर्व भावे करावे ॥’ – मनाचे श्लोक २
या श्लोकाच्या पूर्वार्धात समर्थ रामदासस्वामी यांनी सांगितले आहे की, भक्ती केल्याने श्रीहरीची (म्हणजे भगवंताची) प्राप्ती होईल ! मग उत्तरार्धात त्यांनी ‘जनी निंद्य आणि जनी वंद्य’ असे दोन भाग का सांगितले ?’, याचे कारण ‘केवळ भक्ती करून मुक्ती मिळणार नाही’, तर त्यासाठी जनी निंद्य, म्हणजे जे जे अनुचित आहे, त्याचा त्याग करावा लागेल आणि जे जे वंदनीय आहे, त्याचे आचरण करावे लागेल. तेव्हाच खर्या अर्थाने भक्ती सफल होईल. येथे रावणाचे उदाहरण लक्षात घेता येईल. रावण फार मोठा भक्त होता. त्याला ईश्वराकडून अनेक वरदाने मिळालेली होती, तरीही त्याचा उद्धार झाला नाही. त्याला मुक्ती मिळाली नाही. त्यामुळेच समर्थांनी या श्लोकात पुढच्या भागात भक्तीच्या जोडीला स्वभावदोष निर्मूलनाची आवश्यकता विशद केली आहे.
३. समर्थ रामदासस्वामी यांनी भक्तीसोबत चित्तशुद्धीची आवश्यकता सांगणे आणि परात्पर गुरु डॉक्टरही भक्तीसोबत साधकांची चित्तशुद्धी करून घेत असणे
पुढच्या श्लोकात समर्थ रामदासस्वामी सांगतात,
‘प्रभाते मनीं राम चिंतीत जावा ।
पुढे वैखरी राम आधी वदावा ॥
सदाचार हा थोर सांडू नये तो ।
जनीं तोचि तो मानवी धन्य होतो ॥’ – मनाचे श्लोक ३
‘सकाळी उठून श्रीरामाचे स्मरण करावे, नामजप करावा’, हे ठीक आहे; परंतु समर्थ पुढे सांगतात, ‘सदाचार, म्हणजे चांगले आचरण कधीही सोडू नये.’ भक्तीसोबतच त्यांनी चित्तशुद्धीही जोडली आहे. तुमचेही समर्थ गुरु (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) भक्तीसोबत चित्तशुद्धी करायला सांगत आहेत. केवळ सांगतच नाहीत, तर ती करवूनही घेत आहेत, ही सर्वांत महत्त्वाची आणि आदर्श गोष्ट आहे.
आपल्या समर्थ गुरूंना माझा नमस्कार !
– पू. अनंत बाळाजी आठवले (सनातन संस्थेचे १०१ वे संत आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे ज्येष्ठ बंधू, वय ८९ वर्षे), फोंडा, गोवा. (१८.२.२०२४)