हरमल (गोवा) येथे स्थानिक युवकाची हत्या झालेला ‘शॅक’ पाडण्याचा आदेश !

पर्यटन खात्याची एकाची हत्या झाल्यावर अवैध शॅकवर कारवाई !

प्रतिकात्मक छायाचित्र

(‘शॅक’ म्हणजे समुद्रकिनार्‍यावर खाद्यपदार्थ आणि मद्य पुरवणारे ठिकाण)

पणजी, २९ जानेवारी (वार्ता.) – हरमल किनार्‍यावर अमर बांदेकर या युवकाची शॅकच्या कर्मचार्‍यांनी केलेल्या आक्रमणात हत्या झाल्यानंतर संबंधित ‘शॅक’ मूळ मालकाने भाड्याने परप्रांतियाला चालवायला दिल्याचे उघड झाले आहे. यासाठी पर्यटन खात्याने संबंधित ‘शॅक’ची अनुज्ञप्ती रहित केली आहे आणि ‘शॅक’चा मूळ मालक मान्युअल फर्नांडिस याला २५ लाख रुपये दंड ठोठावण्यासमवेतच त्याने भरलेली अनामत रक्कम जप्त केली आहे. त्याचप्रमाणे पुढील ७ दिवसांत संबंधित ‘शॅक’ पाडण्याचा आदेश दिला आहे. पर्यटन खात्याने ‘शॅक’चे मालक मान्युअल फर्नांडिस याला काळ्या सूचीत टाकले आहे. भविष्यात मान्युअल फर्नांडिस याला कोणत्याही ‘शॅक’ वाटप प्रक्रियेत सहभागी होण्यापासून प्रतिबंधित करण्यात आले आहे.

हरमल किनार्‍यावरील संबंधित ‘शॅक’ क्रमांक ४ हा मूळ मालक मान्युअल

फर्नांडिस यांनी ‘शॅक’ धोरणाचे कलम २० चे उल्लंघन करून भाड्याने दिला आहे, अशी माहिती मांद्रे पोलिसांनी २७ जानेवारी या दिवशी पर्यटन खात्याला सादर केलेल्या अहवालात दिली आहे. पर्यटन खात्याने या पार्श्‍वभूमीवर ‘शॅक’ धोरणाचे उल्लंघन करणार्‍यांच्या विरोधात कठोर कारवाई आरंभली आहे. प्राप्त माहितीनुसार हरमल येथे अनेक गोमंतकियांनी त्यांच्या नावावर ‘शॅक’ घेऊन ते हिमाचल प्रदेश किंवा अन्य राज्यांतील लोकांना भाड्याने दिलेले आहेत. हरमल येथील घटनेनंतर विरोधी पक्षांनी यावर आवाज उठवला आहे.

‘शॅक’ उपकंत्राट देऊन भाड्याने दिल्याचे आढळल्यास कठोर कारवाई होणार ! – रोहन खंवटे, पर्यटनमंत्री

पर्यटनमंत्री रोहन खंवटे म्हणाले, ‘‘शॅक’चे उपकंत्राट परप्रांतीय व्यक्तीला दिल्याचे आढळल्यास ते खपवून घेणार नाही. ‘शॅक’चे धोरण हे ‘शॅक’ व्यावसायिकांशी चर्चा करूनच सिद्ध केले होते. ‘शॅक’ व्यवसाय हा गोमंतकियांकडेच रहावा हा मूळ हेतू आहे; मात्र काही ‘शॅक’ व्यावसायिक त्यांचे उपकंत्राट देत असल्याचे आढळून आले आहे. त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार आहे.’’

संपादकीय भूमिका

प्रत्येक शॅक वैधरित्या उभारण्यात आला आहे का ? कुणी अतिक्रमण केले आहे का ? तो नियमांनुसार चालत आहे का ? हे आधीच पाहिले असते, तर स्थानिक युवकाची हत्या झाली नसती. त्यामुळे स्थानिकाच्या हत्येला प्रशासनालाच उत्तरदायी का धरू नये ?