जुन्नर (जिल्हा पुणे), २९ जानेवारी (वार्ता.) – श्री गणेश जयंतीचे औचित्य साधून श्री विघ्नहर गणपति देवस्थान ट्रस्ट, श्री क्षेत्र ओझर यांच्या वतीने ३० जानेवारी ते ६ फेब्रुवारी या कालावधीत अखंड हरिनाम सप्ताह आणि कीर्तन सुवर्ण महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रतिदिन सायंकाळी ६ ते ७ या वेळेत हरिपाठ होणार असून सायं. ७ ते रात्री ९ या वेळेत नामांकित कीर्तनकारांचे कीर्तन होईल. १ फेब्रुवारीला म्हणजे श्री गणेशजयंतीच्या दिवशी सकाळी १० ते दुपारी १२ श्री गणेश जन्मकाळाचे कीर्तन, दुपारी १२.४५ वाजता जन्मकाळ आणि पुष्पवृष्टी होईल. या वेळी मोरया गोसावी यांनी लिहिलेली पदे गाण्यात येतील. याच कालावधीत सकाळी ११ ते दुपारी २ पर्यंत द्वारयात्रा, तसेच रात्री १२ ते १ या वेळेत छबिना आणि श्रींची पालखी मिरवणूक होईल.
नैमित्तिक कार्यक्रमात प्रतिदिन पहाटे ४ ते सकाळी ७ वाजता काकडा, सकाळी ७.३० ते ८ श्रींची आरती, सकाळी ८ ते ९ श्री गणेश पुराण पारायण, तसेच दिवसभरात अन्य कार्यक्रमांसमवेत रात्री ११ ते पहाटेपर्यंत हरिजागर होईल. कीर्तनकारांमध्ये ह.भ.प. नेहाताई अर्जुन महाराज साळेकर भोसले, ह.भ.प. भावर्त महाराज देखणे, ह.भ.प. पुरुषोत्तमदादा पाटील, ह.भ.प. चैतन्य महाराज राऊत, ह.भ.प. जयेश महाराज भाग्यवंत आदी कीर्तनकार त्यांच्या रसाळ वाणीने कीर्तन सादर करणार आहेत. सदर कार्यक्रमास जुन्नर, शिरूर, पारनेर, संगमनेर अकोला, श्रीगोंदा, बारामती आदी ठिकाणांहून गायक, वादक आणि वारकरी उपस्थित रहाणार आहेत. तरी या सर्व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन अध्यक्ष श्री. बाळकृष्ण कवडे, विश्वस्त आणि श्री विघ्नहर गणपति देवस्थान ट्रस्ट यांनी केले आहे.