सातारा, २९ जानेवारी (वार्ता.) – पाटण तालुक्यातील बीबी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थिनी कु. हर्षदा जाधव हिला प्रजासत्ताकदिनी ‘राष्ट्रपती शौर्य’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नवी देहली येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित सोहळ्यामध्ये देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते तिला ‘राष्ट्रपती शौर्य’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. १० सहस्र रुपये रोख, शौर्य पुरस्कार प्रमाणपत्र आणि पदक असे पुरस्काराचे स्वरूप होते. कु. हर्षदावर विविध स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
सशस्त्र दलातील अधिकार्यांच्या शौर्य आणि बलीदान यांच्या कार्याचा सन्मान करण्यासाठी, तसेच शूरवीरांच्या प्रेरक जीवनकथा विद्यार्थ्यामध्ये रुजवण्यासाठी सरकारकडून ‘वीर गाथा प्रकल्प’ आयोजित केला जातो. ‘वीरगाथा ४.०’ या प्रकल्पात राष्ट्रीय स्तरावर लाखो विद्यार्थी सहभाग घेतात. देशभरातून त्यातील १०० सर्वोत्तम विद्यार्थ्यांची निवड करण्यात येते. यामध्ये महाराष्ट्र राज्यातील २०, तर सातारा जिल्ह्यातील ४ विद्यार्थी निवडण्यात आले होते. यामध्ये कु. हर्षदा हिचा समावेश होता.