मोबोर, केळशी समुद्रकिनार्‍यावर ५ भटक्या कुत्र्यांचे विदेशी पर्यटक महिलेवर आक्रमण

समुद्रकिनार्‍यावरील पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर !

मडगाव, २९ जानेवारी (वार्ता.) – मोबोर, केळशी येथील समुद्रकिनार्‍यावर एका विदेशी महिला पर्यटकावर ५ भटक्या कुत्र्यांनी आक्रमण करण्याची घटना नुकतीच घडली आहे. महिलेच्या अंगावर एकूण १५ ठिकाणी कुत्र्यांनी चावे घेतले. या वेळी महिलेच्या हाताचे हाडही मोडले. या घटनेमुळे समुद्रकिनार्‍याला भेट देणारे पर्यटक आणि अन्य नागरिक यांच्या भटक्या कुत्र्यांपासूनच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

समुद्रकिनार्‍यावरून ही विदेशी महिला चालत जात असतांना कुत्र्यांनी आक्रमण केले. सुरक्षेसाठी महिलेने पाण्यात धाव घेतली, तरीही कुत्रे तिचा चावा घेत राहिले. यानंतर महिला पर्यटक पाण्यात पडली. यानंतर पर्यटक महिलेने तिच्या भ्रमणभाषवरून तिच्या मैत्रिणीला साहाय्यासाठीचा संदेश पाठवला; मात्र तोपर्यंत जवळच्या जलक्रीडा व्यवसायातील कर्मचारी आणि जवळच्या उपाहारगृहातील रक्षक यांनी महिलेला साहाय्य केले. या वेळी महिला पर्यटकाने समुद्रकिनार्‍यावर चालणे सुरक्षित नसल्याची तक्रार केली. मोबोर, केळशी येथील समुद्रकिनार्‍यावर यापूर्वी पर्यटक अथवा अन्य नागरिक यांना कुत्र्यांनी चावे घेण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. यावर उपाययोजना म्हणून स्थानिक पंचायतीने तेथील एका तारांकित हॉटेलच्या साहाय्याने कुत्र्यांसाठी ‘शेल्टर’ (आसरागृह) निर्माण केले आहे; मात्र यामुळे समस्या सुटलेली नाही.