बांधकाम जुने झाल्याने तिलारी धरणाचे कालवे ढासळत आहेत ! – प्रशासनाचे स्पष्टीकरण

नूतनीकरणाच्या कामास मान्यता मिळताच कालव्याच्या कामाला प्रारंभ करणार

सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का.) – घोटगे, तालुका दोडामार्ग येथे तिलारी धरणाचा उजव्या कालव्याचा काही भाग (जलसेतूचा स्पॅन) २१ जानेवारी या दिवशी रात्री १० वाजता कोसळल्याचे निदर्शनास आले. या जलसेतूचे दगडी बांधकाम ३० ते ३५ वर्षांपूर्वी करण्यात आलेले आहे. त्यामुळे जलसेतूच्या वरील बाजूच्या दगडी भागाचे बांधकाम कमकुवत झाले आहे. त्यातील काही भाग ढासळला आहे. गतवर्षी कालव्याचा काही भाग ढासळल्याने निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये केलेले काम निकृष्ट दर्जाचे होते, असे म्हणण्यात तथ्य नाही, असे स्पष्टीकरण तिलारी धरणाच्या ढासळणार्‍या कालव्यांविषयी माहिती कार्यालयाकडून देण्यात आले आहे. कालव्याची कामे ३० ते ३५ वर्षांपूर्वी झालेली असल्याने मोरीच्या (मातीचा भराव करून पाईप टाकून पाणी जाण्यासाठी छोट्या पुलासारखी केलेली व्यवस्था) ठिकाणचे पाईप बर्‍याच ठिकाणी कमकुवत झालेले आहेत. वर्ष २०२४ मध्ये ३ वेळा कालव्यामध्ये गळती झाली होती. त्यामुळे तातडीने दुरुस्ती करून पाणीपुरवठा सुरळीत करण्यात आला होता. हे काम सुस्थितीत आहे आणि त्याचा दर्जाही चांगला आहे. २४ जानेवारीला तिलारी डावा (तीर) कालव्याच्या सेवापथावरील मोरीतील एक पाईप फुटल्यामुळे त्यावरील भराव खाली खचला आणि कालव्यातील पाणी त्यातून आल्याने भराव वाहून गेला. त्यामुळे कालव्यातील पाणी आजूबाजूच्या शेतामध्ये, तसेच मणेरी-कुडासे रस्त्यावर पसरले होते.

केर येथे नाल्याच्या पहिल्या टप्प्यातील आपत्कालीन काम दत्ताराम टोपले यांनी केलेले आहे. आपत्कालीन व्यवस्थापनाच्या दृष्टीने त्यांना पाचारण करावे लागते. कालवा फुटल्याच्या दोन्ही घटना पूर्वी कालव्याचे काम केलेल्या ठिकाणापासून जवळच्या भागात घडल्याने ‘कालव्याचे काम करूनही तो पुन्हा फुटला’, असा जनतेमध्ये गैरसमज निर्माण झाला. प्रत्यक्षात कार्यक्षेत्रावर कालव्याच्या दुर्घटनेच्या ठिकाणी सर्व संबंधित शेतकर्‍यांना याविषयीची सर्व वस्तूस्थिती समजावून सांगितली
आहे. तथापि कालवा पुन्हा कोसळला, तेव्हा सर्वच जण संतप्त असल्याने आणि नंतरच्या वाटाघाटीच्या वेळी पत्रकार अन् इतर लोकप्रतिनिधी उपस्थित नसल्याने गैरसमज निर्माण झाले. तिलारी कालवे जुने झाले आहेत. कालव्याची चिरामाती ही पाणी धरून ठेवण्यासाठी सक्षम नाही. त्यातून पाणी पाझरून अशा घटना घडतात. सर्व कालव्यांचे नूतनीकरण करण्याचा प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी पाठवला आहे. त्यास मान्यता मिळून आणि त्याची निविदा प्रक्रिया झाल्यावर गोवा राज्याने त्याच्या भागातून गेलेल्या कालव्याचे जे तंत्र वापरून काम केले आहे, त्या पद्धतीने या कालव्यांचे काम करण्यात येणार आहे. कालव्याच्या कामांविषयी काहीही शंका मनात असल्यास विभागाचे कार्यकारी अभियंता किंवा उपअभियंता यांच्याशी संपर्क साधावा. याविषयी तात्काळ घटनास्थळी जाऊन अधिकारी आणि कर्मचारी यांना कालवा दुरुस्तीविषयी
योग्य ते मार्गदर्शन करण्यात आले आहे, तसेच उपस्थित शेतकरी अन् ग्रामस्थ यांना कालवा फुटल्याची कारणे स्पष्ट केली आहेत. पालकमंत्री नितेश राणे यांची भेट घेऊन त्यांनाही सर्व परिस्थिती समजावून सांगितली आहे. तरी जनतेने मनात कोणतेही गैरसमज बाळगू नयेत, असे आवाहन करण्यात आले आहे.