‘महाकुंभ’ला जाणार्‍या बस आणि रेल्वेगाड्यांत ओसंडून गर्दी !

पुणे – उत्तरप्रदेशातील प्रयागराज येथे महाकुंभमेळ्यासाठी देशभरातून मोठ्या संख्येने भाविक जात आहेत. त्यांच्यासाठी रेल्वेकडून नियमित गाड्यांव्यतिरिक्त अतिरिक्त विशेष रेल्वेगाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. उत्तरप्रदेशातील प्रयागराज येथे १४४ वर्षांतून एकदा येणार्‍या कुंभमेळ्यात स्नान करण्यासाठी पुण्यासह देशभरातून जाणार्‍या नागरिकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे बस आणि रेल्वेगाड्या प्रवाश्यांनी भरलेल्या आहेत. आता तिकीट काढणार्‍यांना तिकीट उपलब्ध नाहीत. यामुळे अतिरिक्त रेल्वेगाड्यांची संख्या वाढवण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.

पुणे येथून प्रवासी ३०० ते ४०० खासगी ट्रॅव्हल्स बस आरक्षित करून प्रयागराजला जाण्यासाठी निघाले आहेत. पुढील महिन्यात विविध तारखांना त्या जाणार असल्याचे खासगी वाहतूक संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी सांगितले. रेल्वेच्या पुणे विभागाकडून दानापूर (उत्तरप्रदेश) रेल्वेगाडी प्रतिदिन प्रयागराजसाठी सोडण्यात येत आहे. या व्यतिरिक्त ४ साप्ताहिक विशेष गाड्या प्रयागराजसाठी जात आहेत. या गाड्यांव्यतिरिक्त ६ कुंभमेळा विशेष रेल्वेगाड्या रेल्वेच्या पुणे विभागाने सोडल्या आहेत. पुणे विभागातून ४९ सहस्र ३६३ प्रवाशांचा उत्तरप्रदेशसाठी प्रवास झाला आहे.