‘शरीर, मन, चित्त आणि बुद्धी’ आणि ‘शरीर, मन, बुद्धी आणि चित्त’, असे वेगवेगळे क्रम असण्यामागील शास्त्र

श्री. निषाद देशमुख

१. शरीर, मन, चित्त आणि बुद्धी हा क्रम देहाच्या कार्यरततेचे प्रतीक असणे

‘आत्म्यावर असलेले सर्वांत मोठे आवरण अहंचे असते. अहंच्या आवरणाला शक्ती देणारे शरीर, मन, चित्त आणि बुद्धी हे असतात. इथे मन म्हणजे बाह्य मन, तर चित्त म्हणजे अंतर्मन. बाह्यमनाला विचारांचा पुरवठा करणारा स्रोत अंतर्मन हा असतो. त्यामुळे व्यक्तीचे स्थूल आणि सूक्ष्म या दोन्ही देहांची कार्यरतता दाखवण्यासाठी शरीर, मन, चित्त अन् बुद्धी या क्रमाचा वापर केला जातो.

ज्या वेळी साधनेमुळे जिवाकडे ईश्वरी शक्ती जात असते, त्या वेळी ती अनुक्रमे शरीर, मन, चित्त आणि बुद्धी यांना भेदून जाते. या भेदनाच्या प्रक्रियेमुळे जिवाचा अहं तात्कालिक अल्प होतो आणि त्यामुळे आत्म्याला आध्यात्मिक अनुभूती होते.

२. मनोलय झाल्यावर चित्त ‘त्रिशंकू’ स्थितीत असणे

ज्या वेळी मनोलय होतो, त्या वेळी बाह्यमनाच्या समवेत अंतर्मनावर, म्हणजे चित्तावर असलेल्या चांगल्या आणि वाईट दोन्ही संस्कारांचाही काही प्रमाणात लय होतो. या प्रक्रियेत मंद आणि मध्यम स्वरूपातील संस्कार पूर्णपणे नष्ट होतात, तर तीव्र अन् मूलभूत स्वरूपातील संस्कारांची तीव्रता मंद होते. मनोलयापूर्वी चित्तात चांगले आणि वाईट असे दोन्ही संस्कार असतात, तर मनोलय झाल्यानंतर निर्विचार स्थिती, मूळ स्वरूपाचे चांगले अन् वाईट संस्कार अशी ‘त्रिशंकू’ स्थिती निर्माण होते. साधकाने मनोलयानंतर योग्य उपासना केली, तर त्याच्या निर्विचार स्थितीत वाढ होऊन चित्तावर असलेल्या मूलभूत चांगल्या आणि वाईट संस्कारांचा हळूहळू लय होत जातो. यालाच ‘चित्तलय’, असे म्हणतात.

मनोलयानंतर उपासकाने चित्तातील मूळ संस्कारांना खतपाणी मिळेल, अशा प्रकारे वागणे चालू ठेवल्यास त्याची आध्यात्मिक अधोगती होते.

३. आध्यात्मिक उन्नती होतांना अनुक्रमे मन, बुद्धी, चित्त आणि अहं यांचा लय होण्यामागील कारण

मनोलय झाल्यानंतर चित्ताचे कार्यही अल्प झाल्यामुळे अहंला शक्ती पुरवणारा मुख्य स्रोत बुद्धी ठरते. त्यामुळे ‘ईश्वर, गुरु आणि देवता शिष्याकडून त्याचा बुद्धीलय व्हावा’, यासाठीची साधना करून घेतात. त्यामुळे आध्यात्मिक उन्नती होतांना अनुक्रमे मन, बुद्धी, चित्त आणि अहं यांचा लय होतो. यासाठी शरीर, मन, बुद्धी आणि चित्त हा क्रम आध्यात्मिक उन्नतीच्या प्रक्रियेचा दर्शक ठरतो.’ (क्रमशः)

– श्री. निषाद देशमुख (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान) (३.७.२०२३, दुपारी ३.५५ ते ४.२२)

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.

सूक्ष्म-जगत् : जे स्थूल पंचज्ञानेंद्रियांना (नाक, जीभ, डोळे, त्वचा आणि कान यांना) कळत नाही; परंतु ज्याच्या अस्तित्वाचे ज्ञान साधना करणार्‍याला होते, त्याला ‘सूक्ष्म-जगत्’ असे संबोधतात.

सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.