आईच्या प्रियकराकडून मुलीवर अत्याचार !
आई-मुलीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना !
मुंबई – सांताक्रूझ येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी पोलिसांनी पीडित मुलीची आई आणि तिचा प्रियकर यांच्या विरोधात गुन्हा नोंद केला. पीडित मुलीच्या आईच्या प्रियकराने तिच्यावर अत्याचार केला आणि आईने हा प्रकार कुणालाही न सांगण्याविषयी धमकावले होते. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवला आहे.
९ बांगलादेशी नागरिकांना अटक !
विरार – पोलिसांनी बेकायदा वास्तव्य करणार्या ९ बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे. यात ७ महिला आणि २ पुरुष यांचा समावेश आहे. बांगलादेशातून नदी पार करून हे आरोपी भारतात आले होते. त्यांच्याकडे कोणतीही कागदपत्रे आढळली नाहीत. ते गेल्या अनेक वर्षांपासून नालासोपारा येथे रहात होते. त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
संपादकीय भूमिका: अशांना बांगलादेशातच हाकलून द्यायला हवे !
२ महिन्यांत ‘रॅपिडो’सारखी दुचाकी चालू होणार !
मुंबई – परिवहन विभागाने ओला, उबेरप्रमाणे मुंबईत ‘बाईक टॅक्सी’ला अनुमती दिली असून येत्या २ महिन्यांत ‘रॅपिडो’सारख्या दुचाकी चालू होणार आहेत. वाहतुकीच्या खोळंब्यात अडकून न रहाता मुंबईकरांचा प्रवास जलद आणि स्वस्तात होईल. महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने चालकाच्या मागे मधोमध विभाजक (पार्टिशन) लावणे बंधनकारक असेल. या टॅक्सीमध्ये प्रती कि.मी. ३ रुपये इतके भाडे आकारले जाते.
२९ जानेवारीच्या मध्यरात्री मध्यरेल्वेचा ‘ब्लॉक’ !
१, २ आणि ३ फेब्रुवारीलाही ‘ब्लॉक’
मुंबई – मध्य रेल्वेवरील कर्नाक पुलाच्या कामानिमित्त १, २ आणि ३ फेब्रुवारी या दिवशी मोठ्या ‘ब्लॉक’चे नियोजन आहे. २९ जानेवारीच्या मध्यरात्री १२.३० ते ३.३० या काळात सी.एस्.एम्.टी., मशीद बंदर या स्थानकांदरम्यान आपत्कालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबईकरांनी रेल्वेचे वेळापत्रक पाहून प्रवासाचे नियोजन करण्याविषयी सांगण्यात आले आहे.
नवी मुंबईत रस्ते अपघातांत वाढ !
नवी मुंबई – नवी मुंबईतील रस्ते अपघातांमध्ये वर्षभरात २८७ जणांचा मृत्यू झाला असून २९७ जण घायाळ झाले आहेत. मागील वर्षी २४३ जणांचा अपघाती मृत्यू झाला, तर २४६ जण घायाळ झाले आहेत.
सैफ अली खान प्रकरणातील आरोपीला न्यायालयीन कोठडी
![](https://static.sanatanprabhat.org/wp-content/uploads/sites/3/2025/01/29221312/Saif-Ali-Khan-case-320.jpg)
मुंबई – अभिनेता सैफ अली खान यांच्यावरील आक्रमण प्रकरणातील आरोपी महंमद शहजाद याला वांद्रे येथील न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.