दैवी सत्संगात ६८ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. प्रार्थना महेश पाठक (वय १३ वर्षे) हिने सांगितलेला भावजागृतीचा प्रयोग !

‘एकदा मी दैवी सत्संगात सांगितले, ‘‘आपण एक भावजागृतीचा प्रयोग करणार आहोत. आपण परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यासाठी सूप बनवणार आहोत. गुरुदेवांनी ही सेवा आपल्याला दिलेली आहे. ही सेवा अनुभवण्यासाठी आता आपण आपले डोळे बंद करूया आणि भावाची स्थिती अनुभवण्याचा प्रयत्न करूया.’’

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. सत्संगातील सर्वांनी रामनाथी आश्रमाच्या, म्हणजेच भूवैकुंठाच्या अन्नपूर्णा कक्षात प्रवेश केला आहे. स्वयंपाकघरात जाऊन आपण सूप बनवण्याची सिद्धता करत आहोत. आपले सर्व अवयव आनंदी झालेले आहेत. हात म्हणत आहेत, ‘माझे किती मोठे भाग्य आहे ! गुरुदेवांनी मला त्यांच्या सेवेची संधी दिली आहे.’ डोळे गुरुदर्शनासाठी इतके व्याकुळ झाले आहेत की, त्यांना शब्दच सुचत नाहीत. ‘मी कधी एकदा गुरुचरणी जाणार आणि कधी मी गुरुदेवांचे रूप पहाणार’, असे त्यांना झालेले आहे.

कु. प्रार्थना महेश पाठक

२. आपण सूप बनवण्यासाठी एक पातेले घेतले आहे. ते म्हणत आहे, ‘या सूप बनवण्याच्या प्रक्रियेत मला पुष्कळ उष्णता सहन करावी लागेल; परंतु मी ‘गुरुचरणी अर्पण होणार’, याचा मला आनंद आहे.’ चमचाही म्हणत आहे, ‘मला या सुपाचा जोरात चटका बसेल; पण मी गुरुदेवांचे रूप पाहू शकेन.’ पातेले आणि चमचा यांचा कृतज्ञताभाव पाहून माझीही भावजागृती होत आहे.

३. आता सूप बनवण्यासाठी भाज्या घेत आहोत. आपण टोमॅटो, गाजर आदी एकत्र केले आहे. टोमॅटो म्हणत आहेत, ‘सूप बनवतांना मी चिरला जाईन. माझे पूर्णपणे पाणी होईल; पण मला गुरुदेवांच्या मुखात जाता येईल. मला त्यांचे दर्शन होणार. मी किती भाग्यवान आहे !’ सर्व भाज्या अत्यंत आनंदी झाल्या आहेत. त्या गुरुचरणी जाण्यासाठी अगदी व्याकुळ झाल्या आहेत.

४. आता भाज्या चिरण्यासाठी एक विळी घेतली आहे. ती विळी आपल्याला म्हणत आहे, ‘मी धारदार असून सर्व भाज्यांना चिरणार असले, तरी मला ही सेवा करण्याची संधी मिळाली आहे. आपले गुरुदेव किती कृपाळू आहेत !  कोटीशः कृतज्ञता !’ तिचा सुपाप्रती असलेला भाव पाहून माझाही कृतज्ञताभाव जागृत झालेला आहे.

५. एकेक भाजी हातात घेऊन आपण चिरत आहोत. आता या चिरलेल्या भाज्यांचे आपण सूप बनवायला घेतले आहे.

६. आपण शेगडी जवळ आलेलो आहोत. त्यातील इंधन म्हणत आहे, ‘मी आता पूर्णपणे गुरुचरणी जाणार. माझे अस्तित्वच रहाणार नाही. मला किती आनंद होईल !’ इंधनाचा तो भाव पाहून आम्हाला शिकायला मिळत आहे.

७. आपण भांडे शेगडीवर ठेवले आहे. त्यामध्ये टाकण्यासाठी आपण मीठाची बरणी उघडली आहे. मीठ म्हणत आहे, ‘मी जरी खारट असलो, तरी मी गुरुदेवांना आवडतो. कृतज्ञता !’ असे म्हणत ते सुपामध्ये मिसळते.

८. आपण सूप चमच्याने ढवळत आहोत. ते हळूहळू सूप सिद्ध झाले आहे. आपण एका वाटीमध्ये सूप काढले आणि त्यात चमचा ठेवला आहे.

९. आपले सर्व अवयव गुरुदेवांना भेटण्यासाठी व्याकुळ झाले आहेत. त्यांना ‘कधी एकदा गुरुदर्शन होणार, कधी एकदा गुरुचरणी जाणार’, अशी त्यांची स्थिती झाली आहे.

१०. सूप घेऊन आपण परात्पर गुरुदेवांच्या खोलीच्या दिशेने जात आहोत. हळूहळू आपण गुरुदेवांच्या खोलीजवळ पोचलो. आपण खोलीचे दार उघडले. समोर साक्षात् प.पू. गुरुदेव आपल्याला दिसत आहेत. आपण गुरुदेवांना सूप देत आहोत. परम पूज्य आपल्याकडे बघून मधुर मधुर असे हास्य करत आहेत. आपण सूप त्यांच्या पटलावर ठेवले आहे.

११. गुरुदेव आनंदाने ते सूप चमच्याने पित आहेत. ते किती मोहक दिसत आहेत ! आपण त्यांना विचारत आहोत, ‘गुरुदेवा ! काही अल्प-अधिक तर झाले नाही ना ?’ गुरुदेव स्मितहास्य करून सांगत आहेत, ‘खूपच छान झाले आहे !’ आपण त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करत आहोत. ‘गुरुदेवा, तुम्हीच आमच्याकडून हे करवून घेतले. आमचे यात काहीच नाही.’

१२. परम पूज्य म्हणत आहेत, ‘‘मीठही योग्य प्रमाणात घातले आहे. किती छान लागत आहे.’’ मीठ म्हणाले, ‘गुरुदेवा, मी खारट असलो, तरीही तुम्ही मला तुमच्या चरणांशी घेतले. ‘किती कृतज्ञता व्यक्त करावी’, हे मला कळतच नाही.’ गुरुदेव त्याच्याकडे कृपाळू दृष्टीने पहात आहेत. सर्व भाज्याही आनंदी झाल्या आहेत. आपले डोळे आनंदाश्रू आणि भावाश्रू यांनी दाटून आले आहेत. आपल्या डोळ्यांना प्रत्यक्ष गुरुदेवांचे दर्शन होत आहे. हातही गुरुसेवा करत आहेत. सगळ्यांना खूप कृतज्ञता वाटत आहे.

१३. सर्वांचा भाव आपण गुरुदेवांना सांगत आहोत. गुरुदेवांना फार आनंद होत आहे. त्यांनी आपल्याला सांगितले, ‘भाज्या, मीठ, पातेले, चमचे आणि अवयव यांच्याकडून तुम्ही शिका आणि त्याप्रमाणे प्रयत्न करण्यासाठी आरंभ करा.’ आम्हीही त्यांना प्रार्थना करत आहोत, ‘तुम्हीच आमच्याकडून हे करवून घ्या. आम्हाला काही येत नाही.’

१४. सर्व भाज्या, इंधन, चमचा, पातेले आणि अवयव कृतज्ञता व्यक्त करत आहेत. आम्हीही गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करत आहोत. कोटीशः कृतज्ञता !’

गुरुदेवांचे आनंदी फूल,

कु. प्रार्थना महेश पाठक (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के, वय १३ वर्षे), (२०.३.२०२२), पुणे.