कोरी पाने नसलेली पाठ्यपुस्तके विद्यार्थ्यांना मिळणार !

शालेय शिक्षण विभागाचा निर्णय !

मुंबई – शालेय शिक्षण विभागाने पाठ्यपुस्तकांमध्ये आडव्या रेषा असलेली वह्यांप्रमाणे काही कोरी पाने जोडण्याचा निर्णय घेतला होता; मात्र तो रहित करण्यात आला आहे. येत्या शैक्षणिक वर्षात इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना कोर्‍या पानांविना पाठ्यपुस्तके उपलब्ध करून दिली जातील. वर्ष २०२५-२६ या शैक्षणिक वर्षापासून याची कार्यवाही करण्यात येणार आहे.

१. शालेय शिक्षण विभागाने ८ मार्च २०२३ या दिवशी आदेश काढला होता की, पाठ्यपुस्तकांमध्ये एक धडा संपला की, त्याच्या पुढील बाजूला वहीचे कोरे पान जोडण्यात येईल, म्हणजे धड्याच्या संदर्भातील महत्त्वाच्या नोंदी विद्यार्थ्यांना तेथे करता येतील, हा त्यामागचा हेतू होता.

२. गेल्या दोन वर्षांपासून ही योजना प्रायोगिक तत्त्वावर राबवण्यात येत होती; पण कोर्‍या पानांचा वापर लिखाणासाठी होत नसल्याने पाठ्यपुस्तकांत पालट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.