सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास आवश्यक सर्व सुविधा तातडीने उपलब्ध करून द्या ! – हसन मुश्रीफ, वैद्यकीय शिक्षण मंत्री

  • पालकमंत्री नितेश राणे यांच्या पाठपुराव्याला यश

  • प्राध्यापकांची ६ महिन्यांत भरती

  • नव्या इमारतींची कामे तातडीने मार्गी लावावीत

वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ

मुंबई – सिंधुदुर्ग जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा, यंत्रसामुग्री आणि मनुष्यबळ तातडीने उपलब्ध करून द्या. महाविद्यालयाच्या नव्या इमारतींची कामे तातडीने मार्गी लावावीत. महाविद्यालयातील प्राध्यापकांची रिक्त पदे ६ महिन्यांत भरवीत, तसेच या वैद्यकीय महाविद्यालयातून उपचारासाठी गोवा येथे रुग्ण पाठवण्याची पद्धत त्वरित बंद करावी, असे आदेश वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले आहेत.

सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रश्नांविषयी आढावा बैठक घेण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांनी पाठपुरावा केला होता. त्यानंतर मंत्री मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीत त्यांनी उपरोक्त आदेश दिले. बैठकीस मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे, माजी शालेय शिक्षणमंत्री आणि आमदार दीपक केसरकर, आमदार नीलेश राणे, वैद्यकीय शिक्षण आयुक्त राजीव निवतकर यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
या वेळी मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले की, जेथे अधिक पदे आहेत, तेथील प्राध्यापकांना सिंधुदुर्गमध्ये सेवा देण्याची व्यवस्था करावी. नर्सिंग महाविद्यालयाच्या वसतीगृहाची इमारत पाडण्यास आरोग्य विभागाने अनुमती द्यावी. नर्सिंगच्या विद्यार्थ्यांची तात्पुरती रहाण्याची व्यवस्था करण्यासाठी भाडेतत्त्वावर जागा घ्यावी. विभागाच्या अधिकार्‍यांनी या महाविद्यालयास प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थिती जाणून घ्यावी आणि करावयाच्या सुधारणा अन् पुरवायच्या सोयी यांची माहिती द्यावी.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी अधिकची १३ एकर भूमी देण्याचा प्रस्ताव आहे. त्यापैकी कौशल्य विकास विभागाकडील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची ३ एकर भूमी देण्यास मान्यता देण्यात आली. सामाजिक वनीकरण विभागाकडील १० एकर भूमीसाठी पाठपुरावा करावा आणि मंत्रीमंडळासमोर लवकरात लवकर प्रस्ताव सादर करावा, अशी सूचना मंत्री राणे यांनी केली.

सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता म्हणून डॉ. अनंत डवंगे यांची नियुक्ती

सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता पदाचा अतिरिक्त कार्यभार याच महाविद्यालयातील शल्यचिकित्सा शास्त्राचे प्रा. (डॉ.) अनंत डवंगे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. या महाविद्यालयाचे शरीररचनाशास्त्रचे प्रा. (डॉ.) मनोज जोशी यांच्याकडे यापूर्वी अधिष्ठाता पदाचा अतिरिक्त कार्यभार होता. तो प्रशासकीय कारणास्तव त्यांच्याकडून काढून घेण्यात आला आहे. शासनाचे उपसचिव शंकर जाधव यांनी याविषयीचा शासन आदेश काढला आहे.