आखाड्यांपूर्वी शंकराचार्यांनीही केले अमृतस्नान, श्रद्धाळूंना संयम बाळगण्याचे आवाहन !
प्रयागराज, २९ जानेवारी (वार्ता.) – प्रयागराज महाकुंभाचे दुसरे अमृतस्नान पूर्ण झाले. अमृतस्नानाच्या वेळी घडलेल्या चेंगराचेंगरीनंतर आखाड्यांनी संवेदनशीलता दाखवत प्रथम श्रद्धाळूंना स्नान करण्याची संधी दिली आणि त्यानंतर सांकेतिक स्वरूपात अमृत स्नान करून परंपरेचे पालन केले. महाकुंभामध्ये घडलेल्या घटनेनंतर आखाड्यांच्या संत-महंतांनी संवेदनशीलता दाखवली. साधू-संत, नागा संन्यासी आणि आखाड्यांनी त्यांच्या ऐतिहासिक पहिल्या स्नानाची प्रतिज्ञा मोडली. परिस्थिती पाहून आखाड्यांनी त्यांचे ब्रह्ममुहूर्तावर होणारे अमृत स्नानही स्थगित केले आणि श्रद्धाळूंना प्रथम स्नान करण्याची संधी दिली, हे कुंभक्षेत्री प्रथमच घडले आहे.
प्रयागराज महाकुंभमधील दुसर्या अमृतस्नानात देशातील ३ पीठांचे शंकराचार्य त्रिवेणी संगमात स्नानासाठी आले. त्यांनी श्रद्धाळूंना संयम ठेवण्याचे आवाहन केले. शृंगेरी शारदा पीठाधीश्वर जगद्गुरु शंकराचार्य स्वामी विधुशेखर भारती, द्वारका शारदा पीठाधीश्वर जगद्गुरु शंकराचार्य स्वामी सदानंद सरस्वती आणि ज्योतिर्मठ पीठाधीश्वर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी पुण्यस्नान केले. तिन्ही पीठांचे शंकराचार्य मोटारबोटने त्रिवेणी संगमापर्यंत पोचले, जिथे त्यांनी संपूर्ण धार्मिक विधींनुसार पुण्यस्नान केले आणि देशवासियांच्या कल्याणासाठी आशीर्वाद दिला.