कोयना नदीपात्र स्वच्छ न केल्यास रस्त्यावरची लढाई चालू होईल !

काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांची चेतावणी !

काँग्रेसचे पृथ्वीराज पाटील

सांगली, ७ डिसेंबर (वार्ता.) – गेली ४ दशके आम्ही शेरीनाल्याचे नाटक पहात आहोत. अजून किती वर्षे तेच ते गुर्‍हाळ चालवणार ? हे ढोंग थांबवा. नाल्यावरील पंप चालू करा. कोयनेतून २ सहस्र १०० क्यूसेक्स पाणी सोडा आणि नदीपात्र स्वच्छ करा. अन्यथा २ दिवसांत रस्त्यावरची लढाई चालू होईल, अशी चेतावणी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी दिली. (अशी चेतावणी का द्यावी लागते ? प्रशासनाला लक्षात येत नाही का ? – संपादक)

शेरीनाल्याचे पाणी कृष्णा नदीत मिसळत असल्याच्या प्रकाराविषयी त्यांनी महापालिका आयुक्त शुभम गुप्ता आणि पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटोळे यांच्याशी चर्चा केली. काँग्रेस पदाधिकार्‍यांनी शेरीनाल्याची पहाणी केली. सांगली येथे साथीचे आजार पसरले, तर महापालिका उत्तरदायी असेल, अशी पाटील यांनी चेतावणी दिली.

ते म्हणाले की, गेल्या ४ दशकांपासून शेरीनाल्याचा विषय सोडवता आला नाही, हे लाजिरवाणे आहे. राज्यात नवीन सरकार स्थापन होत असतांना सांगलीकरांना शेरीनाल्याचे पाणी प्यावे लागत आहे, हेही दुर्दैवी आहे. नाल्याचे पाणी नदीत मिसळायचे थांबवावे. त्यासाठी सगळी यंत्रणा युद्ध पातळीवर वापरा, असे मी आयुक्त शुभम गुप्ता यांना आवाहन केले आहे.