‘डीप स्टेट’ (टीप) हे स्वतःला हवे ते घडवण्यासाठी खर्या-खोट्याचा कुठलाही विधीनिषेध न बाळगता कशी कारस्थाने करते, याचे प्रात्यक्षिक सध्या बांगलादेशात बघायला मिळत आहे. तिथे महंमद युनूस सरकारने अचानक बांगलादेशातील ‘इस्कॉन’चे प्रमुख आणि साधक यांच्यावर कारवाईस प्रारंभ केला आहे.
(टीप : ‘डीप स्टेट’ म्हणजे सरकारी अधिकारी आणि खासगी संस्था यांचे गुप्त जाळे. या व्यवस्थेद्वारे सरकारी धोरणे खासगी संस्थांना अनुकूल बनवली जातात.)
१. हिंदूंसह मुसलमानांना साहाय्य करणार्या ‘इस्कॉन’वर होणारे आरोप
‘इस्कॉनच्या मंदिरांमध्ये शस्त्रांचा साठा केला जातो’, ‘ते देशविरोधी कारवायांमध्ये सहभागी असतात’, असे आरोप करून ‘इस्कॉन’ला ‘आतंकवादी संघटना’ घोषित करण्याच्या हालचाली चालू झाल्या आहेत. ‘इस्कॉन’शी संबंध आलेली कुणीही व्यक्ती हेच सांगेल की, ती एक धार्मिक आणि सेवाभावी संघटना आहे, जिच्या आध्यात्मिक कार्याकडे आकर्षित होऊन जगभरातील लाखो लोक तिच्याशी जोडले गेले आहेत. आतंकवाद आणि हिंसा यांचा इस्कॉनशी दुरान्वयानेही संबंध नाही. प्रत्यक्ष बांगलादेशातही नैसर्गिक संकटाच्या वेळी ‘इस्कॉन’ने हिंदु, मुसलमान अशा सगळ्यांना नेहमीच साहाय्य केले आहे.
कुठल्याही साध्या किरकोळ गुन्ह्यांशीही ज्यांचा संबंध आजवर जोडला गेला नाही, त्या ‘इस्कॉन’वर थेट आतंकवादी संघटना असल्याचे आरोप अचानक कसे होऊ लागले ? असे आरोप होताच बांगलादेश सरकारने अचानक इतक्या विद्युत्वेगाने कारवाई कशी चालू केली ? त्याविषयी अचानक सगळीकडे चर्चा कशी चालू झाली ?
२. अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेच्या संचालिका तुलसी गॅबर्ड यांची नियुक्ती रहित होण्यासाठी ‘इस्कॉन’वर कारवाई करण्याचा प्रयत्न
याचे उत्तर दडले आहे, अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या सरकारमध्ये ‘डायरेक्टर ऑफ नॅशनल सिक्युरिटी’ (राष्ट्रीय गुप्तचर यंत्रणेच्या संचालिका) म्हणून तुलसी गॅबर्ड यांच्या केलेल्या निवडीत. तुलसी गॅबर्ड या हिंदु आहेत आणि त्यांचे कुटुंब ‘इस्कॉन’शी जोडले गेलेले आहे. ‘इस्कॉन’च्या सत्संगात त्या ‘हरे राम हरे कृष्ण’चा जप करत असल्याचे अनेक व्हिडिओ उपलब्ध आहेत. ‘इस्कॉन’ ही आतंकवादी संघटना असल्याचे घोषित झाले, तर अशा संघटनेशी जोडल्या गेलेल्या तुलसी गॅबर्ड यांना सुरक्षेचे उत्तरदायित्व देणे अशक्य होईल’, या हेतूने हा सगळा बनाव अचानक उभा केला जात आहे. ट्रम्प देशाचा कारभार हाती घेतील, तेव्हा त्यांना काम करणे अशक्य व्हावे, असे निर्णय अत्यंत खुनशीपणे वा सूडबुद्धीने आताचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचे सरकार ‘डीप स्टेट’च्या इशार्यावर घेत आहे. अमेरिकेच्या लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे रशियावर डागण्याची अनुमती युक्रेनला देणे हा असाच एक निर्णय. तुलसी गॅबर्ड यांचे पंख कापणे, हा निर्णयही याच पठडीतील !
३. ‘इस्कॉन’सारख्यांना आतंकवादी ठरवणे, हे ‘डीप स्टेट’चे षड्यंत्र !
महंमद युनूस हे ‘डीप स्टेट’च्या हातातील बाहुले असल्यामुळे ते प्रामाणिकपणे त्यांना दिलेले हुकूम पाळत आहेत. ‘खर्या आतंकवाद्यांना गोंजारायचे आणि प्रेम, शांती, अहिंसा यांची शिकवण देणार्या ‘इस्कॉन’सारख्यांना आतंकवादी ठरवायचे’, असे खेळ बिनदिक्कतपणे खेळणे, हा ‘डीप स्टेट’चा नेहमीचा उद्योग आहे. याविषयी कुणी बोलले, तर ‘कॉन्स्पिरसी थिअरी’ (षड्यंत्राचा सिद्धांत) म्हणून त्याची वाट लावण्याची सोय आहेच !
– श्री. अभिजित जोग, प्रसिद्ध लेखक, पुणे. (३.१२.२०२४)
भारतीय नागरिकांनी ‘डीप स्टेट’ आणि साम्यवादी विचार यांच्या अपप्रवृत्तींपासून सतत सतर्क रहाणे आवश्यक आहे आणि हीच यापासून वाचायची गुरुकिल्ली आहे. त्यासाठी बुद्धीपूर्वक, श्रद्धेने स्वमंत्र, स्वयंत्र, स्वतंत्र आणि स्वविद्या प्रकट करणे अन् ते आचरणात आणणे, हाच सनातन धर्माचा आदेश आहे. – श्री. प्रवीण दीक्षित, निवृत्त पोलीस महासंचालक, मुंबई. |