पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीरसिंह बादल यांनी सुवर्ण मंदिरात चालू केली शिक्षेची अंमलबजावणी

श्री अकाल तख्तकडून देण्यात आली आहे शिक्षा

सुखबीरसिंह बादल

अमृतसर (पंजाब) – पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री आणि शिरोमणी अकाली दल पक्षाचे अध्यक्ष सुखबीरसिंह बादल यांनी ३ डिसेंबर या दिवसापासून येथील सुवर्ण मंदिरात उष्टी भांडी धुण्याला प्रारंभ केला. शिखांची धार्मिक संस्था श्री अकाल तख्त साहिबने  बादल यांना ही शिक्षा दिली आहे. बादल उपमुख्यमंत्री असतांना त्यांनी डेरा सच्चा सौदाचे प्रमुख राम रहीम यांना क्षमा करून त्यांच्यावरील खटला मागे घेतल्याच्या प्रकरणी ही शिक्षा करण्यात आली. राम रहीम यांना २ विद्यार्थिनींवर बलात्कार केल्याच्या प्रकरणी २० वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

१. बादल यांना शौचालये स्वच्छ करण्याचीही शिक्षा सुनावण्यात आली; मात्र त्यांच्या पायाला दुखापत झालेली असल्याने ही शिक्षा नंतर रहित करण्यात आली. ते व्हिलचेअरवर बसून कृती करणार आहेत.

२. एकूण ८ दिवस बादल येथे विविध सेवा करत शिक्षा भोगणार आहेत. यात मंदिरात येणार्‍या भाविकांच्या चपलांची स्वच्छता करण्याची शिक्षाही अंतर्भूत आहे. या काळात त्यांच्या गळ्यात एक पाटीही असणार आहे. यावर गुरु ग्रंथ साहिबमधील चुकीच्या कर्मांविषयी संदर्भ असणार्‍या ओळी लिहिल्या आहेत.

३. शिरोमणी अकाली दल सरकारच्या काळात इतर मंत्रीमंडळ सदस्यांना धार्मिक गैरवर्तनाच्या आरोपाखाली शिक्षा सुनावण्यात आली. या प्रकरणात, ३० ऑगस्ट २०२४ या दिवशी सुखबीरसिंह बादल यांना श्री अकाल तख्तने ‘तनखैय्या’ (धार्मिक गैरवर्तनासाठी दोषी) घोषित केले होते.