सनातन आश्रम (रामनाथी, फोंडा), गोवा : परशुरामभूमी गोमंतकातील सनातनच्या आश्रमात अयोध्येतील श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष प.पू. स्वामी गोविंददेव गिरि यांचे भावपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले. ३० नोव्हेंबरच्या दुपारी त्यांनी सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली.
या मंगलप्रसंगी पू. पृथ्वीराज हजारे यांनी प.पू. स्वामीजी यांचा सनातन आश्रमाकडून सन्मान केला. या मंगलप्रसंगी सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ, ‘सनातन प्रभात’ प्रसारमाध्यमाचे माजी समूह संपादक पू. पृथ्वीराज हजारे, सनातन संस्थेचे व्यवस्थापकीय विश्वस्त श्री. वीरेंद्र मराठे, सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस आणि आश्रमातील संत, तसेच साधक उपस्थित होते.
आश्रमातील आगमनाच्या वेळी सनातनचे ६६ टक्के आध्यात्मिक पातळीचे साधक श्री. विनायक आगवेकर यांनी प.पू. स्वामी गोविंददेव गिरि यांना कुंकुमतिलक केले, तर ६४ टक्के आध्यात्मिक पातळीच्या साधिका सौ. मंजिरी विनायक आगवेकर यांनी औक्षण केले. प.पू. स्वामीजी यांच्या आगमनाने आश्रमातील वातावरण भावमय झाले होते. सनातनचे साधक श्री. अभिषेक पै यांनी प.पू. स्वामीजी यांना सनातनच्या आश्रमात चालणारे राष्ट्र, धर्म, संगीत, कला, आध्यात्मिक संशोधन आदी विविधांगी कार्याची, तसेच स्वभावदोष निमूर्लन प्रक्रिया आणि आश्रम परिसरातील मंदिरांची माहिती दिली. या प्रसंगी सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस हेही उपस्थित होते. याआधी मार्च २०१४ मध्ये प.पू. स्वामीजी यांचे चरण आश्रमाला लागले होते.
१. आश्रम पहातांना कलेशी संबंधित माहिती जाणून घेतांना प.पू. स्वामीजी यांनी, ‘तुमची कला ईश्वरचरणी समर्पित झाली, तर ती धन्य झाली’, असे उद्गार काढले, तर सूक्ष्म जगताविषयीचे प्रदर्शन जिज्ञासेने जाणून घेतले.
२. आश्रमातील अन्नपूर्णा कक्ष (स्वयंपाकघर) येथील अन्नपूर्णादेवीची मूर्ती पाहून त्यांनी वाराणसी (उत्तरप्रदेश) येथील अन्नपूर्णादेवी मंदिराच्या दर्शनप्रसंगाची आठवण काढली.
३. भोजनकक्षातील फलकावर साधक स्वत:हून त्यांच्याकडून झालेल्या चुका लिहितात, हे कळाल्यावर प.पू. स्वामीजी यांना पुष्कळ कौतुक वाटले.
४. महर्षींच्या आज्ञेने आश्रम परिसरात स्थापन करण्यात आलेले श्रीराम शाळीग्राम आणि आश्रमातील श्रीकृष्णाच्या रथाची प्रतिकृती पाहून प.पू. स्वामीजी यांना विशेष आनंद झाला.
५. मुंबई येथील भारताचार्य धर्मभूषण पू. प्रा. सु.ग. शेवडे यांनी आश्रमात प.पू. स्वामीजी यांची भेट घेऊन हिंदु धर्माच्या सद्य:स्थितीविषयी चर्चा केली.
प.पू. स्वामी गोविंददेव गिरि आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांची मंगल भेट !आश्रमात प.पू. स्वामी गोविंददेव गिरि आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांची मंगल भेट झाली. या वेळी संतद्वयींमध्ये अध्यात्माविषयी चर्चा झाली. या प्रसंगी प.पू. स्वामीजी यांनी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा माळ आणि वस्त्र देऊन अत्यंत आदराने सन्मान केला. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची प्राणशक्ती अल्प असतांनाही त्यांच्या प.पू. स्वामीजी यांच्यावरील विशेष प्रीतीमुळे त्यांची भेट घेतली. |
‘सनातन प्रभात’ वाचून मलाही प्रेरणा मिळते ! – प.पू. स्वामी गोविंददेव गिरिआश्रमातील ‘सनातन प्रभात’च्या मुख्य कार्यालयालाही प.पू. स्वामी गोविंददेव गिरि यांनी भेट दिली. त्यांना सनातन प्रभातच्या कार्याची माहिती देण्यात आली. ‘सनातन प्रभात’ वाचून मलाही प्रेरणा मिळते. तुम्ही चांगले कार्य करत आहात’, असे कौतुकोद्गार या वेळी त्यांनी काढले. या मंगलप्रसंगी ‘सनातन प्रभात’ प्रसारमाध्यमाचे समूह संपादक श्री. योगेश जलतारे यांनी प.पू. स्वामीजी यांना ‘सनातन प्रभात’चे श्रीरामलल्ला प्राणप्रतिष्ठापनेनिमित्त जानेवारी २०२४ मध्ये प्रकाशित केलेले विशेषांक भेट दिले. |