आज महाराष्ट्र विधानसभेसाठी मतदान होत आहे. गेल्या काही आठवड्यांत निवडणूक प्रचाराच्या कालावधीत राजकीय पक्षांनी कुरघोडी करत एकमेकांवर अश्लाघ्य टीका केली. नेहमीप्रमाणे लोकशाहीला वेशीवर टांगण्यात आले. समाजाला जाती-पातींत विभागून स्वत:चे राजकीय इप्सित साध्य करण्यासाठी महाविकास आघाडीने चालवलेला समाजद्रोही प्रयत्न लांच्छनास्पद ठरला. हिंदूंच्या जातीनिहाय जनगणनेच्या पुरस्कारापासून ‘बटेंगे तो कटेंगे’ या उद़्घोषाला होत असलेला विरोध निषेधार्ह होताच, शिवाय ब्रिटिशांच्या १९ व्या शतकातील नीच प्रयत्नांची ‘री’ ओढणाराही होता. वर्ष १८७०-७२ मध्ये ब्रिटिशांनी केलेल्या भारतीय जनतेच्या जनगणनेत हिंदूंच्या अस्तित्वात नसलेल्या जातींची निर्मिती करत त्यांच्यात फूट पाडण्याचा कुठाराघात केला. त्यानंतर माकप, शेकाप यांसारख्या वैचारिक प्रदूषण पसरवणार्या पक्षांनी त्याला खदखदत ठेवले. आता शेकापचे दिवंगत नेते एन्.डी. पाटील यांच्या पत्नीचेच उदाहरण पहा. त्यांनी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक आणि आजचे हिंदुहृदयसम्राट पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांच्यावर अश्लाघ्य टीका केली आहे. कोल्हापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गटाचे) उमेदवार समरजित घाटगे यांच्या प्रचाराच्या वेळी सरोज पाटील म्हणाल्या, ‘‘सगळा जातीद्वेष पसरवला जात आहे. तुमची मुले त्या संभाजी भिडेच्या नादाला लागली आहेत का बघा ? त्या गटार गंगेत आपल्या मुलांना जाऊ देऊ नका !’’ या वेळी त्यांनी महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार हसन मुश्रीफ यांच्या बंडखोरीवरूनही त्यांच्यावर टीका केली. पाटील यांचे पू. गुरुजींविषयीचे वक्तव्य तळपायाची आग मस्तकाला भिडवणारे आहे. ज्या भिडेगुरुजींनी शेकडो नव्हे, तर लक्षावधी तरुणांना व्यसनाधीनता, पाश्चात्त्य संस्कृतीचा विळखा, तसेच कथित धर्मनिरपेक्षतेचे विष यांपासून वाचवले नि राष्ट्र आणि धर्म प्रेम यांचे संस्कार त्यांच्या मनावर गिरवले, ज्यांनी भारतीय संस्कृतीचे जतन नि संवर्धन करण्यासाठी गेली अनेक दशके स्वत:चा क्षणन्क्षण वेचून जीवन समर्पित केले आणि ज्यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ‘महापुरुष’ नि ‘तपस्वी’ या शब्दांनी गुणगौरव केला आहे, त्यांच्याविषयी महाविकास आघाडी असो कि शेकापसारखे कामगारांसाठी कथित कार्य करणारे पक्ष, पू. गुरुजी अन् त्यांचे विचार त्यांच्या लेखी हीनच असणार, यात काय आश्चर्य ?
नि:स्पृहता !
पू. भिडेगुरुजी यांचा एकनएक नि:स्पृह विचार हा हिंदु समाजाच्या हितासाठी दिशादर्शक आहे. आधी रा.स्व. संघ आणि वर्ष १९८४ पासून ‘शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान’च्या स्थापनेपासून गेली ४ दशके संपूर्ण महाराष्ट्रात, विशेषत: पश्चिम महाराष्ट्रात हिंदु धर्माची ज्वाळा दैदीप्यमान करण्यामध्ये पू. गुरुजींचा सिंहाचा वाटा राहिला. त्यांचे नि:स्वार्थी जीवन आजच्या स्वार्थांध जनसामान्यांसाठी आदर्शवत् आहे. अशात हिंदुद्वेष्ट्यांच्या पंगतीत बसलेले शेकापसारखे पक्ष आणि त्यांच्या नेत्यांची बाष्कळ बडबड सूज्ञ हिंदू जाणून आहेत.
तसे पाहिले, तर उमेदवार समरजीत घाटगे यांच्या विरुद्ध उभे असलेले महायुतीचे उमेदवार हसन मुश्रीफ यांच्या कृत्यांचा लेखाजोखाही काही धुतल्या तांदुळासारखा निश्चितच नाही. भ्रष्टाचाराच्या आरोपांपासून स्वत:ला वाचवण्यासाठी त्यांनी शरदचंद्र पवार गटाला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेसचा पदर धरला. निवडणुकीच्या काळात विरोधी पक्षांकडून एकमेकांवर चिखलफेक होतेच; मात्र असे असतांना स्वतःचा जातीद्वेषाचा कंड शमवण्यासाठी हिंदुहितासाठी कार्यरत असलेल्या एका तपस्वी व्यक्तीवर चिखलफेक करणे, हे बौद्धिक दिवाळखोरीचे लक्षण आहे.
नीच प्रयत्न !
शेतकरी कामगार पक्षाचा इतिहास पाहिला, तर मुळात काँग्रेसपासून वेगळे होऊन वर्ष १९४७ मध्ये शंकरराव मोरे आणि अन्य नेते यांनी या पक्षाची स्थापना केली. एकेकाळी तब्बल २८ आमदार आणि काही खासदार असणारा शेकाप ‘आज शेवटचा श्वास घेत आहे कि काय ?’, असा प्रश्न पडतो. सांगोल्याचे गणपतराव देशमुख यांनी या पक्षाचा प्रचार करण्याचा पुष्कळ प्रयत्न केला; परंतु ते असोत कि मोरे यांचे शिष्य नि मानसपुत्र एन्.डी. पाटील असोत, त्यांना या पक्षाच्या मार्क्सवादी विचारसरणीला पुढे रेटण्यात नि तळागाळात पोचवण्यात सपशेल अपयश आले. एकेकाळी काँग्रेसमधून फुटलेल्या शेकापला काँग्रेसच्या खांद्याला खांदा लावून लढावे लागत आहे. ही खरी वैचारिक गटारगंगा आहे, हे स्वीकारण्याचे धाडस सरोज पाटील यांच्यात आहे का ? स्वत: पक्ष असो कि त्याची विचारसरणी, आज रायगड या एकाच जिल्ह्यापुरती ती सीमित झाली आहे, ही ‘त्यांच्या अथवा त्यांचे दिवंगत पती यांच्या विचारांत ‘गंगा’ नव्हे, तर केवळ भेसळ आहे’, यामुळेच का, याचा विचार सरोज पाटील करणार आहेत ? शेतकरी आणि कामगार यांच्या हितासाठी कार्य झाले असते, तर गेल्या ७ दशकांत त्यांच्या परिस्थितीत पुष्कळ सकारात्मक पालट झाले असते. ते होऊ शकले नाही, हे अपयश पचवण्याचे आणि ते स्वीकारण्याचा मोठेपणा सरोज यांच्यात आहे का ? कामगार वर्गाला जवळ करण्याच्या नावाखाली हिंदुद्वेष पसरवून सरोज पाटील यांच्या पक्षाने जातीद्वेष नाही, तर अन्य कोणत्या विचारांना चालना दिली ?, हे त्या सांगतील का ? एवढेच काय, शरद पवार यांच्या विश्वासपात्र व्यक्तींपैकी एक असलेल्या हसन मुश्रीफ यांचा विचार करता, त्यांना स्वत:च्या आघाडीतही ठेवू न शकणार्यांच्या विचारांविषयी सरोज पाटील काही बोलतील का ? मुश्रीफ यांना कृतघ्न ठरवणार्या सरोज पाटील यांच्यात मुश्रीफ यांच्यावर अशी वेळ का आली, याचा अंतर्मुख होऊन विचार करण्याचे धाडस आहे का ? असे नाना प्रश्न उपस्थित होतात. या प्रश्नांना समर्थपणे उत्तर देण्याचे धाडस असणे या संपूर्ण आघाडीला कठीण आहे. हिंदूंमध्ये फूट पाडून नि येनकेन प्रकारेण स्वत:ची सत्ता आणण्यासाठी समाजहितैषी ऋषितुल्य व्यक्तीमत्त्वांवर विखारी टीका करणे मात्र यांच्या ‘डाव्या’ हाताचा खेळ आहे. अर्थात् हिंदूंच्या श्रद्धास्थानांना नीच ठरवण्याचा प्रयत्न करणार्यांना हिंदु समाज कदापि विसरणार नाही.
रहाता राहिला प्रश्न राजकारणाचा, तर प्रत्येक नागरिकाने राजकारणासंदर्भात स्वतःचे मत ठेवले पाहिजे. आपण लोकशाहीत रहातो. अशात राजकारणावर न बोलणे, हे नागरिकत्व नाकारण्यासमान होय ! सद़्गुरु जग्गी वासुदेव यांनी हे वक्तव्य हिंदूंच्या तमिळनाडू राज्यातील मंदिरांच्या दुरवस्थेवरून केले असले, तरी आजच्या महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकांनाही ते तंतोतंत लागू पडते. हिंदुहितार्थ कार्य करण्यासाठी प्रयत्नरत असलेल्याला मत देण्यास सर्व महाराष्ट्रवासियांनी बाहेर पडावे आणि विधानसभेत वैचारिक अधःपतनाला स्थान मिळता कामा नये, याची निश्चिती घ्यावी एवढेच !
पू. भिडेगुरुजींवर अश्लाघ्य टीका करणार्या शेकापच्या सरोज पाटील यांच्याविरुद्ध हिंदूंनी संघटित होऊन त्यांना क्षमा मागण्यास भाग पाडावे ! |