|
मुंबई – मालेगावमध्ये २५० कोटींचा बेहिशोबी आर्थिक व्यवहार झाला असून त्यांतील १२० कोटी रुपयांचा ‘व्होट जिहाद’साठी वापर करण्यात आला आहे, असा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. त्यांनी यासंदर्भात निवडणूक आयोगाकडे तक्रार करत कारवाईची मागणी केली आहे.
किरीट सोमय्या पुढे म्हणाले की,
१. मालेगावमध्ये सिराज अहमद आणि मोईन खान यांनी तेथील सहकारी बँकेच्या शाखेत अनुमाने २४ बँक खाती उघडली आहेत. यांतील सगळ्या बँकांतून ४ दिवसांत त्यांच्या खात्यांत १२५ कोटी रुपयांहून अधिक रक्कम जमा झाली. त्यानंतर हे पैसे मुंबई, मालेगाव, नाशिक, अहमदाबाद अशा वेगवेगळ्या ठिकाणच्या ३७ बँक खात्यांमध्ये पाठवण्यात आले. तेथून लगेच हा पैसा काढण्यात आला. या २५० कोटी रुपयांच्या आर्थिक व्यवहारातील १२० कोटी रुपये ‘व्होट जिहाद’साठी वापरण्यात आले आहेत.
२. ७ नोव्हेंबर २०२४ या दिवशी या घोटाळ्यासंबंधी मालेगाव छावनी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. यातील मुख्य आरोपी फरार आहेत. एका महिन्यात २०० हून अधिक बँक खाती सिराज किंवा मोईन वापरूच शकत नाहीत. यामागे मोठी यंत्रणा कार्यरत आहे. ‘व्होट जिहाद’साठी १०० कोटी रुपये विदेशातून आले आहेत.
३. ऑक्टोबर २०२४ मध्ये उत्तरप्रदेश, हिमाचल प्रदेश, हरिणाया, पश्चिम बंगाल, ओडिशा, मध्यप्रदेश, गुजरात, महाराष्ट्र येथील बँक खात्यांसह देशभरातील २०० हून अधिक बँकेच्या खात्यांमध्ये पैशांची अफरातफर झाली आहे.