Budgam Terrorist Attack : बडगाम (जम्मू-काश्मीर) : आतंकवादी आक्रमणात २ कामगार घायाळ !

श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – राज्यात आतंकवाद्यांनी पुन्हा एकदा काश्मीरबाहेरील लोकांवर आक्रमण केले. बडगामच्या मजमा गावात आतंकवाद्यांनी कामगारांवर गोळ्या झाडल्या. यात २ कामगार घायाळ झाले आहेत. घायाळ झालेले दोघेही उत्तरप्रदेशातील सहारनपूरचे रहिवासी आहेत. ते बडगाम येथील ‘जलजीवन प्रकल्पा’त काम करत होते.

या घटनेनंतर सुरक्षादलांच्या सैनिकांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला असून शोध मोहीम चालू केली आहे. गेल्या २ आठवड्यांत जम्मू-काश्मीरमध्ये काश्मीरबाहेरील लोकांवर झालेले हे दुसरे आक्रमण आहे. यापूर्वी २० ऑक्टोबर या दिवशी आतंकवाद्यांनी गांदरबल येथे ७ जणांची गोळ्या झाडून हत्या केली होती.

काश्मीरबाहेरील लोकांवर आक्रमण

(म्हणे) ‘आक्रमणासाठी भाजप सरकार उत्तरदायी !’ – नॅशनल कॉन्फरन्सचे खासदार रुहुल्ला मेहदी

संपादकीय भूमिका

आतंकवाद्यांचे समर्थन करत विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी अटकेत असलेल्या आतंकवाद्यांना सोडून देण्याची भाषा करणारा नॅशनल कॉन्फरन्सचा खासदार अशा प्रकारे राजकारण करत असेल, तर त्यात काय आश्‍चर्य ?

बडगाम आतंकवादी आक्रमणाविषयी श्रीनगरचे खासदार आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते रुहुल्ला मेहदी म्हणाले की, यासाठी केंद्रातील भाजप सरकारला उत्तरदायी धरले पाहिजे. विधानसभा निवडणुकीनंतर लगेचच आक्रमणे वाढली आहेत.

संपादकीय भूमिका

जोपर्यंत ‘जिहाद’चा निर्माता पाकिस्तानचा नायनाट केला जात नाही, तोपर्यंत जम्मू-काश्मीरमधील आतंकवाद संपुष्टात येणे कदापि शक्यच नाही, हे लक्षात घेतले पाहिजे !