Mosque In Uttarkashi : उत्तराखंडच्‍या उत्तरकाशीतील बेकायदेशीर मशिदीवर कारवाई करण्‍यासाठी हिंदु संघटनांचे आंदोलन

आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्‍या लाठीमाराच्‍या निषेधार्थ पाळण्‍यात आला बंद !

उत्तरकाशी (उत्तराखंड) – येथे बेकायदेशीर मशीद हटवण्‍याची मागणी करत हिंदु संघटना रस्‍त्‍यावर उतरल्‍या आहेत. स्‍थानिक हिंदू आणि धार्मिक संघटना यांच्‍याशी संबंधित लोकांनी २४ ऑक्‍टोबरला मोर्चा काढला. या वेळी झालेल्‍या दगडफेकीनंतर तणाव निर्माण झाला. त्‍यामुळे पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमार केला. यात २७ जण घायाळ झाले.

पोलिसांनी केलेल्‍या लाठीमाराच्‍या निषेधार्थ हिंदु संघटनांनी २५ ऑक्‍टोबरला बंदचे आवाहन केले होते. त्‍यामुळे येथे बंदला उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद मिळाला.

१. उत्तरकाशीच्‍या बराहत भागात सरकारी भूमीवर बेकायदेशीरपणे मशीद बांधण्‍यात आल्‍याचा आरोप हिंदु संघटना करत आहेत. मशीद पाडण्‍याची मागणी सातत्‍याने होत आहे. याबाबत २४ ऑक्‍टोबरला आंदोलकांकडून हनुमान चौकातून मोर्चा काढण्‍यात आला होता.

२. या मोर्चामुळे उत्तरकाशी, दुंडा, भटवाडी, जोशीयारा येथील बाजारपेठा पूर्णपणे बंद होत्‍या. आंदोलक हनुमान चौकातून मशिदीच्‍या दिशेने जाऊ लागले, तेव्‍हा त्‍यांना रोखण्‍यासाठी जिल्‍हा प्रशासनाने गंगोत्री राष्‍ट्रीय महामार्गावर भटवाडीमध्‍ये अडथळे (बॅरिकेड्‍स) लावले. आंदोलकांनी बॅरिकेडिंग हटवण्‍यास चालू केले असता त्‍यांची पोलिसांशी बाचाबाची झाली. पोलिसांनी त्‍यांना पुढे जाण्‍यापासून रोखले असता आंदोलकांनी धरणे धरून हनुमान चालिसाचे पठण चालू केले.

३. यानंतर आंदोलकांनी बॅरिकेड्‍स हटवण्‍याचा प्रयत्न केला असता त्‍यांची पोलिसांशी झटापट झाली. पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमार केला. या वेळी अश्रूधुराच्‍या नळकांड्याही सोडण्‍यात आल्‍या. या चकमकीत ७ पोलिसांसह २७ जण घायाळ झाले.
परिस्‍थिती चिघळवण्‍याच्‍या कटाचा भाग म्‍हणून पोलिसांवर दगडफेक करण्‍यात आल्‍याचे आंदोलकांचे म्‍हणणे आहे.

४.  उत्तरकाशीचे पोलीस अधीक्षक अमित श्रीवास्‍तव यांनी सांगितले की, दगडफेकीची घटना गांभीर्याने घेतली असून त्‍याची चौकशी करण्‍यात येत आहे. आरोपींची ओळख पटवून त्‍यांच्‍यावर कारवाई केली जाईल. आता शहरातील परिस्‍थिती सामान्‍य आणि शांततापूर्ण आहे. शहरात सुरक्षेसाठी पुरेसा पोलीस बंदोबस्‍त तैनात करण्‍यात आला असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

५. मोर्चानंतर मशिदीच्‍या भोवतीची सुरक्षाही कडक करण्‍यात आली आहे. या भागात प्रतिबंधात्‍मक आदेश लागू केले आहेत.

 

काय आहे प्रकरण ?

सरकारी भूमीवर बेकायदेशीरपणे मशीद बांधण्‍यात आल्‍याचे हिंदूंचे म्‍हणणे आहे; मात्र ही मशीद जुनी असून मुसलमान समाजातील लोकांच्‍या भूमीवर बांधण्‍यात आल्‍याचे जिल्‍हा प्रशासनाचे म्‍हणणे आहे. उत्तरप्रदेश सरकारच्‍या मुस्‍लिम वक्‍फ विभागाने २० मे १९८७ या दिवशी प्रकाशित केलेल्‍या सरकारी राजपत्रात या मशिदीचा उल्लेख आहे. वर्ष २००५ मध्‍ये काढलेल्‍या तहसीलदारांच्‍या आदेशात ही मशीद संबंधित भूमीवर बांधण्‍यात आली आहे. संयुक्‍त सनातन धर्म रक्षक संघाने माहिती अधिकाराच्‍या अंतर्गत मशिदीची माहिती मागितल्‍यानंतर हा वाद चालू झाला. त्‍यात जिल्‍हा प्रशासनाने अस्‍पष्‍ट माहिती देत त्‍यांच्‍याकडे आवश्‍यक कागदपत्रे नसल्‍याचे सांगितले.

यानंतर ६ सप्‍टेंबर २०२४ या दिवशी हिंदु संघटनांनी मशीद पाडण्‍याची मागणी करत जिल्‍हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन केले. त्‍यांनी प्रशासनाला ३ दिवसांची मुदत दिली होता. ‘जर मागण्‍या पूर्ण झाल्‍या नाहीत तर आपण स्‍वतः मशीद पाडू’ असे त्‍यांनी सांगितले होते. यानंतर उत्तरकाशीच्‍या जिल्‍हा दंडाधिकार्‍यांनी या प्रकरणाच्‍या चौकशीसाठी एक समिती स्‍थापन केली. मशीद कायदेशीर असून ती सरकारी भूमीवर नसल्‍याचे या समितीने म्‍हटले आहे.

पोलीस अधीक्षक अमित श्रीवास्‍तव यांनी इंडियन एक्‍सप्रेसला सांगितले की, आमच्‍या नोंदीनुसार ही मशीद नोंदणीकृत भूमीवर बांधली गेली आहे. ही भूमी ४ जणांच्‍या नावावर आहे. प्रशासनाने या संस्‍थांना याबाबत माहिती दिली आहे.

संपादकीय भूमिका

  • कोणत्‍याही बेकायदेशीर बांधकामासाठी जनतेला आंदोलन का करावे लागते ?
  • अशा बांधकामांवर कारवाई करणारी सरकारी यंत्रणा काय करते ? ती जर काम  करत नसेल आणि उद्या जनतेने कायदा हातात घेतला, तर त्‍याला कोण उत्तरदायी असणार ? उत्तरखंडमध्‍ये भाजपचे सरकार असल्‍याने सरकारने यावर विचार करणे आवश्‍यक आहे !