गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह भारतातील विमानांमध्ये ‘अमुक ठिकाणी बाँब ठेवला आहे’, अशा धमकीचा संदेश अनेकदा प्राप्त झाला आहे. हा संदेश केवळ एकाच विमानापुरता मर्यादित नाही, तर एकापेक्षा अधिक विमानांमध्ये बाँब ठेवल्याचे वृत्त असणारा हा संदेश आहे. २२ ऑक्टोबर या दिवशीही १० विमानांमध्ये बाँब असल्याच्या धमकीचा संदेश प्राप्त झाला आहे. आतापर्यंत विमानांमध्ये बाँब असल्याची धमकी दिल्याविषयी मुंबई पोलिसांनी नोंदवलेला हा दहावा गुन्हा आहे. यात लक्षात आलेले महत्त्वपूर्ण सूत्र म्हणजे सर्व धमक्या ‘एक्स’ या खात्यावरून आलेल्या आहेत. यामुळे भारत शासनाने म्हणजेच केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाने या प्रकरणी ‘एक्स’ला चांगलेच खडसावले आहे. मंत्रालयाचे सहसचिव संकेत भोंडवे यांनी ‘एअरलाईन्स’ आणि सामाजिक माध्यमांचे प्रतिनिधी यांच्यासमवेत आभासी (व्हर्च्युअल) बैठक आयोजित केली होती. यात त्यांनी म्हटले, ‘‘आतापर्यंत विविध विमान आस्थापनांना बाँबस्फोटांच्या १२० हून अधिक धमक्या ‘एक्स’वरूनच प्राप्त झाल्या आहेत. इंडिगो, विस्तारा आणि एअर इंडिया यांच्या ३० विमानांना धमक्या देण्यात आल्या आहेत. वारंवार येणार्या धमक्या पहाता ‘एक्स’ गुन्ह्यांना प्रोत्साहन देते का ? बाँबच्या अफवा पसरवल्या जाऊ नयेत, या दृष्टीने कोणती पावले उचलली ? ते सांगावे.’’ अर्थात्च भारत शासनाच्या प्रश्नाला समर्पक उत्तर न देता संबंधित अधिकार्यांनी उडवाउडवीच्या भाषेत सांगितले, ‘‘या प्रकरणाच्या अनुषंगाने संबंधितांना सतर्क केले आहे. सुरक्षेच्या नियमांचे पालन करण्यात येईल.’’ नागरीउड्डाणमंत्री राममोहन नायडू यांनीही सांगितले की, प्रवाशांच्या सुरक्षेशी तडजोड न करता सरकार समस्या सोडवत आहे. खोट्या धमक्या देणार्यांना ‘नो फ्लाय’च्या (विमानात चढण्याची अनुमती न देणे) सूचीत टाकण्यात येईल, तसेच त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. यामागे काही षड्यंत्र आहे का ?, याचीही चौकशी चालू आहे.’’ बाँबच्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर केंद्रशासनाने उड्डाणांमध्ये ‘एअर मार्शल’ची संख्या दुप्पट करण्याचा निर्णय घेतला. केंद्राने ‘डीजीसीए’ (डायरेक्टोरेट जनरल ऑफ सिव्हील एव्हिएशन) (नागरी विमान वाहतुक महासंचालनालय) प्रमुख विक्रम देव दत्त यांना पदावरून हटवले. धमकीप्रकरणी काहींना अटक करण्यात आली आहे. सरकारने धमकीच्या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन उत्तरदायींना कठोर शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करावेत.
भारताच्या अपकीर्तीचा डाव !
मानसिकदृष्ट्या रुग्ण असलेल्या व्यक्तींकडून बाँबच्या धमक्या दिल्या जात आहेत. सर्वच ठिकाणचे मानसिक रुग्ण विमानात बाँब असल्याची ‘एकाच प्रकारची’ धमकी देतात आणि विमानाशी संबंधित असणारी संपूर्ण यंत्रणा हालवून सोडतात, हे भारताच्या दृष्टीने हास्यास्पद नव्हे का ? त्यांची चौकशी केली असता ते काहीच सांगत नाहीत. मग सर्वांचाच वेळ जातो. निष्पन्न काहीच होत नाही. अशांना खरोखर मानसिक रुग्ण म्हणायचे कि त्यांच्या माध्यमातून काही संघटित टोळ्या कार्य करत आहेत, या दृष्टीने अन्वेषण करायचे ? विकासाचे सर्वाेच्च शिखर गाठू पहाणार्या भारताच्या यशस्वी मार्गात विमानासारखे संवेदनशील क्षेत्र निवडून त्या माध्यमातून खिळ आणण्याचाच हा प्रकार आहे; कारण विमानयंत्रणा बिघडली की, अर्थातच तिचा परिणाम राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सेवेवर होईल अन् ती कोलमडून पडेल. यात अपकीर्ती होणार ती भारताची ! ‘भारतीय विमानसेवेला कलंक लागेल, या हेतूनेच हे असे प्रकार केले जात आहेत’, असे कुणाला वाटल्यास चूक ते काय ?
भारतद्वेषी ‘एक्स’ !
भारतात अशा प्रकारच्या धमक्या येणे काही नवीन नाही; परंतु त्या प्रतिदिन येणे हे चिंताजनक आहे. १२० हून अधिक धमक्या येईपर्यंत ‘एक्स’ खाते झोपा काढत होते का ? २ – ४ धमक्या आल्यानंतरच ‘एक्स’ने सतर्क होऊन धमकी देणार्यांवर कारवाई का केली नाही ? एरव्ही जरा कुठे ‘खुट्ट’ झाले की, लगेचच टीका करणार्या ‘एक्स’ला विमानांच्या सुरक्षेच्या दृष्टीने तितकी संवेदनशीलता का वाटली नाही ? विश्वभरात एकट्या भारतातील विमानांच्या संदर्भात येणार्या प्रत्येक धमकीची नोंद ‘एक्स’ने तत्परतेने का घेतली नाही ? या प्रश्नांचाही गांभीर्याने विचार करायला हवा आणि या सर्वच प्रश्नांची उत्तरे ‘एक्स’कडून मिळवायला हवीत. तसे झाले नाही, तर ‘प्रत्येक वेळी ‘एक्स’च्या व्यासपिठाचा उघडउघड वापर केला जातो, म्हणजे धमकी देणार्यांसमवेत ‘एक्स’ने हातमिळवणी केली आहे कि काय ?’, असा विचार भारतियांच्या मनात आल्यास नवल ते काय ! ‘एक्स’ हे विदेशी सामाजिक माध्यम आहे. त्यामुळे अर्थातच त्याला भारताविषयी किती देणेघेणे असणार ? हा प्रश्नच आहे. काही गोष्टींविषयी चुकीची माहिती देणे, एखाद्याची अपकीर्ती करणे या दृष्टीनेही ‘एक्स’वरील विविध खात्यांद्वारे प्रयत्न चालू असतात. भारत शासनाने यासंदर्भात योग्य कारवाई होण्याच्या दृष्टीने ‘एक्स’कडे पाठपुरावा घ्यायला हवा. हिंदुत्वनिष्ठ संघटनांची खाती ‘एक्स’ केवळ द्वेषापोटी बंद करते; पण बाँबची उघड धमकी देणार्या राष्ट्रघातकी खात्यांवर बंदी आणली जात नाही. यातून ‘एक्स’चा भारतद्वेष दिसून येतो. अशी खाती कोण चालवतो ? याची चौकशी सरकारने ‘एक्स’कडे करून ती बंद करण्यासाठी ‘एक्स’ला भाग पाडायला हवे.
गुप्तचर यंत्रणांचे अपयश !
बाँबच्या प्रत्येक धमकीनंतर संबंधित विमान आणि त्यातील प्रवासी यांची काटेकोरपणे पडताळणी केली जात होती; पण धमकी अथवा संदेश खोटे असल्याचे निष्पन्न होत होते. या पडताळणी प्रक्रियेसाठी संबंधित विमान त्याच्या नियोजित विमानतळाऐवजी जवळच्या विमानतळावर उतरवण्यात येत असे. यात इंधनाचाही अपव्यय झाला. त्याच्या जोडीला प्रवाशांची पुनर्व्यवस्था करणे यासाठीही वेळ आणि पैसा खर्च करावा लागला. यामध्ये एका विमानासाठी साधारणतः ३ कोटी रुपये खर्च येतो. आतापर्यंत सर्व विमानांची मिळून १५ सहस्र कोटी रुपयांची हानी झाल्याचे समजते. भारतात यंदा ५०० हून अधिक विमानांना धमकी मिळाली आहे. त्याचा परिणाम २ सहस्र विमाने आणि त्यांतून प्रवास करणार्या साडेतीन लाख प्रवाशांवर झाला आहे. आता ही १५ सहस्र कोटी रुपयांची हानी कोण भरून काढणार ? अशा धमक्या वारंवार येत राहिल्या, तर हानीमध्ये आणखी वाढ होऊ शकते. प्रतिदिन धमकीच्या वृत्तांचे संदेश येत असतांना भारताची गुप्तचर यंत्रणा काय करत होती ? भारताच्या हवाई सेवेमध्ये ढवळाढवळ करणार्यांचे मनसुबे तिला वेळीच कसे ओळखता आले नाहीत ? हे एकप्रकारे तिचे अपयशच आहे. धमकीच्या वृत्तांना पूर्णविराम देण्यासाठी गुप्तचर यंत्रणांनी आतातरी प्रयत्न करावेत !
हिंदुत्वनिष्ठांच्या खात्यांवर बंदी आणणारे ‘एक्स’ हे विमानात बाँबची धमकी देणार्या राष्ट्रघातकी खात्यांवर बंदी आणत नाही, हे लक्षात घ्या ! |