विषयासक्त मन भगवंताच्या नामाने निर्मळ करून आनंद आणि शांती अनुभवूया !

‘२१ ऑक्टोबर २०२४ या दिवशीच्या लेखात आपण व्यक्तीने मन निर्मळ करण्याचे महत्त्व आणि तिने परमार्थाची कास धरण्याची आवश्यकता, यांविषयी जाणून घेतले. या लेखात आपण ‘मन दुःखी होण्याची कारणे, मन आनंदी ठेवण्यासाठी करायचे प्रयत्न आणि प्रपंचात कसे रहावे ?’, यांविषयी जाणून घेऊया.

या लेखाचा आधीचा भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/846572.html

श्री. अशोक लिमकर

४. मन दुःखी होण्याची कारणे आणि  मन आनंदी ठेवण्यासाठी करायचे प्रयत्न

४ अ. मन दुःखी होण्याचे पहिले महत्त्वाचे कारण ‘संतसंगतीचा अभाव’ हे आहे. पवित्र महात्म्यांचा सत्संग कल्याणकारक असतो.

४ आ. व्यसने ही ‘पूर्वसंस्कार आणि अनिष्ट शक्तींची आक्रमणे’ यांमुळे व्यक्तीला चिकटलेली असणे अन् त्यातून सुटका होण्यासाठी व्यक्तीने धर्माचरण आणि संतसंगती यांची कास धरणे आवश्यक ! : आपण अनेक प्रकारच्या व्यसनांमध्ये लिप्त झालो आहोत. लौकिक व्यसनांपासून (मांसाहार आणि मद्यपान करणे, जुगार खेळणे, अनीतीने वागणे, व्याभिचार करणे इत्यादींपासून) सुटका हा निर्व्यसनतेचा पहिला भाग आहे. व्यक्तीला ही व्यसने ‘पूर्वसंस्कार आणि अनिष्ट शक्तींची आक्रमणे’ यांमुळे चिकटलेली असतात. त्यातून सुटका होण्यासाठी धर्माचरण आणि संतसंगती यांची कास धरायला हवी. गोंदवलेकर महाराज म्हणतात, ‘दास विषयाचा झाला । सुखसमाधानाला आंचवला ।।’अर्थ : जो विषयोपभोगांच्या आहारी गेला, तो भौतिक सुखांमध्ये रममाण झाला.

४ इ. अंतःकरणातील मळ पूर्णपणे नाहीसा होण्यासाठी परमार्थाची कास धरायला हवी ! : निर्व्यसनी होण्याचा दुसरा महत्त्वाचा भाग, म्हणजे आपल्या अंतःकरणातील मळ पूर्णपणे नाहीसा व्हायला हवा. अंतःकरणातील मळ, म्हणजे ‘मानवाच्या चित्तावर असलेले अगणित संस्कार आणि त्याच्यामधील स्वभावदोष अन् अहं’ हे आहेत. हे कशाने दूर होणार ? त्यासाठी व्यक्तीने परमार्थाची कास धरायला हवी.

४ ई. कलियुगातील साधनेचा राजयोगी मार्ग : कलियुगातील साधना, म्हणजे सतत नामजप करणे. ‘नामजप आिण मानसपूजा करणे’ हा राजयोगी मार्ग आहे. त्यावरून संशयरहित होऊन प्रयत्न करत रहावे.

४ उ. प्रार्थनेतील सामर्थ्य आणि संत अन् सद्गुरु यांचा सत्संग लाभण्याचे महत्त्व : उपासनेला प्रार्थना आणि संतसंगत यांची जोड दिली, तर अहो भाग्यम् ! केवळ शब्द, म्हणजे प्रार्थना नव्हे. देव आणि संत यांना केलेली प्रार्थना कधीही निष्फळ होत नाही. ‘प्रार्थनेतूनही संत आणि सद्गुरु यांचा सहवास अनुभवता येतो अन् तो अनुभवणे’, हीच खरी प्रार्थना आहे. संतसंगतीचा महिमा अपार आहे. व्यक्तीवर गुरुकृपा झाल्यावर ती व्यक्ती मनुष्यजन्मातून तरून जाते.

४ ऊ. केवळ भगवंताच्या अनुसंधानानेच शाश्वत आनंद मिळत असणे : ‘मनुष्य आनंदप्राप्तीसाठी नाही, तर वस्तूसाठी जगतो’, असे दिसते. वस्तू सत्य नाही आणि तिचे रूप अशाश्वत असल्यामुळे त्या वस्तूपासून मिळणारा आनंदही अशाश्वतच असतो. केवळ भगवंत शाश्वत असून त्याच्या अनुसंधानानेच शाश्वत आनंद मिळतो.

४ ए. ‘प्राप्त परिस्थिती परमेश्वराच्या इच्छेने आली आहे’, असे समजावे, म्हणजे आहे त्या परिस्थितीत समाधान मानले, तर विषयाची पकड सैल होण्यास साहाय्य होते. 

४ ऐ. स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवल्यास सर्व स्वभावदोष न्यून होण्यास साहाय्य होत असणे : सर्व दुःखांचे मूळ कारण व्यक्तीतील ‘काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर’ हे षड्रिपू आहेत. या षड्रिपूंमुळे आपल्याला निराशा येते, आपल्याला दुःख भोगावे लागते आणि आपण आजारांना बळी पडतो. या षड्रिपूंमुळे व्यक्तीचे अधःपतन होऊन ती जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांत अडकते. जी व्यक्ती मत्सरी आहे, ती नम्र आणि प्रेमळ असू शकत नाही. या जगात व्यक्तीतील भयंकर अहंकार, क्रोध आणि द्वेष यांमुळे चांगली कामे निष्फळ होत आहेत. व्यक्तीने स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवल्यास तिच्यातील सर्व स्वभावदोष न्यून होण्यास साहाय्य होईल.

५. प्रपंचात कसे रहावे ?

५ अ. ‘जीवनात जे काही चांगले-वाईट घडते, ती देवाची इच्छा असणे’, असा भाव ठेवणे 

ठेविले अनंते तैसेचि राहावे ।
चित्ती असो द्यावे समाधान ।। – तुकाराम गाथा, अभंग २८६७, ओवी २

अर्थ : भगवंताने आपणाला ज्या स्थितीत ठेवले, त्या स्थितीत रहावे. चित्तात मात्र समाधान असावे.

‘माझ्या जीवनात जे काही चांगले-वाईट घडत आहे, ते देवाच्या इच्छेने घडत आहे’, असा विचार केल्याने दुःख भोगावे लागले, तरी मनुष्य देवाची इच्छा म्हणून ते दुःख आनंदाने भोगतो.

५ आ. प्रारब्धाचे भोग भोगावेच लागत असणे : आपला प्रपंच प्रारब्धाने घडतो; म्हणजे पूर्वजन्मांत केलेल्या कर्मांचा परिणाम संपवण्यासाठी आपल्याला जन्म घ्यावाच लागतो. आपल्याला प्रारब्धाचे भोग भोगावेच लागतात. महापुरुष आणि संत यांनाही प्रारब्धाचे भोग भोगूनच संपवावे लागतात.

५ इ. भगवंतावर पूर्ण निष्ठा ठेवून प्रपंच केला, तर आपल्या वाट्याला फारसे दुःख येणार नाही. भगवंतच त्या दुःखांचे परस्पर निवारण करत असल्याची अनुभूती अनेक जणांना येते.

५ ई. ‘भगवंत कर्ता आहे’ ही जाणीव हवी ! : ‘प्रपंचात देवाची आवश्यकता आहे’, याची आतून जाणीव हवी. ‘भगवंत कर्ता’ म्हटले, तर सुख आणि ‘मी कर्ता’ म्हटले, तर कर्तेपणा आणि दुःख वाट्याला येते.

५ उ. प्रापंचिक कर्मे भगवंताची आज्ञा समजून करावीत : प्रापंचिक कर्मे भगवंताची आज्ञा समजून करावीत. प्रपंच करतांना निंदा-स्तुती आणि मान-अपमान यांचा विचार करू नये.

५ ऊ. सद्विचार धर्माचरण करायला प्रवृत्त करतात; म्हणून सतत मनातील विचारांवर लक्ष ठेवायला हवे. मनात एखादा कुविचार आल्यास त्याला लगेच दूर करावे.

५ ए. सर्वांवर निरपेक्ष प्रेम केल्याने होणारे लाभ : प्रेम ही केवळ अनुभवायची गोष्ट आहे. ते शब्दांनी व्यक्त करता येत नाही. प्रेमाच्या प्रभावाने इंद्रिये सूक्ष्म आणि उदात्त होतात. मानवी संबंधात शुद्ध प्रेम क्वचितच आढळते. ईश्वराचे प्रेम अविच्छिन्न (निरंतर) असते. आपण अपेक्षा न ठेवता लोकांवर प्रेम करायला लागलो, तर लोकही आपल्यावर प्रेम करू लागतात, एकमेकांत आपुलकी निर्माण होते आणि आपल्यात व्यापकत्व येते. आपल्यात एकमेकांना साहाय्य करण्याची भावना वाढते.

६. ‘भगवंताचे स्मरण’ हीच त्याने माणसाला  समाधान देण्यासाठी दिलेली मोठी देणगी आहे ! 

जगातील कोणतीच वस्तू तुम्हाला समाधान देऊ शकत नाही. ‘भगवंताचे स्मरण’ हीच त्याने माणसाला समाधान देण्यासाठी दिलेली मोठी देणगी आहे; म्हणून त्याच्या स्मरणात सतत समाधानी रहावे. व्यक्तीची वृत्ती स्थिर झाल्यावर तिला समाधान मिळू लागते.

सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी विचार दिले. त्यांनीच ते लिहून घेतले. ते त्यांच्या चरणी अर्पण करून कृतज्ञता व्यक्त करतो. ‘लेखातील सूत्रांनुसार प्रयत्न केल्यावर सर्वांना आनंदप्राप्ती होवो’, अशी मी ईश्वरचरणी शरणागतभावाने प्रार्थना करतो.’   (समाप्त)

– श्री. अशोक लिमकर (वय ७३ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२.९.२०२४)

वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.