‘व्यक्तीची तिच्या जन्मापासून आनंद मिळवण्यासाठी धडपड असते. आनंदाचे स्वरूप शाश्वत आहे आणि हा आनंद शाश्वत अशा भगवंताची उपासना केल्यानेच प्राप्त होतो. व्यक्ती तिच्या मनानुसार वागत असते. ‘व्यक्तीचे मनानुसार वागणे आणि तिचे प्रारब्ध’ यांमुळे तिला सुख-दुःख भोगावे लागते. या लेखात ‘आनंदप्राप्तीसाठी मन निर्मळ करण्याचे महत्त्व आणि व्यक्तीने परमार्थाची कास धरण्याची आवश्यकता’, यांविषयी जाणून घेऊया.
१. विषयासक्त मन बंधन होण्याला कारणीभूत असल्याने मनुष्याची अधोगती होत असणे आणि विषयमुक्त मन मनुष्याला मोक्षप्राप्ती करून देत असणे
मन हेच मनुष्याला बंधनात टाकते आणि मनच मनुष्याला बंधनातून मुक्त करून मोक्ष मिळवून देते. ‘जैसे ज्याचे ध्यान, तैसे त्याचे मन’, म्हणजे ध्यानातील विषयांनुसार मनुष्याचे मन बनते. मन विषयासक्त असेल, तर ते बंधन होण्याला कारणीभूत होऊन मानवाची अधोगती होते; मात्र तेच मन विषयमुक्त असेल, तर ते मनुष्याला मोक्षाप्रत पोचवते; म्हणूनच म्हटले आहे, ‘मन करा रे प्रसन्न । सर्व सिद्धींचे कारण ।।’ (तुकाराम गाथा, अभंग १५२, ओवी १), म्हणजे तुम्ही आपले मन प्रसन्न, म्हणजे अनुकूल असे करा. सर्व सिद्धींचे हेच कारण आहे.
२. मन निर्मळ करण्याचे महत्त्व
२ अ. निर्मळ मनाच्या व्यक्तीलाच आनंद मिळत असणे आणि हा आनंद भगवंतप्राप्तीविना अन्य कशातूनच मिळत नसणे : जगातील प्रत्येक व्यक्तीची ‘आनंद मिळावा’, यासाठी धडपड असते. ‘आनंद नको’, असे म्हणणारी व्यक्ती दुर्मिळच ! हा शाश्वत आनंद निर्मळ मनाच्या व्यक्तीला भगवंतप्राप्तीविना अन्य कुठे मिळत नाही, अन्यथा आनंदप्राप्तीसाठी केलेले अन्य सर्व प्रयत्न निष्फळ होतात. ‘भगवंत हवा’, असे व्यक्तीला मनापासून वाटायला हवे. भगवंताच्या प्राप्तीसाठी त्याचे नाम घेणे, हे एकच सहज आणि सुलभ साधन आहे. आपले मन भगवंताच्या चरणांपाशी ठेवावे आणि देह प्रारब्धावर सोडावा. ‘देह प्रारब्धावरी सोडा, चित्त चैतन्याशी जोडा ।’, असे प.पू. भक्तराज महाराज यांनी म्हटले आहे.
२ आ. चित्तावरील अनेक पूर्वजन्मांतील अगणित संस्कार पुसून टाकून पाटी कोरी करणे, म्हणजे मन निर्मळ करणे आणि त्यासाठी गुरुकृपायोगानुसार साधनामार्गात सांगितलेली अष्टांग साधना करणे आवश्यक असणे : आपण चित्तावरील संस्कारांनुसार वागत असतो. आपल्या चित्तावर आपल्या अनेक पूर्वजन्मांतील अगणित संस्कार असतात. ते सर्व संस्कार पुसून टाकून पाटी कोरी करणे, म्हणजे मन निर्मळ करणे होय. त्यासाठी गुरुकृपायोगानुसार सांगितलेली अष्टांग साधना करायला हवी.
अष्टांग साधनेत ‘स्वभावदोष निर्मूलन आणि गुण-संवर्धन, अहं-निर्मूलन, नामजप, भावजागृतीसाठी करायचे प्रयत्न, सत्संग, सत्सेवा, सत्साठी त्याग, प्रीती (इतरांविषयी निरपेक्ष प्रेम)’ हे टप्पे येतात.
२ इ. मन जितके शुद्ध, तितके ते परमार्थाकडे वळवण्यास अनुकूल असणे : मन जितके शुद्ध, तितके ते नियंत्रित करण्यास सोपे असते आणि मनाला परमार्थाकडे वळवण्यास अनुकूलता लाभते. परमार्थ ही अंतःकरणातील वृत्ती आहे. विचारांचा इच्छाशक्तीशी संयोग झाल्यावर त्याला ‘सामर्थ्य’ म्हणतात. विचार नाही, तर सामर्थ्यच कार्य करते. ज्याच्या ठायी काही वाईट विचार नाही, त्याला दुसर्यातही काही वाईट दिसत नाही. तुमच्या आत जे असते, तेच तुम्हाला दुसर्यात दिसते.
२ ई. चंचल मनाला ओढून नामावर आणावे लागत असणे आणि त्यासाठी ‘व्यक्तीमध्ये कष्ट करण्याची सिद्धता अन् चिकाटी आणि सातत्य’ हे गुण असणे आवश्यक आहे : ‘मन कशाने नियंत्रित आणि निर्मळ करायचे ?’, असे अर्जुनाने विचारल्यावर भगवान श्रीकृष्ण म्हणतात, ‘अभ्यासाने, म्हणजे प्रयत्नाने मनावर नियंत्रण मिळवता येते.’ चंचल मनाला ते जिथे जाईल, तिथून ओढून आणून नामावर आणावे लागते. तेही प्रेमाने आणि मनाला हळूवारपणे ओंजारून गोंजारून करायला हवे. त्यासाठी व्यक्तीमध्ये ‘कष्ट करण्याची सिद्धता, चिकाटी आणि सातत्य’ हे गुण असणे आवश्यक आहे.
३. मनुष्यजन्माचा उद्देशच ‘परमानंद मिळवणे’ हा आहे आणि त्यासाठी परमार्थाची कास धरणे आवश्यक असणे
३ अ. परमार्थ, म्हणजे एका भगवंताशी संबंध जोडून त्या आधारे आनंद मिळवण्यासाठी प्रामाणिकपणे व्यवहार करणे : मनुष्यजन्म लाभणे दुर्लभ आहे. मनुष्यजन्माचा उद्देशच ‘परमानंद मिळवणे’ हा असला, तरी आनंद मिळत असल्याचे आपण अनुभवतो का ? आपण प्रापंचिक माणसे आहोत. प्रपंच करणे, म्हणजे व्यवहारात अनेकांशी संबंध जोडून त्या आधारे व्यवहार करून आनंद मिळवणे; पण तो प्रयत्न फलद्रूप होत नाही; कारण प्रपंच करतांना आपल्याकडून परमार्थ घडत नाही. परमार्थ करणे, म्हणजे एका भगवंताशी संबंध जोडून त्या आधारे आनंद मिळवण्यासाठी प्रामाणिकपणे व्यवहार करणे होय. लौकिक व्यवहारात काही वेळा आपले शत्रू असतात; मात्र ‘परमार्थ करणे’ ही अंतरंग क्रीडा असल्याने आपणच आपले शत्रू असतो. आपल्याकडून प्रयत्न न होण्याची अनेक कारणे आहेत.
३ आ. ईश्वरावर श्रद्धा हवी : आधी आपली स्वतःवर श्रद्धा हवी आणि नंतरच आपण ईश्वरावर श्रद्धा ठेवू शकू. आपण एखाद्या व्यक्तीवर विश्वास ठेवतो; मात्र ईश्वरावर आपला विश्वास नसतो. आपल्या जीवनात अनुकूल गोष्टी घडल्यावर आपण ईश्वरावर विश्वास ठेवतो आणि आनंदी होतो. विश्वासात ईश्वर आहे आणि ईश्वरात विश्वास आहे.’
(क्रमशः)
– श्री. अशोक लिमकर (वय ७३ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२.९.२०२४)
पुढील भाग वाचाण्यासती क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/846758.html