पाकिस्तानमध्ये कुख्यात आणि हिंदुद्वेष्टा झाकीर नाईकचे स्वागत का ?

‘इस्लामी धर्मगुरु आणि अनेक आतंकवादी कारवायांमध्ये सहभागी असलेला आरोपी डॉ. झाकीर नाईक पाकिस्तानात गेला आहे. पाकिस्तानमध्ये त्याचे भव्य स्वागत करण्यात आले. तिथे त्याची भेट घेण्यासाठी अनेक मोठ्या नेत्यांनी रांग लावली. झाकीर नाईक हा भारतातील ‘मोस्ट वाँटेड’ (पोलिसांना हवा असलेला) कुख्यात गुन्हेगारांच्या सूचीतील एक गुन्हेगार आहे. त्याने नेहमीप्रमाणे भारताच्या विरोधात गरळ ओकली आहे. भारतातील प्रस्तावित ‘वक्फ बोर्ड विधेयका’च्या विरोधात सर्व मुसलमानांनी एकत्र येण्याचे त्याने आवाहन केले आहे. झाकीर नाईक भारतातील मुसलमानांना दिल्या जाणार्‍या वागणुकीचे सूत्र आंतरराष्ट्रीय पातळीवर मांडत आहे. मलेशिया, तुर्कीये, पाकिस्तान, सौदी अरेबिया, सीरिया, इराण अशा देशांकडून, तसेच अन्य मार्गांनी झाकीर नाईकला पाठबळ दिले जात आहे.

            पाकिस्तानमध्ये झाकीर नाईकच्या स्वागतासाठी ‘रेड कार्पेट’ (अतीमहनीय व्यक्तींच्या स्वागतासाठी घालण्यात येणारा लाल गालीचा) अंथरण्यात आले. ३० सप्टेंबर ते २८ ऑक्टोबर २०२४ पर्यंत तो पाकिस्तानमध्येच मुक्काम करणार आहे. ‘पाकिस्तान मुस्लीम लीग’चे नेते आणि पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचे निकटवर्ती राणा मशहूद, धार्मिक व्यवहार मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव सय्यद अला-उर-रहमान, धार्मिक व्यवहारांचे संसदीय सचिव शमशेर मजारी आणि इतर नेते नाईक याच्या स्वागतासाठी इस्लामाबाद विमानतळावर उपस्थित होते.

पाकिस्तानमध्ये स्वागताच्या वेळी काही नेत्यांसमवेत झाकीर नाईक (गोलात दाखवलेला)

१. झाकीर नाईकची वादग्रस्त पार्श्वभूमी

५८ वर्षीय झाकीर नाईकचा जन्म मुंबईत झाला. त्याने वैद्यकशास्त्रात उच्च शिक्षण घेतले आहे. वयाच्या २० व्या वर्षापासूनच तो धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमांत सहभागी होऊ लागला होता, तसेच पुढे त्याने ‘इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन (आय.आर्.एफ्.)’ या नावाची संस्था स्थापन केली; मात्र ‘यूएपीए १९६७’ या (बेकायदेशीर कृत्ये (प्रतिबंध) १९६७) कायद्यानुसार भारत सरकारने या संस्थेवर बंदी घातली आहे. पुढे नोव्हेंबर २०२१ मध्ये या संस्थेवरील बंदी ५ वर्षांसाठी वाढवण्यात आली. झाकीर नाईकवर धार्मिक द्वेष पसरवल्याचा आरोप आहे. या प्रकरणी त्याच्यावर भारतात अनेक ठिकाणी गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. यांसह तो अनेक बेकायदेशीर कृत्यांमध्ये सहभागी असल्याचा आरोप आहे. तो आतंकवादी पथकाच्या रडारवर होता; मात्र त्याला पकडण्यापूर्वीच त्याने मलेशियाला पलायन केले.

झाकीर नाईक ‘पीस टीव्ही’ वाहिनीवर धार्मिक प्रवचन द्यायचा. या माध्यमातून तो इतर धर्मांविरोधात द्वेष पसरवायचा. या ‘पीस टीव्ही’ची स्थापना वर्ष २००६ मध्ये झाली होती; मात्र सध्या या वाहिनीवर भारतासह कॅनडा, ब्रिटन, बांगलादेश अशा देशांत बंदी घालण्यात आली आहे. केंद्र सरकारने झाकीर नाईकच्या ‘आय.आर्.एफ्.’ या संस्थेवरही गंभीर आरोप केलेले आहेत. या संस्थेमुळे शांतता, तसेच सामाजिक स्वास्थ्य, बंधुता बिघडण्याची शक्यता आहे.

१ अ. झाकीर नाईक याच्या भाषणातून प्रेरणा घेऊन बांगलादेश आणि भारत येथे झालेल्या जिहादी कारवाया ! : वर्ष २०१६ मध्ये बांगलादेशात काही आतंकवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला, ज्यात अनेक लोकांचा मृत्यू झाला. आतंकवाद्यांनी हे कृत्य करण्यापूर्वी झाकीर नाईक याचे भाषण ऐकले होते, ज्याचा प्रभाव त्यांच्यावर झाला होता. केरळमधील ‘अलप्पुझा-कन्नूर एक्झिक्युटिव्ह एक्सप्रेस’मधील प्रवाशांवर पेट्रोल टाकून त्यांना पेटवून दिल्याची धक्कादायक घटना २ एप्रिल २०२३ या दिवशी घडली. या घटनेप्रकरणी मूळचा देहलीमधील शाहीनबाग येथील रहिवासी असलेला शाहरुख सैफी याला पोलिसांनी अटक केली. या घटनेत ३ जणांचा मृत्यू झाला. अटक करण्यात आलेल्या आरोपीने ‘मला कथित मुसलमान धर्मगुरु झाकीर नाईक याच्याकडून प्रेरणा मिळाली आहे’, असे सांगितले.

१ आ. झाकीर नाईकवर मलेशियामध्ये सार्वजनिक सभांमध्ये बोलण्यास बंदी ! : वर्ष २०१९ मध्ये मलेशियामध्ये झाकीर नाईकने हिंदु आणि चिनी नागरिकांच्या संदर्भात वादग्रस्त विधान केले. या विधानामुळे मलेशियामध्ये वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या होत्या. त्यानंतर तत्कालीन पंतप्रधान महाथीर यांनी ‘झाकीर नाईक याच्याकडून धार्मिक भावना भडकावण्याचे काम केले जात आहे’, अशा भावना व्यक्त केल्या. तेव्हापासून तेथे झाकीर नाईकवर सार्वजनिक सभांमध्ये बोलण्यास बंदी घालण्यात आलेली आहे.

२. झाकीर नाईक मलेशियाच्या सरकारी संरक्षणात

(निवृत्त) ब्रिगेडिअर हेमंत महाजन

मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम भारत दौर्‍यावर आले. २० ऑगस्ट २०२४ या दिवशी त्यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींसमवेत भेट घेतली. त्यानंतर ते ‘इंडियन कौन्सिल ऑफ वर्ल्ड अफेअर्स’मध्ये आयोजित एका कार्यक्रमाला उपस्थित होते. या वेळी त्यांना वादग्रस्त कथित इस्लामी धर्मगुरु आणि अनेक आतंकवादी कारवायांमध्ये सहभागी असलेला आरोपी झाकीर नाईकच्या प्रत्यार्पणाविषयी प्रश्न विचारण्यात आला. यावर इब्राहिम अन्वर म्हणाले, ‘‘झाकीर नाईक विरोधातील सक्षम पुरावे आम्हाला मिळाले, तर त्यावर उचित कार्यवाही केली जाईल; परंतु याविषयीची कोणतीही कार्यवाही करतांना दोन्ही देशांमधील संबंधांवर नकारात्मक परिणाम होता कामा नये, अशी आमची भावना आहे. आमचे सरकार झाकीर नाईक प्रकरणी भारत जे कोणते पुरावे सादर करील, त्याचे स्वागतच करील. ते पुरावे आम्ही विचारात घेऊ. आतंकवादाशी दोन हात करण्यासाठी आम्ही भारत सरकारसमवेत एकत्र काम करत आहोत’’; मात्र त्यानंतर कुठलीही कारवाई करण्यात आली नाही.

३. पाकिस्तान सरकारचा निरर्थक आशावाद

सध्या पाकिस्तानमध्ये वेगवेगळ्या कारणांमुळे प्रचंड हिंसाचार चालू आहे. तेथील नागरिक पाकिस्तान सरकारच्या विरोधात निदर्शने करत आहेत, महागाई वाढलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये झाकीर नाईकच्या प्रवचनांमुळे धर्माच्या छत्राखाली नागरिक एकत्र येतील आणि आपल्या सरकारच्या विरोधातील त्यांच्या कारवाया थांबवतील, अशी पाकिस्तानला आशा वाटत आहे; मात्र तसे काहीच होतांना दिसत नाही. उलट कराची विमानतळावर ७ ऑक्टोबरला झालेल्या आत्मघातकी आक्रमणामध्ये ३ चिनी नागरिक मारले गेले. त्यानंतर चिनी नागरिकांकरता एक ‘ॲडव्हायझरी’ (सूचना) जारी केली गेली की, पाकिस्तान हा धोकादायक देश आहे आणि चिनी नागरिकांनी तिथे जाऊ नये.’

– ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त), पुणे.