सांगली, १४ ऑक्टोबर (वार्ता.) – हिंदुस्थानच्या पुनरुत्थान कार्यात यश संपादन करण्यास शारदीय नवरात्रात श्री दुर्गादेवीचे आशीर्वाद मिळावेत, यासाठी श्री दुर्गामाता दौडीचा प्रपंच आईच्या कृपेने करत आहोत. या उत्सवात देवीचे सर्व भक्त आणि भाविक उपवास, मौनव्रत, पोथी वाचन, जप, तप, होम-हवन, पूजापाठ वगैरे करतात. हे सर्व वैयक्तिक आणि कौटुंबिक स्तरांतून होतच असते. श्री शिवभूपती आणि त्याचे अनुयायी यांच्याप्रमाणेच यश संपादन करण्यास आपणही श्री दुर्गामाता दौडीचे व्रत या अखंड हिंदुस्थानच्या कुटुंबातील ‘राष्ट्रीय नवरात्र’ म्हणून करत आहोत. हे हिंदवी स्वराज्याचे व्रत आहे. आईच्या चरणी एकाग्रतेने आणि शरणागतीने राष्ट्र अन् धर्म यांसाठी सर्वस्वाचा त्याग करण्यासाठी वरदान मागूया, अशी आर्त हाक श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी १२ ऑक्टोबर या दिवशी दसर्यानिमित्त श्री दुर्गामाता दौडीच्या समारोप कार्यक्रमात दिली.