‘वर्ष २००२ मध्ये घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीची स्थापना झाली. कोरोना आपत्तीचा अपवाद वगळला, तर प्रत्यक्ष स्तरावर कार्य करण्यात हिंदु जनजागृती समितीचा नेहमीच पुढाकार असतो. कोरोना महामारीच्या आपत्तीतही घरात बसलेल्या प्रत्येक हिंदूच्या हृदयामध्ये हिंदु राष्ट्राच्या ज्योतीचे एका मशालीत रूपांतर करण्यासाठी आणि त्यांना कृतीशील ठेवण्यासाठी समितीचा पुढाकार होता. म्हणूनच समितीने कोरोनाच्या आपत्तीपूर्वी जे उपक्रम प्रत्यक्ष समाजात चालू होते, तेच उपक्रम ऑनलाईन आधुनिक माध्यमांतून चालू करण्याचा प्रयत्न केला. याची दृश्य रूपातील फलनिष्पत्ती कोरोना आपत्तीनंतर दिसू लागली आहे. हिंदु राष्ट्र-स्थापनेसाठी हिंदूंना सक्रीय करणार्या ‘हिंदु जनजागृती समिती’च्या कोरोना आपत्तीनंतर वृद्धींगत झालेल्या दैवी कार्याचा आलेख सांगणारा हा लेख…
६ ऑक्टोबर या दिवशीच्या लेखात आपण ‘कोरोना महामारीच्या काळात चालू केलेले अभिनव ऑनलाईन उपक्रम आणि दळणवळण बंदीच्या काळात हरिद्वार कुंभमेळ्यात केलेले हिंदु राष्ट्र-स्थापनेचे कार्य’, यांविषयी वाचले. आज या लेखाचा पुढचा भाग येथे देत आहोत.
(भाग २)
भाग १. येथे वाचा – https://sanatanprabhat.org/marathi/841122.html
५. कोरोना महामारीच्या आपत्तीनंतर हिंदूसंघटनाचे कार्य गतीमान होणे
५ अ. ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’चे ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’त रूपांतर होणे : वर्ष २०१२ पासून चालू असलेले अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन कोरोना महामारीच्या आपत्तीनंतर, म्हणजे वर्ष २०२२ पासून केवळ देशपातळीवर न रहाता आंतरराष्ट्रीय स्वरूपात होत असून त्याला मिळणारा प्रतिसादही वाढत चालला आहे. एक प्रकारे अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाचे वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवात रूपांतर झाले आहे.
या अधिवेशनांमुळे हिंदुत्वनिष्ठ विचारांचे विविध क्षेत्रांतील अभ्यासक, तज्ञ, पत्रकार, संत, धर्माचार्य, मंदिरांचे विश्वस्त, पुरोहित, अधिवक्ते, हिंदुत्वनिष्ठ, उद्योजक आदींचे मोठ्या प्रमाणात संघटन झाले आहे. ही अधिवेशने, म्हणजे एक प्रकारचा हिंदु राष्ट्र-स्थापनेसाठी होत असलेल्या हिंदूसंघटनाचा इतिहास आहे. या अधिवेशनातून ‘एक भारत अभियान -चलो कश्मीर की ओर’, ‘मंदिरमुक्ती अभियान’, ‘मंदिर संस्कृती रक्षण अभियान’, ‘वैचारिक परिषद’, ‘हिंदु राष्ट्र समन्वय समिती’, ‘हलालविरोधी चळवळ’, ‘लव्ह जिहाद’, ‘धर्मांतर’, ‘अर्बन नक्षलवादी षड्यंत्र’, ‘हिंदुविरोधी कथानके’ असे अनेक देश पातळीवरील अभियान आणि आंदोलने उभी राहिली आहेत. हिंदुत्वनिष्ठांसाठी हे अधिवेशन, म्हणजे हिंदुत्वाचा कुंभमेळाच असतो. या अधिवेशनाचे वैशिष्ट्य, म्हणजे ‘या अधिवेशनात केवळ भाषणे न होता वर्षभरात आपल्या भागात जाऊन हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात आपण आणि आपली संघटना काय योगदान देणार ?’, हेही ठरवण्यात येते. एक प्रकारे हिंदुत्वनिष्ठांना हिंदु राष्ट्र-स्थापनेसाठी कृतीशील बनवणारे हे व्यासपिठच आहे.
५ आ. ‘हिंदु राष्ट्र समन्वय समिती’ची स्थापना : ‘हिंदु राष्ट्र समन्वय समितीची संकल्पना, म्हणजे जिल्ह्याजिल्ह्यांत हिंदु संघटना, मंदिरे, अधिवक्ते, पत्रकार, विचारवंत आदींच्या एकत्रित सहकार्यातून हिंदूंची ‘इकोसिस्टम’ सिद्ध करणे आणि स्थानिक सरकारशी हिंदूंच्या स्थानिक समस्यांशी संबंधित संवाद साधणारा एक ‘दबाव गट’ सिद्ध करणे होय. समितीने सर्वत्र हिंदु राष्ट्र समन्वय समितीची स्थापना करण्यासाठी पुढाकार घेतला. यात अनेक स्थानिक संघटना सहभागी होत आहेत. हिंदु संघटना एकत्रित येऊन कार्य आणि आंदोलने करू शकतात, हे यातून सिद्ध झाले आहे. महाराष्ट्र, झारखंड, गोवा, कर्नाटक इत्यादी राज्यांत हिंदु राष्ट्र समन्वय समिती सक्रीय झाल्या आहेत.
५ इ. ‘हलाल सक्तीविरोधी अभियाना’ची सफलता : समितीने व्याख्याने आणि पुस्तके वितरण या माध्यमांतून देशभरात राबवलेल्या हलाल सक्तीविरोधी अभियानाला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला. या अभियानातून व्यापारी आणि उद्योजक यांचे संघटन झाले. याविषयी जागृतीसाठी समितीने प्रकाशित केलेल्या ‘हलाल जिहाद’ हा ग्रंथ मराठी, हिंदी, इंग्रजी, कन्नड, तेलुगु, तमिळ, गुजराती भाषांतून प्रकाशित होऊन त्याच्या १ लाख प्रती अल्पावधीत वितरित झाल्या. त्या माध्यमातून समाजात मोठ्या प्रमाणात जागृती झाली. देशभरात सहस्रो बैठकांमधून हा विषय प्रस्तुत करण्यात आला. समितीच्या जागृतीमुळे उत्तरप्रदेश राज्यात सरकारने हलाल उत्पादनांवर बंदी घातली. समितीच्या प्रतिनिधींनी मध्यप्रदेश आणि छत्तीसगड या राज्यात मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्री यांना भेटून ‘या राज्यांतही हलाल उत्पादनांवर बंदी घालण्यात यावी’, अशी मागणी केली आहे.
५ इ १. हलाल सक्तीविरोधी परिषद : मुंबई येथे राष्ट्रीय सावरकर स्मारकामध्ये ‘हलाल सक्तीविरोधी परिषदे’चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमातून मुंबई येथून हलाल सक्तीच्या विरुद्ध रणशिंग फुंकण्यात आले. या कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित होते. मुंबईतील इस्लामिक जिमखाना येथे हलाल उत्पादन करणार्या उत्पादकांसाठी ‘हलाल शो इंडिया’ या नावाने प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. त्याला या परिषदेने विरोध केल्यानंतर कार्यक्रम रहित करावा लागला.
५ इ २. ‘हलाल सक्तीविरोधी कृती समितीं’ची स्थापना : या माध्यमातून संघटित झालेले उद्योजक, व्यावसायिक आणि धर्मनिष्ठ हिंदू यांच्या विविध जिल्ह्यांत ‘हलाल सक्तीविरोधी कृती समिती’ स्थापन झाल्या. या समित्यांनी स्थानिक लोकप्रतिनिधींसह बैठका घेऊन, तसेच त्यांना निवेदने देऊन याविषयाचे गांभीर्य लक्षात आणून दिले. हलाल सक्तीविरोधी कृती समित्यांनी विविध राज्ये आणि जिल्हे यांत घेतलेल्या पत्रकार परिषदांना चांगला प्रतिसाद मिळाला. या समित्यांनी राबवलेल्या ‘हलालमुक्त भारत’, ‘हलालमुक्त दिवाळी’, ‘हलालमुक्त गणेशोत्सव’ अशा जनजागृती अभियानांमधून समाजाचाही प्रतिसाद वाढला.
५ ई. ‘अधिवक्ता संमेलनां’चे आयोजन : दळणवळण बंदीच्या काळात चालू झालेले अधिवक्ता सत्संग आणि समितीच्या संपर्कात आलेले साधकवृत्तीचे अधिवक्ता यांना जोडून ठेवण्यासाठी महाराष्ट्रात फेब्रुवारी २०२३ मध्ये जळगाव येथे विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र येथील अधिवक्त्यांचे संमेलन आयोजित करण्यात आले. त्यानंतर मुंबई येथे पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण क्षेत्रातील अधिवक्त्यांचे संमेलन आयोजित करण्यात आले. अनुमाने २५० साधक अधिवक्त्यांनी या संमेलनाचा लाभ घेतला.
५ उ. ‘मंदिर परिषदां’चे आयोजन : हिंदु जनजागृती समितीच्या कार्यातून विविध जिल्ह्यांतील मंदिरांचे विश्वस्त, पुजारी आणि पुरोहित यांचेही संघटन झाले आहे. या संदर्भात महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक येथे राज्यस्तरीय मंदिर आणि न्यास परिषदांचे आयोजन करण्यात आले आहे. ४ राज्यस्तरीय, ११ जिल्हास्तरीय आणि ४ तालुकास्तरीय मंदिर परिषदांचे वर्ष २०२३ अन् २०२४ मध्ये आयोजन करण्यात आले. याद्वारे १४००० मंदिर विश्वस्तांचे संघटन करण्यात आले. (या उपक्रमाच्या वाढलेल्या प्रतिसादाच्या संदर्भात स्वतंत्र लेख प्रकाशित करण्यात येणार आहे.)
५ ऊ. वारकरी अधिवेशन आणि कीर्तनकार कार्यशाळा : वर्ष २००९ पासून तीर्थक्षेत्र आळंदी (जिल्हा पुणे) येथे वारकरी संप्रदाय, राष्ट्रीय वारकरी परिषद, वारकरी संघटना आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने वारकरी संप्रदायातील कीर्तनकारांचे राष्ट्र-धर्माच्या रक्षणार्थ राज्यव्यापी वारकरी अधिवेशन घेण्यात येते. गेली १८ वर्षे हे वारकरी अधिवेशन नियमितपणे चालू असून या माध्यमातून विविध विषय हाताळले जातात. शेकडो वारकरी संप्रदायातील कीर्तनकार या अधिवेशनाला उपस्थित राहिल्याने या अधिवेशनामध्ये जे विषय मांडण्यात येतात, ते गावोगावी होणार्या हरिनाम सप्ताहांच्या माध्यमातून लाखो लोकांपर्यंत पोचतात. ‘धर्मावरील आघात, लव्ह जिहाद, धर्मांतर, हिंदुंविरोधी षड्यंत्र, हलाल जिहाद’, अशा अनेक गोष्टी सर्वसामान्य लोकांपर्यंत ग्रामीण भागापर्यंत पोचवतात. आज या अधिवेशनाच्या माध्यमातून शेकडो कीर्तनकार हिंदु जनजागृती समितीच्या कार्याशी जोडलेले आहेत. याच अधिवेशनाच्या माध्यमातून आता देहू, पैठण, पंढरपूर अशा ठिकाणीसुद्धा अशी वारकरी अधिवेशन आणि कीर्तनकार कार्यशाळा घेण्यास आरंभ झालेला आहे. या कार्यशाळांमधून हिंदु राष्ट्राचा प्रत्यक्ष विचार कसा मांडायचा, हेही नवीन कीर्तनकार शिकत आहेत.
५ ए. हिंदु विचारवंतांच्या बैठकांचे आयोजन : हिंदुत्वनिष्ठ संघटना प्रत्यक्ष मोठ्या प्रमाणावर कार्य करत आहेत. त्यांना वैचारिक स्तरावर प्रशिक्षण देणारी कुठलीही अशी व्यवस्था नव्हती, तसेच काळानुसार एकमेकांना वैचारिक सहयोग करणारी हिंदुत्वनिष्ठांची ‘इकोसिस्टम’ (यंत्रणा) आवश्यक होती. यासाठी समविचारी हिंदुत्वनिष्ठ विचारक, लेखक, वक्ते आणि संपादक यांच्या एकत्रिकरणातून देहली येथे वर्ष २०२३ मध्ये पहिली विचारवंतांची बैठक घेण्यात आली. त्यानंतर मुंबई, रांची (छत्तीसगड) आणि बेंगळुरू (कर्नाटक) येथे विचारवंत बैठकांचे आयोजन करण्यात आले. हिंदु राष्ट्रविरोधी आक्षेपांचे वैचारिक खंडण करणे, शहरी नक्षलवादी आणि निधर्मीवादी यांची षड्यंत्रे उघड करणे अन् हिंदुत्वाच्या चळवळीला वैचारिक पाठबळ देणे’, हा या विचारवंतांच्या बैठकांचा मुख्य उद्देश आहे.
६. कोरोना आपत्तीनंतर धर्मप्रेमी-साधक घडवणार्या उपक्रमांना मिळालेला प्रतिसाद
६ अ. धर्मशिक्षणवर्ग : हिंदु जनजागृती समितीच्या वतीने संपूर्ण देशभरामध्ये निद्रिस्त हिंदूंना धर्मशिक्षित आणि धर्मजागृत करण्यासाठी धर्मशिक्षणवर्गांचे आयोजन करण्यात येते. धर्मशिक्षणवर्गातून जागृत झालेल्या धर्मप्रेमींना हिंदु राष्ट्र-स्थापनेच्या कार्यात लवकरात लवकर सक्रीय करता यावे, यासाठी वर्ष २०२३ मध्ये समितीने १२ धर्मशिक्षणवर्गांचा अभ्यासक्रम बनवला आहे. परिणामी अवघ्या ३ मासांच्या कालावधीत धर्मप्रेमी हा समष्टी धर्मकार्य करणारा धर्मप्रेमी-साधक बनत आहे. धर्मशिक्षणवर्गांचा वाढता आलेख पुढे दिला आहे.
(टीप : गावागावांत होणारे धर्मशिक्षणवर्ग ऑनलाईन करण्यात आले. काही ठिकाणी लोकांना इंटरनेटचे ज्ञान नसल्याने धर्मशिक्षणवर्ग ऑनलाईन करण्यात मर्यादा आल्या. यातील बरेच वर्ग पुढे अध्यात्माची आवड असणार्यांसाठी, तसेच राष्ट्र-धर्म कार्याची आवड असणार्यांसाठी शाखा, तसेच बैठका यांमध्ये रूपांतरित झाले.)
६ आ. स्वसंरक्षणवर्ग : समाजाला अन्याय आणि अत्याचार यांपासून स्वतःचे आणि कुटुंबियांचे रक्षण करता यावे, या हेतूने समिती सर्वत्र निःशुल्क स्वसंरक्षण वर्ग आयोजित करते. वर्ष २०२१ ते मे २०२४ पर्यंत महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक राज्यांत ५१६ नियमित स्वसंरक्षण वर्गांतून ५३०० युवक-युवती प्रशिक्षित झाले आहेत, तसेच युवकांसाठी ‘शौर्यजागृतीवर्ग’ या ७ दिवसांच्या अभ्यासक्रमाच्या अंतर्गत वर्ष २०२० ते मे २०२४ या कालावधीत ३५३ वर्ग आयोजित होऊन त्यातून ४२०९ युवक-युवती प्रशिक्षित झाले आहेत. शौर्यजागृती वर्गातून प्रशिक्षित होणार्या युवक-युवतींना आता समितीकडून प्रमाणपत्रही देण्यात येऊ लागले आहे.
देहलीतील श्रद्धा वालकर असेल किंवा बदलापूरची यशश्री शिंदे असेल, या सर्व घटना म्हणजे वासनांधांच्या नजरेला फसलेल्या पडलेल्या युवती. असे असतांनासुद्धा संपूर्ण राज्यांमध्ये लव्ह जिहादविरोधी कायदा होत नाही. या घटना घडत असतांना हिंदू युवतींना स्वयंपूर्ण आणि सक्षम बनवण्यासाठी युवतींसाठी आयोजित केल्या जात असलेल्या वर्गांना विशेष प्रतिसाद मिळत आहे. हा वर्ग चालू करण्यापूर्वी ‘आता रडायचे नाही लढायचे’, असे ब्रीदवाक्य असलेले शौर्यजागृती शिबिर आयोजित करण्यात येते. या शिबिरांना समाजातून उत्स्फूर्तपणे युवक-युवतींचा प्रतिसाद मिळाला आहे. या स्वसंरक्षण वर्गांच्या माध्यमातून हनुमान जयंतीला सामूहिक गदापूजन, विजयादशमीला शस्त्रपूजन, छत्रपती शिवरायांच्या गडांची स्वच्छता अशा विविध उपक्रम राबवण्यात येतात. याविषयीचा आढावा पुढे दिला आहे.
६ इ. प्रथमोपचारवर्ग : प्रथमोपचारवर्ग हा हिंदु जनजागृती समितीचा समाजसाहाय्य करणारा उपक्रम आहे. ‘पूर, भूकंप, युद्धजन्य परिस्थिती, आग लागणे, अशा आपत्कालीन स्थितींत स्वरक्षण कसे करावे किंवा दक्षता कशी घ्यावी ?’, या संदर्भात समाजाला दिशादर्शन करण्यासाठी निःशुल्क प्रथमोपचार वर्ग समिती आयोजित करते. या प्रथमोपचार वर्गांना समाजातील महिलांपासून अगदी युवकांपर्यंत, तसेच हिंदु संघटना आणि आस्थापने यांच्याकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. या वर्षभरात या उपक्रमाचे संख्यात्मक विवरण पाहिल्यानंतर हा समाजसाहाय्याचा उपक्रम किती मोठ्या प्रमाणात चालू आहे, याची कल्पना येईल.
या उपक्रमांतून या वर्षभरात ६० जण प्रगत स्तरावर प्रथमोपचार करू शकणारे आणि ९२ जण साहाय्यक प्रथमोपचारक बनले आहेत.
७. गावागावांत हिंदु जनजागृती समितीच्या शाखा आणि रणरागिणी शाखांना प्रारंभ
हिंदु जनजागृती समितीचे कार्य दिवसेंदिवस वाढत आहे आणि तळागाळापर्यंत पसरत आहे. अनेक जण समितीच्या माध्यमातून हिंदु राष्ट्रासाठी योगदान देण्यासाठी आणि स्वतःच्या गावात कार्य करण्यासाठी सिद्ध आहेत. अशा धर्मप्रेमींच्या माध्यमातून समितीने आता गावोगावी समितीच्या शाखा निर्माण करायला प्रारंभ केला आहे. वर्तमानमध्ये ५५ हून अधिक ठिकाणी शाखा प्रारंभ झाल्या आहेत. ज्या ठिकाणी केवळ महिला एकत्रित येत आहेत, तेथे समितीच्या ‘रणरागिणी’ शाखा चालू करण्यात येत आहेत. या शाखांच्या माध्यमातून समितीचे विविध उपक्रम आणि आंदोलने राष्ट्रीय पातळीपासून गावपातळीपर्यंत राबवण्यासाठी आरंभ झाला आहे. या शाखांमुळे गावागावांत जोडल्या गेलेल्या युवक-युवतींसह धर्मप्रेमींची कृतीशीलता वाढण्यासाठी साहाय्य झाले आहे.
(क्रमशः पुढच्या रविवारी)
–श्री. सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती.
याच्या नंतरचा भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/846204.html