हिंदु राष्ट्र-स्थापनेसाठी हिंदूंना सक्रीय करणार्‍या ‘हिंदु जनजागृती समिती’चे वृद्धींगत झालेले दैवी कार्य !

‘वर्ष २००२ मध्ये घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीची स्थापना झाली. कोरोना आपत्तीचा अपवाद वगळला, तर प्रत्यक्ष स्तरावर कार्य करण्यात हिंदु जनजागृती समितीचा नेहमीच पुढाकार असतो. कोरोना महामारीच्या आपत्तीतही घरात बसलेल्या प्रत्येक हिंदूच्या हृदयामध्ये हिंदु राष्ट्राच्या ज्योतीचे एका मशालीत रूपांतर करण्यासाठी आणि त्यांना कृतीशील ठेवण्यासाठी समितीचा पुढाकार होता. कोरोनाच्या आपत्तीपूर्वी जे उपक्रम प्रत्यक्ष समाजात चालू होते, तेच उपक्रम ऑनलाईन आधुनिक माध्यमांतून चालू करण्याचा प्रयत्न केला. याची दृश्य रूपातील फलनिष्पत्ती कोरोना आपत्तीनंतर दिसू लागली आहे. हिंदु राष्ट्र-स्थापनेसाठी हिंदूंना सक्रीय करणार्‍या ‘हिंदु जनजागृती समिती’च्या कोरोना आपत्तीनंतर वृद्धींगत झालेल्या दैवी कार्याचा आलेख सांगणारा हा लेख…

            आतापर्यंतच्या लेखात आपण ‘कोरोना महामारीच्या काळात चालू केलेले अभिनव ऑनलाईन उपक्रम, दळणवळण बंदीच्या काळात हरिद्वार कुंभमेळ्यात केलेले हिंदु राष्ट्र-स्थापनेचे कार्य आणि कोरोना महामारीच्या आपत्तीनंतर हिंदूसंघटनाचे कार्य गतीमान होणे’, यांविषयी वाचले. आज या लेखाचा अंतिम भाग येथे देत आहोत. (भाग ३)

याच्या आधीचा भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/843634.html

हिंदु राष्ट्र-जागृती सभेमध्ये ग्रंथाचे प्रकाशन करतांना डावीकडून अधिवक्ता समीर पटवर्धन, सद्गुरु स्वाती खाडये, श्री. ईश्वरप्रसाद खंडेलवाल आणि श्री. मनोज खाडये

८. हिंदु जनजागृती समितीच्या ‘हिंदु राष्ट्र जागृती सभा’ आता समविचारी संघटनांनी आयोजित करणे

वर्ष २००८ पासून ‘हिंदु जनजागृती समिती’ ही हिंदु राष्ट्र-जागृती सभांचे आयोजन करत आहे. आजपर्यंत १३ राज्यांमध्ये २२२६ हिंदु राष्ट्र-जागृती सभा आयोजित करण्यात आल्या आहेत. या माध्यमातून २२ लाखांहून अधिक हिंदूंपर्यंत जागृती करण्यात आली आहे. एकाच वेळी सहस्रो हिंदूंमध्ये हिंदु राष्ट्राची जागृती करणार्‍या या सभा समितीचा महत्त्वपूर्ण उपक्रम बनला आहे. या सभांना कोणतीही राजकीय व्यक्ती किंवा लोकप्रिय कलाकार नसतांना अगदी ५ सहस्रांच्या उपस्थितीपासून २५ सहस्रांच्या उपस्थितीपर्यंत प्रतिसाद मिळणे’, ही केवळ भगवंताचीच कृपा आहे. वर्ष २०२३ पासून अशा प्रकारच्या सभांचे आयोजन समितीच्या माध्यमातून सह समविचारी संघटनांनी स्वतःहून पुढाकार घेऊन आयोजित करण्यास आरंभ केला आहे. या वर्षी हुपरी (जिल्हा कोल्हापूर, महाराष्ट्र) या ठिकाणी झालेल्या सभेला १४ सहस्रांहून अधिक उपस्थिती होती. संभाजीनगर जिल्ह्यातील बिडकीन या ठिकाणी झालेल्या धर्मसभेचे आयोजन स्थानिक धर्मप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ यांनी केलेले होते, यालासुद्धा १५ सहस्र ५०० हून अधिक उपस्थिती होती. जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथे हिंदुत्वनिष्ठांनी आयोजित केलेल्या धर्मजागृती सभेला १४ सहस्रांहून अधिक उपस्थिती होती. एकंदरीतच उत्तरोत्तर हे धर्मसभांचे कार्य वाढून हिंदु राष्ट्राच्या विचारांचे समर्थक वाढत चाललेले आहेत. यातून ‘हिंदु राष्ट्राची स्थापना आता दूर नाही’, हे लक्षात येत आहे.

८ अ. मोठ्या सभांप्रमाणे लहान सभांनाही गावागावांतून उत्तम प्रतिसाद मिळणे : ज्याप्रमाणे मोठ्या धर्मसभांना प्रतिसाद मिळतो, त्याचप्रमाणे छोट्या छोट्या गावांमध्ये आयोजित केलेल्या ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभां’नाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो. संपूर्ण गावच त्या सभेच्या आयोजनामध्ये सहभागी झालेले असते. त्या त्या गावातील युवक त्यांच्या  गावातील धर्मसभांच्या आयोजनामध्ये पुढाकार घेतात आणि यानंतर त्या गावांमध्ये धर्मशिक्षणवर्ग, स्वसंरक्षणवर्ग आणि समितीच्या शाखा चालू होतात. गावातील अनेक युवक राष्ट्र-धर्म कार्यासाठी कृतीशील होतात. त्यामुळे हिंदुत्वाच्या कार्याला संपूर्ण गाव जोडले जाते आणि हिंदुत्वाच्या चळवळीत त्यांचा सहभाग वाढतो. एका सभेतून अनेक सभांची मागणी येते आणि त्याचे आयोजन अगदी आपल्या संपर्कात असलेले समाजातील अनेक धर्मप्रेमी करतात. त्या सभा यशस्वीही होतात. असाही अनुभव काही जिल्ह्यांमधून येत आहे.

९. राष्ट्र-धर्म रक्षिण्यासाठी आंदोलने आणि सफलता

९ अ. हिंदु जनसंघर्ष मोर्चांचे आयोजन : वर्ष २०२२ मध्ये महाराष्ट्रात श्रद्धा वालकर आणि रूपाली चंदनशिवे यांच्या हत्या ‘लव्ह जिहाद’च्या कटकारस्थानातून झाल्यामुळे ‘या नराधमांना तात्काळ फाशीची शिक्षा व्हावी’, तसेच प्रस्तुत खटले जलद गती न्यायालयामध्ये चालावेत’, या मागणीसाठी समितीच्या पुढाकाराने महाराष्ट्रातील नागपूर, जळगाव, दर्यापूर, अमरावती, गडहिंग्लज, कोल्हापूर, संभाजीनगर येथे हिंदु जनसंघर्ष मोर्चांचे आयोजन करण्यात आले. गोवा राज्यातही हा मोर्चा वर्ष २०२३ मध्ये काढण्यात आला. प्रत्येक मोर्चामध्ये सहस्रो लोक सहभागी झाले होते.

९ अ १. महाराष्ट्रात ‘लव्ह जिहाद’च्या कायद्याची मागणी करण्यासाठी नागपूर येथील विधीमंडळ अधिवेशनात मुख्यमंत्र्यांची भेट घेणे : महाराष्ट्रात झालेल्या जनसंघर्ष मोर्चाच्या माध्यमातून एक वर्ष झाले, तरी सरकारने कायदे केलेले नव्हते; म्हणून सरकारचा पाठपुरावा करण्यासाठी नागपूर येथील हिवाळी विधीमंडळ अधिवेशनाच्या वेळेस महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये झालेल्या मोर्च्यांच्या आयोजकांना एकत्रित करून महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. या संदर्भात तात्काळ हालचाली करून हा कायदा महाराष्ट्रात लागू करण्याविषयी त्यांना सांगण्यात आले. माननीय मुख्यमंत्र्यांनी ‘याविषयी सरकार गंभीर असून या संदर्भात आम्ही लवकरच कायदा करत आहोत’, असे आश्वासन देऊन त्या पद्धतीचे प्रयत्न चालू आहेत’, असे आम्हाला सांगितले.

९ आ. छत्रपती संभाजीनगरच्या नामकरणाच्या समर्थनार्थ आयोजित मोर्चाला ७५ सहस्र हिंदू उपस्थित रहाणे : औरंगाबाद जिल्ह्याचे ‘छत्रपती संभाजीनगर’ असे नवनामकरण झाल्यानंतर त्याला राजकीय पक्ष आणि धर्मांध यांनी विरोध केला. त्यामुळे ‘छत्रपती संभाजीनगर’ या नामकरणाच्या समर्थनार्थ हिंदु जनजागृती समिती आणि स्थानिक हिंदू संघटना यांच्या पुढाकारातून मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला ७५ सहस्र हिंदूंनी उपस्थित रहाणे, हा एक इतिहास होता !

गड-दुर्ग रक्षण महामोर्चा

९ इ. महाराष्ट्र गड-दुर्ग रक्षण समितीची स्थापना : मार्च २०२२ मध्ये मुंबई येथे महाराष्ट्रातील गड-दुर्ग यांच्या रक्षणासाठी ‘महाराष्ट्र गड-दुर्ग रक्षण समिती’ची स्थापना करण्यात आली. महाराष्ट्रातील गड-दुर्ग यांच्या रक्षणार्थ राज्यव्यापी मोर्चे काढण्यात आले होते. या मोर्चांमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील ९५ हून अधिक गड-दुर्गप्रेमी संघटना, गडरक्षण संघटना, हिंदुत्वनिष्ठ संघटना उपस्थित होत्या. यामध्ये प्रामुख्याने ‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड-दुर्गांवर झालेली इस्लामी अतिक्रमणे तात्काळ हटवण्यात यावीत आणि गड-दुर्ग अतिक्रमणमुक्त करण्यात यावेत, विशाळगडावरील अतिक्रमणे हटवण्यात यावीत, महाराष्ट्रभरातील ४५ हून अधिक गड-दुर्गांवर झालेले अतिक्रमण काढण्यात यावे, छत्रपतींच्या गड-दुर्गांचा अभ्यासक्रमामध्ये समावेश करण्यात यावा’, अशा विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले होते. मुंबईतील या आंदोलनाला २५०० हून अधिक गडप्रेमी, शिवप्रेमी आणि धर्मप्रेमी उपस्थित होते.

या आंदोलनामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या वतीने कॅबिनेट मंत्री श्री. मंगल प्रभात लोढा यांनी त्या ठिकाणी येऊन आश्वासन दिले. ‘आम्ही या गड-दुर्गांवरील अतिक्रमणे तात्काळ काढण्यासाठी समयबद्ध कार्यक्रम आखलेला आहे, तसेच गड-दुर्गांचे संवर्धन आणि रक्षण यांसाठी ‘महाराष्ट्र गड-दुर्ग रक्षण महामंडळाची’ स्थापनासुद्धा करण्यासाठी प्रयत्न करत आहोत’, असे त्यांनी आश्वासन दिले. त्या ठिकाणी विविध गडप्रेमी संघटना आणि शिवप्रेमी संघटना हिंदु जनजागृती समितीवर विश्वास ठेवून उपस्थित झाल्या होत्या. संपूर्ण राज्यभरात या मोर्चाला मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळाली. या माध्यमातूनसुद्धा गड-दुर्ग रक्षणाचा संदेश समाजामध्ये मोठ्या प्रमाणावर पोचला.

९ ई. ‘सेव्ह कल्चर सेव्ह भारत’ (संस्कृती वाचवा, भारत वाचवा) अभियानात कृतीशील सहभाग ! : माजी केंद्रीय माहिती आयुक्त श्री. उदय माहुरकर यांनी ‘चित्रपट आणि वेब सिरीज यांच्या माध्यमातून प्रसारित केल्या जाणार्‍या अनैतिकता आणि अश्लीलता यांच्या विरोधात राष्ट्रव्यापी ‘सेव्ह कल्चर सेव्ह नेशन’, हे अभियान चालू केले आहे. ‘भावी पिढीला आपला धर्म-संस्कृती यांचे महत्त्व लक्षात यावे आणि त्या पिढीची वाताहत थांबावी’, या उदात्त हेतूने समितीही या अभियानात सक्रीय सहभागी आहे. मुंबईत या अभियानाच्या अंतर्गत समितीने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला महाविद्यालयातील युवक-युवतींचा आणि शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या कार्यक्रमानंतर शिक्षकांनी ‘आमच्या महाविद्यालयामध्ये अशा प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन करा. आम्ही आपल्याला सर्व प्रकारचे साहाय्य करू’, असे आश्वासन दिले. या कार्यक्रमाला उपस्थित पालकांनीही ‘आपल्या कार्यक्रमाला नियमित बोलवा’, असे आम्हाला सांगितले.

९ उ. हिंदु जनजागृती समितीद्वारा महत्त्वाच्या विषयावर आयोजित ‘ट्विटर ट्रेंड’ (ट्विटरवर घडवलेली चर्चा) हे ‘पहिल्या ५’मध्ये येणे : हिंदु जनजागृती समितीच्या फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअप या सर्व समाजमाध्यमांमधून मोठ्या प्रमाणावर जनजागृती अन् धर्मप्रसार करण्यात येऊ लागला.

सध्या हिंदु जनजागृती समितीद्वारे कुठल्याही महत्त्वाच्या विषयावर ‘ट्विटर ट्रेंड’ (ट्विटरवर घडवलेली चर्चा) आयोजित केला, तर ताे सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांनी अगदी सहजपणे देशभरात ‘पहिल्या ५’मध्ये येतो किंवा या संदर्भात जनजागृतीच्या माध्यमातून केलेले लिखाण आणि व्हिडिओज लाखो लोकांपर्यंत पोचतात.

९ ऊ. तुळजापूर मंदिर घोटाळाप्रकरणी समितीचा लढा : महाराष्ट्राची आराध्यदेवता श्री तुळजाभवानीमातेचे मंदिर शासकीय नियंत्रणात आहे, म्हणजेच मंदिराचे सरकारीकरण झालेले आहे. या सरकारीकरण झालेल्या देवस्थानामध्ये वर्ष १९९१ ते वर्ष २००९ या कालावधीत सिंहासन दानपेटीच्या लिलावात मोठा अपहार झाला होता. श्री तुळजाभवानीदेवीच्या चरणी भाविकांनी अर्पण केलेले १२० किलो सोने, ४८० किलो चांदी, २४० कोटी रुपयांची रोख रक्कम आणि अन्य अर्पण साहित्य इत्यादींचा अपहार प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, विश्वस्त, लिलावधारक यांनी संगनमताने केला होता. विधीमंडळात या भ्रष्टाचाराविषयी चर्चा होऊन चौकशी अहवाल मागवण्याचा निर्णय झाला. या चौकशी अहवालानुसार दानपेटी लिलावात ८ कोटी ४५ लाख ९७ सहस्र रुपयांचा घोटाळा झालेला असून, त्यात दोषी म्हणून ९ लिलावदार, ५ तहसीलदार, १ लेखापरीक्षक, १ धार्मिक सहव्यवस्थापक यांच्यावर ठपका ठेवण्यात आला, तसेच त्यांच्यावर मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपिठाने गुन्हे नोंदवण्याची महत्त्वपूर्ण शिफारस केली होती.

असे असूनही महाराष्ट्र सरकारने सर्व दोषींवर प्रथमदर्शी अहवाल (एफ्.आय.आर्.) प्रविष्ट (दाखल) करून त्यांना अटक केली नव्हती; म्हणूनच हिंदु जनजागृती समितीने मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपिठात याचिका प्रविष्ट केली. यात म्हटले होते, ‘देवनिधीची लूट करणे हे महापाप आहे, हे लक्षात घेता महाराष्ट्र सरकारने या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून तात्काळ सर्व दोषींवर ‘एफ्.आय.आर्.’ प्रविष्ट करावा. त्यांना अटक करावी, तसेच त्यांच्याकडून देवस्थानच्या लुटीची रक्कम चक्रवाढ व्याजासह वसूल करावी, तसेच ज्या प्रशासकीय अधिकार्‍यांनी आरोपींना वाचवण्याच्या हेतूने नव्याने चौकशी करण्याचे आदेश दिले, चौकशीला मर्यादा असल्याची कारणे देत कर्तव्यात कसूर केली, त्यांच्यावर हक्कभंगाची आणि मा. न्यायालयाचा अवमान केल्याविषयी कारवाई करावी !’’

९ मे २०२४ या दिवशी मुंबई उच्च न्यायालयाने या संदर्भात ‘दोषींवर तात्काळ गुन्हे नोंदवावेत, तसेच पोलीस अधीक्षक दर्जाच्या अधिकार्‍यांच्या माध्यमातून ही चौकशी करण्यात यावी’, असा आदेश दिला.

सरकारीकरण झालेले शिर्डी संस्थान, सिद्धिविनायक मंदिर (मुंबई), पंढरपूर देवस्थान, तसेच पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती अंतर्गत येणारे श्री महालक्ष्मी देवस्थान (कोल्हापूर) यांच्यात सरकारीकरणामुळे होत असलेल्या भ्रष्टाचाराविरुद्ध समिती आंदोलने, पत्रकार परिषदा आदी माध्यमांतून आजही वैधानिक लढा देत आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात मंदिर सरकारीकरणाच्या दुष्परिणामांविषयी जागृती झाली आहे.

९ ए. सनातन धर्मरक्षक अभियान : ‘सनातन धर्मरक्षक अभियाना’च्या अंतर्गत महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या राज्यांमध्ये ‘मी सनातन धर्मरक्षक’ हे अभियान राबवण्यात आले. नास्तिकतावादी, पुरोगामी, हिंदुविरोधी मंडळी आदींकडून सनातन धर्मावर आघात केले जातात. मध्यंतरी तमिळनाडूचे मंत्री उदयनिधी स्टॅलिन, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जितेंद्र आव्हाड, तसेच पत्रकार निखिल वागळे आदींनी ‘सनातन धर्म रोगासारखा आहे; सनातन धर्म ‘एच्.आय.व्ही.’ (एड्स)पेक्षा भयानक आहे; सनातन धर्म म्हणजे देशाला लागलेली कीड आहे’, अशा प्रकारची वक्तव्ये केली. या वक्तव्यांचा म्हणावा तसा विरोध झाला नाही. या पार्श्वभूमीवर या वक्तव्यांना विरोध करण्याचा आत्मविश्वास हिंदूंमध्ये निर्माण व्हावा, तसेच सनातन धर्मविरोधी वक्तव्ये करणार्‍यांवर कारवाई व्हावी, यांसाठी ‘सनातन धर्मरक्षक अभियान’ राबवण्यात आले. या अभियानाच्या अंतर्गत जवळपास २५० हून अधिक व्याख्याने घेण्यात आली. त्यामध्ये १० सहस्रांहून अधिक जण सहभागी झाले होते. या अभियानामुळे जी जागृती झाली, त्यामुळे धर्मविरोधी वक्तव्य करणार्‍यांच्या विरोधात १०० हून अधिक तक्रारी नोंदवण्यात आल्या.

१०. हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रेमी-साधक-निर्मितीच्या दृष्टीने वार्षिक अवलोकन

श्री. सुनील घनवट

वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव पार पडल्यानंतर हिंदु जनजागृती समितीच्या राष्ट्रीय शिबिरात वार्षिक कार्याचे अवलोकन करण्यात आले. गेल्या वर्षभरात विविध उपक्रमांच्या माध्यमातून किती धर्मप्रेमी जोडले गेले आहेत, ते केवळ कार्य करणारे आहेत कि कार्य हे साधना म्हणून करणारे आहेत ?, याचा अभ्यास करण्यात आला. याविषयीचा वर्ष २०२३-२०२४ याचा आढावा पुढे दिला आहे.

११. आळंदी देवाची (जिल्हा पुणे) येथे ‘वारकरी संमेलना’ला १ सहस्रहून अधिक वारकरी अन् कीर्तनकार यांची उपस्थिती

वारकरी संमेलनाला उपस्थित वारकरी अन् कीर्तनकार

आळंदी देवाची (जिल्हा पुणे) येथे २८ सप्टेंबर २०२४ या दिवशी प्रदक्षिणा मार्गावरील ‘फ्रुटवाले धर्मशाळा’ येथे ‘वारकरी संमेलन’ उत्साही वातावरणात पार पडले. या संमेलनात ‘हिंदु धर्म आणि राष्ट्रासमोरील आव्हाने अन् उपाय’ या विषयावर प्रमुख वक्त्यांनी मार्गदर्शन केले. संमेलनाचे आयोजन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने करण्यात आले होते. या संमेलनात वारकरी संप्रदाय, तसेच हिंदु धर्म आणि देवता यांच्या विरोधात चालू असलेले षड्यंत्र हाणून पाडण्याचा १ सहस्रहून अधिक वारकरी अन् कीर्तनकार यांनी निर्धार केला.

१२. क्षमता आणि प्रकृती यांनुसार दायित्व वितरण करणारे समितीचे ‘संघटनात्मक बांधणी’ अभियान

राष्ट्रीय शिबिरात समितीच्या कार्याची व्याप्ती मोठ्या प्रमाणावर वाढून प्रतिदिन नवनवीन उपक्रम आणि आंदोलने उभी रहात आहेत. या दृष्टीने नव्याने जोडल्या गेलेल्या धर्मप्रेमींना कार्यात्मक रचनेत सहभागी करवून घेण्याच्या दृष्टीने समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार प्रत्येक जिल्ह्यात संघटनात्मक बांधणी करण्यात येणार आहे. यात समितीची शाखास्तरापर्यंत बांधणी करण्यात येईल, तसेच समितीशी जोडलेल्या अधिवक्त्यांसाठी ‘अधिवक्ता समिती’ हा नवीन उपक्रम असणार असून त्याद्वारे सर्व अधिवक्त्यांना धर्मकार्यात सक्रीय करण्यात येणार आहे. समितीच्या आंदोलनात सहभागी होणार्‍या जिल्ह्याजिल्ह्यांतील सर्व हिंदुत्वनिष्ठ संघटना यापुढे ‘हिंदु राष्ट्र समन्वय समिती’ या नावाने कार्य करणार आहेत. समितीच्या मंदिर संघटनेतून जोडले गेलेले मंदिर विश्वस्त आणि पुजारी हे जिल्ह्याजिल्ह्यांत ‘मंदिर महासंघ’ या उपक्रमाद्वारे सक्रीय होणार आहेत. जे उद्योगपती आणि ‘सीए’ (सनदी लेखापाल) ‘हलाल सक्तीविरोधी कृती समिती’च्या माध्यमातून जोडले गेले आहेत, ते ‘उद्योगपती परिषदे’च्या माध्यमातून सक्रीय होणार आहेत. अशा प्रकारची संघटनात्मक बांधणी केल्याने येणार्‍या काळामध्ये अनेक जण दायित्व घेऊन सिद्ध होतील. क्षमतेनुसार आणि प्रकृतीनुसार दायित्व-वितरण करणारी ही संघटनात्मक बांधणी, म्हणजे एक प्रकारे हिंदु राष्ट्र स्थापनेचा हा पायाच ठरणार आहे.

काळानुसार समितीची संघटनात्मक बांधणी होणे, हे केवळ दैवी नियोजन आहे, याची अनुभूती आम्ही सर्व हिंदु जनजागृती समितीच्या माध्यमातून सेवा करणारे साधक घेत आहोत. यासाठी भगवान श्रीकृष्णाच्या चरणी कोटीश: कृतज्ञता ! (समाप्त)

– श्री. सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती.