Maldives President Muizzu : (म्हणे) ‘आम्ही कधीच भारताच्या विरोधात नव्हतो !’ – मालदीवचे राष्ट्रपती महंमद मुइज्जू

मालदीवचे भारतविरोधी आणि चीनप्रेमी राष्ट्रपती महंमद मुइज्जू यांचा सारवासारव करण्याचा प्रयत्न !

मालदीवचे राष्ट्रपती महंमद मुइज्जू

न्यूयॉर्क (अमेरिका) – आम्ही कधीही कोणत्याही देशाच्या विरोधात नाही. मालदीवच्या लोकांना परदेशी सैनिकांची समस्या होती. लोकांना देशात एकही परदेशी सैनिक नको होता, असे सांगत मालदीवचे राष्ट्रपती महंमद मुइज्जू यांनी ते भारताच्या विरोधात नसल्याचा दावा केला आहे. मुइज्जू सध्या अमेरिकेत संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत सहभागी होण्यासाठी येथे आले आहेत. त्या वेळी ते प्रिन्स्टन विद्यापिठात गेले असता तेथे त्यांनी हे विधान केले. मुइज्जू लवकरच भारताच्या पहिल्या अधिकृत दौर्‍यावर येणार आहेत.

मुइज्जू म्हणाले की, सामाजिक माध्यमांतून भारतीय पंतप्रधानांचा अपमान करणार्‍या आमच्या मंत्र्यांवर आम्ही कारवाई केली आहे. असे कुणी बोलू नये. असा अपमान मी कुणाचाही, मग तो नेता असो वा सामान्य माणूस, सहन करणार नाही. प्रत्येकाचा स्वतःचा आदर आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

मालदीव सरकारमधील महिला मंत्री मलशा शरीफ आणि मरियम शिउना यांनी सामाजिक माध्यमांतून पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात टिप्पणी केली होती. यानंतर भारतात मालदीवच्या विरोधात संताप व्यक्त होत होता.

संपादकीय भूमिका

गेल्या काही महिन्यांत मालदीवचे भारतासंबंधातील वर्तन पहाता मुइज्जू किती खोटे बोलत आहेत, हे स्पष्ट होते ! भारतीय पर्यटकांअभावी मालदीवची आर्थिक स्थिती बिकट होऊ लागल्याने ते आता भारताला खुश करण्याचा आटापिटा करत आहे, हेच लक्षात येते !