‘हर घर दुर्गा !’

आत्मसंरक्षणाचे प्रशिक्षण

महाराष्ट्रातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये (आयटीआय) ‘हर घर दुर्गा अभियान’ (प्रत्येक घरी ‘दुर्गा’) राबवण्यात येणार आहे. या अभियानाच्या माध्यमातून विद्यार्थिनींना वर्षभर आत्मसंरक्षणाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. शारीरिक शिक्षणाप्रमाणेच वर्षभर महिलांसाठी कराटे, ज्युडो यांसारख्या स्वसंरक्षणाच्या पायाभूत प्रशिक्षणाच्या आठवड्यातून २ तासिका घेण्यात येणार आहेत. त्याद्वारे आपत्कालीन आणि आव्हानात्मक परिस्थितीत सक्षमपणे लढण्याची शक्ती महिलांना देण्यात येणार आहे. हे प्रशिक्षण देण्यासाठी स्थानिक स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य घेण्यात येणार असून विद्यार्थिनींना नियमित सरावासाठी उद्युक्त करण्यात येणार असल्याचे महाराष्ट्राचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी नुकतेच एका पत्रकार परिषदेत सांगितले. महाराष्ट्राची सद्यःस्थिती बघता वर्षभरात लव्ह जिहादमधून होणार्‍या हत्या, सामूहिक बलात्कार, छेड काढणे, अपहरण आणि फसवणूक यांसारख्या अनेक घटनांमध्ये सर्वच वयोगटातील, म्हणजे कोवळ्या वयातील मुलींपासून ६० वर्षांपेक्षा अधिक वयाच्या महिलांना त्रास सहन करावा लागला आहे. त्या दृष्टीने सर्वच वयोगटांतील महिलांनी आपत्कालीन आणि आव्हानात्मक परिस्थितीत लढण्यासाठी सक्षम होणे अत्यंत आवश्यक आहे. नव्हे ती काळाची आवश्यकता आहे. ज्याप्रमाणे महिलांवरील अत्याचार सर्वत्र होत आहेत, त्याचप्रमाणे स्वसंरक्षणाचे धडे तळागाळातील, खेड्यांमधील गावांमध्ये सर्व प्रकारच्या महिलांना दिले गेले पाहिजेत. महिलांना या सर्व घटनांनकडे पहाण्याचा नवा दृष्टीकोन द्यायला हवा. ‘मला काय त्याचे ?, ज्यांच्या संदर्भात घडले ते पहातील काय करायचे ते !’ या मानसिकतेतून बाहेर पडून एक महिला या नात्याने उपरोक्त घटनांकडे बघायला स्त्रियांनी शिकले पाहिजे. ‘आयटीआय’प्रमाणेच प्रत्येकच शिक्षणसंस्था, शाळा, सर्व प्रकारची महाविद्यालये यांमध्ये मुलींना शारीरिक शिक्षणासह स्वसंरक्षणाचे धडे देणे अत्यंत आवश्यक आहे, तरच ‘हर घर दुर्गा’ हे अभियान यशस्वी होईल.

या प्रशिक्षणाने महिलांमध्ये प्रतिकार करण्याची मानसिक, शारीरिक क्षमता निर्माण होईलही; मात्र अन्यायाविरुद्ध प्रतिकार करण्यासाठी व्यक्तीमध्ये आध्यात्मिक बळ असणेही तितकेच किंबहुना अधिक आवश्यक आहे. या लढ्यात टिकून रहाण्यासाठी केवळ शारीरिक आणि मानसिक क्षमता असून उपयोगी नाही, तर साधनेचे म्हणजेच भक्तीचे, अध्यात्माचे सामर्थ्य अंगी असणे क्रमप्राप्त आहे. अध्यात्म अंगिकारल्याने निडरता आणि निर्भयता येऊन जे चुकीच्या गोष्टींविरुद्ध उभे ठाकण्याची मनाची सिद्धता होते. महिलांची या दृष्टीकोनातून सिद्धता करवून घेणे, हेही शासनकर्त्यांचे लक्ष्य असायला हवे. महिलांना धर्माचरण करण्यास प्रवृत्त केल्यास ‘हर घर दुर्गा ’ निर्माण व्हायला वेळ लागणार नाही !

– श्रीमती धनश्री देशपांडे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.