मनोज जरांगे यांचे १७ सप्टेंबरपासून पुन्हा उपोषण चालू होणार !
जालना – मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मराठा नेते मनोज जरांगे पाटील हे पुन्हा ‘आमरण उपोषणा’ला बसणार आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या आधी आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी त्यांनी सरकारला समयमर्यादा दिली आहे. मागण्या पूर्ण केल्या नाहीत, तर १७ सप्टेंबरपासून ते उपोषणाला प्रारंभ करणार आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाचे खासदार संदीपान भुमरे यांनी अंतरवाली सराटी येथे जाऊन मनोज जरांगे यांची भेट घेतली आहे.
के.एम्.टी. बससेवा अनंतचतुर्दशीच्या दिवशी बंद !
कोल्हापूर – मंगळवार, १७ सप्टेंबर म्हणजे अनंतचतुर्दशी या दिवशी सार्वजनिक गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीमुळे शहरातील सर्व प्रमुख रस्ते आणि बसमार्ग वाहतुकीसाठी बंद असतात. त्यामुळे अनंतचतुर्दशीच्या दिवशी सर्व मार्गांवरील के.एम्.टी. (कोल्हापूर महानगरपालिका परिवहन उपक्रम) बससेवा, तसेच सवलत पास वितरण केंद्र बंद रहाणार आहेत. बुधवार, १९ सप्टेंबर या दिवशी मुख्य मार्ग खुले होतील, त्यानुसार के.एम्.टी. बस सेवा चालू करण्यात येईल, याची सर्व प्रवासी नागरिकांनी नोंद घेऊन परिवहन उपक्रमास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
गड-दुर्गांविषयीच्या स्पर्धेत सहभाग घ्या !
पुणे जिल्हाधिकार्यांचे आवाहन !
पुणे – राज्यातील गड-दुर्ग जागतिक वारसा स्थळ नामांकन जनजागृती मोहिमेत नागरिकांना सहभागी करून घेण्यासाठी विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. याचाच भाग म्हणून गड-दुर्गांच्या ‘आर्किटेक्चरल दस्तऐवजीकरण’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. महाविद्यालय, गिरीप्रेमी आणि वास्तूविशारद संस्था यांनी या स्पर्धेत सहभाग घ्यावा. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी उपसंचालक, पर्यटन संचालनालय, पुणे आणि साहाय्यक संचालक, पुरातत्व विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने नोंदणी करावी. दस्तऐवजीकरण तसेच इतर गोष्टींसाठी जिल्ह्यातील महाविद्यालयांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. दिवसे यांनी केले आहे.
ज्ञानेश महारावांच्या विरोधात निषेध रॅली !
राजगुरुनगर (जिल्हा पुणे) – येथे सकल हिंदु समाजाच्या वतीने ज्ञानेश महारावांच्या विरोधात १५ सप्टेंबर या दिवशी निषेध रॅली काढण्यात आली. ज्ञानेश महारावांनी श्रीराम आणि श्री स्वामी समर्थ यांच्याविरुद्ध अपमानजनक विधान केल्याने त्यांचा निषेध करण्यासाठी राजगुरुनगर येथे ही रॅली काढण्यात आली. रॅलीमध्ये अनेकांनी सहभाग घेतला. नितीन वाटकर यांनी या आंदोलनात मार्गदर्शन करून ज्ञानेश महारावांना त्वरित अटक करण्याची मागणी केली, तसेच या आंदोलनाद्वारे हिंदु समाजाच्या वतीने ज्ञानेश महारावांविरुद्ध गुन्हा नोंद करण्याची मागणी करण्यात आली.