Uttarakhand Love N Land Jihad : उत्तराखंडमध्‍ये ‘लव्‍ह जिहाद’ आणि ‘लँड जिहाद’ करणार्‍यांवर कारवाई करा ! – मुख्‍यमंत्र्यांचा पोलीस आणि प्रशासन यांना आदेश

उत्तराखंडचे मुख्‍यमंत्री पुष्‍कर सिंह धामी

डेहराडून (उत्तराखंड) – उत्तराखंडमधील भाजप सरकारचे मुख्‍यमंत्री पुष्‍कर सिंह धामी यांनी ‘लव्‍ह जिहाद’, ‘लँड जिहाद’, धर्मांतर यांसारख्‍या अवैध कारवायांच्‍या विरोधात कठोर कारवाई करण्‍याचा आदेश पोलीस आणि प्रशासन यांना दिला. अलीकडे उत्तरकाशीतील पुरुला शहर, धारचुला, चमोलीतील नंदनगरसह अनेक डोंगराळ भागांत जातीय तणाव निर्माण झाला होता. उत्तराखंडमधील विविध भागांमध्‍ये लोकसंख्‍याशास्‍त्रीय पालटांच्‍या तक्रारी प्राप्‍त झाल्‍यानंतर धामी सरकारने कारवाई चालू केली आहे.

उत्तराखंड पोलिसांनी या अवैध कारवायांच्‍या विरोधात  राज्‍यव्‍यापी ‘पडताळणी मोहीम’ हाती घेतली आहे. या पडताळणी माहिमेच्‍या अंतर्गत कट्टरवादी इस्‍लामी घटकांना आश्रय दिल्‍याचा संशय असलेल्‍या भागांवर  लक्ष केंद्रित करण्‍यात आले आहे. ही मोहीम संपल्‍यानंतर लोकसंख्‍याशास्‍त्रीय पालटांविषयी निष्‍कर्ष काढण्‍यात येणार आहे, असे राज्‍याचे पोलीस महासंचालक अभिनव कुमार यांनी सांगितले. राज्‍यातील लोकसंख्‍याशास्‍त्रीय पालट आणि लव्‍ह जिहाद ही दोन्‍ही सूत्रे पोलीस प्राधान्‍याने हाताळत आहेत, असे पोलीस महासंचालकांनी सांगितले.

मुख्‍यमंत्री धामी पुढे म्‍हणाले, ‘‘देवभूमीचे मूळ स्‍वरूप कोणत्‍याही परिस्‍थितीत जपले पाहिजे. आम्‍ही यासाठी वचनबद्ध आहोत. पोलीस आणि गृह मंत्रालय या उपक्रमावर एकत्र काम करतील.’ राज्‍याशाची अखंडता कायम राखण्‍यासाठी सर्व उपाययोजना केल्‍या जातील आणि कोणत्‍याही समस्‍या सोडवण्‍यासाठी सरकार आवश्‍यक ती पावले उचलेल.’’

संपादकीय भूमिका

पोलीस आणि प्रशासन यांना असा आदेश का द्यावा लागतो ? ते स्‍वतःहून याविरोधात कारवाई का करत नाहीत ? असा आदेश दिला नाही, तर पोलीस आणि प्रशासन चुकीच्‍या गोष्‍टींवर कारवाई करणार नाहीत का ?