छत्रपती संभाजीनगर, १ सप्टेंबर (वार्ता.) – आजच्या वर्तमान परिस्थितीमध्ये महिला सुरक्षेचा प्रश्न सर्वत्र निर्माण झाला आहे. या सर्व परिस्थितीमध्ये प्रत्येक हिंदु युवतीमध्ये शौर्य निर्माण व्हावे, स्वतःच्या धर्माबद्दल अभिमान वाढावा, तसेच स्वतःचे रक्षण करण्यासाठी सिद्ध व्हावे यासाठी छत्रपती संभाजीनगर येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘युवती शौर्य जागृती प्रशिक्षण’ शिबिर पार पडले. यामध्ये २०० हून अधिक हिंदू युवती सहभागी झाल्या.
या वेळी शिबिराचा उद्देश कु. सायली पाटील यांनी सांगितला. त्यानंतर ‘हिंदु धर्माचे श्रेष्ठत्व’ या विषयावर हिंदु जनजागृती समितीच्या सौ. छाया देशपांडे यांनी या वेळी मार्गदर्शन केले. महिलांची सद्यःस्थिती, युवतींनी करावयाची पूर्व सिद्धता, सोशल मिडिया हाताळतांना घ्यावयाची काळजी, तसेच भारताचा शौर्यशाली इतिहास या विषयावर हिंदु जनजागृती समितीच्या मराठवाडा संघटक कु. प्रियांका लोणे यांनी मार्गदर्शन केले, तसेच स्वसंरक्षणाची प्रात्यक्षिकेही दाखवण्यात आली.
शिबिरातील युवतींचे मनोगत
१. कु. पल्लवी राजे – स्वतःचे रक्षण कसे करायचे ? हे समजले.
२. कु. रोशनी तोंडे – ‘आजूबाजूला काही घडले, तर मी त्याला आता तोंड देऊ शकते’, हा विश्वास माझ्यामध्ये निर्माण झाला आहे.
३. कु. प्राजक्ता कुसुमकर – हे स्वसंरक्षण प्रशिक्षण शिकून मी इतरांना जागृत करू शकते. येथे येऊन मला पुष्कळ आनंद झाला.
४. सौ. अपर्णा उत्तरवार – येथे मी माझ्या लहान मुलीला घेऊन आले आहे. हिंदु संस्कृती आपण समजून घेतली पाहिजे. आता मी माझ्या मुलीलाही याविषयी आतापासूनच सिद्ध करण्यासाठी प्रयत्न करेन.
५. कु. सेजल मंत्री – मुलींनी आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यासमवेत स्वसंरक्षण प्रशिक्षणही घेणे आवश्यक आहे.