भारतातील अन्नधान्य विषयक विषमता दूर करणे आणि देशातील जनतेच्या अन्नधान्य विषयक गरजा भागवण्यासाठी वर्ष १९६८ पासून हरितक्रांतीला प्रारंभ झाला. यामध्ये कृषी क्षेत्रातील विविध पिकांच्या संकरित अशा अत्याधुनिक जातींचा शोध लावून नवनवीन बियाणी विकसित करण्यात आली. या क्रांतीने कृषी क्षेत्राला नवसंजीवनीच प्राप्त करून दिली. या हरितक्रांतीमुळे गव्हासारख्या अन्नधान्याची होणारी आयात थांबून उलट भारतातून निर्यात व्यापार वृद्धींगत झाला. कृषी क्षेत्राचा झालेला हा विकास आणि कायापालट देशाच्या विकासात मोठे योगदान देणारा ठरला. या क्रांतीमुळे देशातील भूकबळींचेही प्रमाण उणावले. भारताला ‘कृषीप्रधान देश’ संबोधले जाते. देशाच्या अर्थव्यवस्थेत कृषी क्षेत्राचे महत्त्वाचे योगदान ठरले आहे. असे असतांनाच आताच्या घडीला कृषी क्षेत्राची स्थिती मात्र काहीशी चिंताजनक असल्याचे स्पष्टपणे जाणवत आहे. यातील एक मुख्य कारण, म्हणजे गेल्या काही वर्षांत कृषी क्षेत्रातून प्रचंड प्रमाणात उत्पन्न मिळवण्यासाठी रासायनिक खतांचा झालेला बेसुमार वापर ! सद्य:स्थितीत ‘शेतामध्ये रासायनिक खतांचा वापर नाही, तर शेतीच नाही’, अशी मानसिकता झाली आहे. एकेकाळी केवळ सेंद्रिय खतांवर आणि घटकांवर होणारी शेती आता रासायनिक खतांविना पुढे पाऊल टाकूच शकत नाही.
जसे हरितक्रांतीत संकरित बियाण्यांच्या शोधामुळे उत्पादनात प्रचंड वाढ झाली, तसेच आता शेतात रासायनिक खतांच्या वापरामुळे शेती उत्पन्नात ४ पटींनी अधिक वाढ झालेली दिसून येत आहे. रासायनिक खतांमुळे उत्पादनात प्रचंड वाढ होत असली, तरी ‘ते एक विषच आहे’, हे विसरून चालणार नाही. कोणतेही कारण नसतांना नानाविध प्रकारच्या आजारांनी मानवी जीवनात अगदी बिनदिक्कतपणे आणि अलगदपणे प्रवेश केला आहे. कृषी क्षेत्रातील रासायनिक खतांचा बेसुमार वापर, हेच मानवी जीवनात विविध रोगांसाठी कारणीभूत असल्याचे दिसून येत आहे. ज्या ठिकाणी रासायनिक खतांचा वापर अधिक प्रमाणात केला जात आहे, अशा शेती उत्पादकांनाही या खतांचे दुष्परिणाम ठाऊक आहेत. त्यामुळे असे शेतकरी स्वतःच्या कुटुंबासाठी लागणारे धान्य, भाजीपाला यांसाठी मात्र खतांचा वापर अल्प करतात, हे काही शेतकरी खासगीत सांगतात.
कृषी उत्पन्न वाढवण्यासाठी वरदान ठरलेली रासायनिक खते आता मानवासाठी काळ ठरली आहेत; मात्र याचा कुठेही गांभीर्याने विचार केला जात नाही. ‘स्वातंत्र्योत्तर काळानंतर घडलेल्या कृषी क्षेत्रातील हरितक्रांतीला हीच क्रांती अभिप्रेत होती का ?’, असा प्रश्न सध्याच्या घडीला पडल्यावाचून रहात नाही. याचा गांभीर्याने विचार करणार कोण ? आणि कधी करणार ? हा मात्र यातील अनुत्तरित राहिलेला प्रश्न आहे.
– श्री. राजाराम परब, कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग.