१५ ऑगस्ट १९४७ या दिवशी काय घडले ?

स्वातंत्र्यदिनाचे वृत्तांकन !

रात्रभर शहरात फिरून स्वातंत्र्याचा आनंद व्यक्त करणारे सर्वजण आपापल्या घरी पोचले आहेत. आता सर्वांना त्यांना प्रतीक्षा होती ती वर्तमानपत्रांची ! या स्वातंत्र्यसोहळ्याचे वर्णन त्यांनी कसे केले असेल ? मात्र आज वर्तमानपत्र जरा विलंबानेच आले; कारण प्रत्येकाला मध्यरात्रीची बातमी छापायची होती. प्रत्येकाने आज ८ ‘कॉलम’चा (स्तंभांचा) मथळा दिलेला होता.

१. देहलीच्या ‘हिंदुस्थान टाइम्स’चे शीर्षक होते, ‘India Independent : British Rule Ends.’

२. कोलकाता येथील ‘स्टेट्समन’ने शीर्षक दिले होते, ‘Two Dominions are Borne.’

३. मुंबईच्या ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने शीर्षक दिले होते, ‘Birth of India’s Freedom.’

४. कराचीतून निघणार्‍या ‘डॉन’ने लिहिले होते, ‘Birth of Pakistan – an Event in History.’

५. देहलीच्या ‘हिंदुस्थान’ ने भला मोठा मथळा छापला, ‘शताब्दियों की दासता के बाद, भारत में स्वतंत्रता की मंगल प्रभात.’ – श्री. प्रशांत पोळ

श्री. प्रशांत पोळ

देहली व्हॉईस रिगल पॅलेस येथील शपथविधीचा कार्यक्रम !

देहली येथील ‘व्हॉईस रिगल पॅलेस’ हे पूर्वीच्या ‘व्हॉईसरॉय’ लोकांचे निवासस्थान होते; आज मात्र ते ‘गव्हर्नमेंट हाऊस’ झालेले आहे. भारताचे पहिले गव्हर्नर जनरल लॉर्ड माउंटबॅटन येथेच शपथ घेणार होते. या ‘गव्हर्नमेंट हाऊस’चे भले मोठे सभागृह आजच्या प्रसंगासाठी सज्ज झाले होते. ९ वाजता औपचारिक कार्यक्रमास प्रारंभ झाला. चांदीच्या तुतारीने कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. त्यानंतर शंखध्वनी झाला. या ‘व्हॉइसरॉय हाऊस’ने त्याच्या जीवनात प्रथमच तुतारीचा आवाज आणि शंखध्वनी ऐकला होता. नवीन मुख्य न्यायाधीश सर हरिलाल जयकिशनदास कनिया यांच्यासमोर कडक पोशाखातील माउंटबॅटन उभे राहिले. त्यांनी ‘बायबल’चा मुका घेऊन शपथेचा उच्चार केला. या वेळी विविध मंत्री, काँस्टीट्युएंट (मतदार) असेंब्लीचे सदस्य, आणि अधिकारी यांनी दरबार भरून गेलेला होता. नेहमी अशा प्रसंगी उपस्थित रहाणारे राजे – महाराजे मात्र अनुपस्थित होते. – श्री. प्रशांत पोळ

१५ ऑगस्ट १९४७ या दिवसाच्या काढलेल्या या चित्रात नवी देहलीतील ‘रसीना हिल’च्या आसपास भारताच्या स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करण्यासाठी रसिकांची गर्दी जमली होती. भारत यंदा ७८ वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे…

अशी होती स्वातंत्र्यदिनाची पहाट !

आज भारत झोपलेलाच नाही. देहली, मुंबई, कोलकाता, मद्रास, बेंगळुरू, लखनऊ, इंदूर, पाटणा, बडोदा, नागपूर अशी किती नावे घ्यायची ! अक्षरशः आदल्या रात्रीपासून देशाच्या कानाकोपर्‍यात जल्लोष आहे. या पार्श्वभूमीवर कालच्या आणि आजच्या पाकिस्तानमध्ये दिसून आलेला निरुत्साह मात्र डोळ्यांत भरत आहे.

देहली येथे तिरंगा फडकावल्यावर मनोहारी दृश्य दिसणे !

देहली येथील इंडिया गेटजवळील मैदानाच्या ठिकाणी सार्वजनिकरित्या तिरंगा फडकावण्याचा एक भव्य कार्यक्रम आयोजित केला होता. लोकांनी मैदान खच्चून भरले होते. पावसामुळे काही ठिकाणी चिखल होता; पण लोकांना त्याचे काहीच वाटत नव्हते. उत्साह आणि जल्लोष शिगेला पोचला होता. दुपारी साडेचार वाजता जवाहरलाल नेहरू यांनी तिरंगा फडकावला. नुकताच पाऊस पडून गेलेला होता आणि तिरंगा आकाशात वर वर जात असतांनाच तिरंग्याच्या मागे सुंदर इंद्रधनुष्य दिसू लागले. अक्षरशः मंत्रमुग्ध व्हावे, असे दृश्य ! माउंटबॅटन एकटक हे दृश्य बघतच राहिले. – श्री. प्रशांत पोळ

राष्ट्रध्वजासह भगवा ध्वज उभारणारे क्रांतीवीर विनायक दामोदर सावरकर !

सकाळपासून तात्याराव (विनायक दामोदर सावरकर) काहीसे खिन्न होते. त्यांनी काहीही खाल्लेही नाही. ही खंडित भारताची भावना त्यांना आतवर दुखावून गेली होती. ‘अत्यंत दुर्बल लोकांच्या हाती आपण देश सोपवतो आहोत’, असे त्यांना मनापासून वाटत होते. तरीही स्वातंत्र्याचा आनंद होता. ते स्वातंत्र्य, ज्याच्यासाठी काळ्या पाण्याच्या दोन – दोन शिक्षा भोगल्या. १५ वर्षांची स्थानबद्धता भोगली. समुद्राच्या अथांग पाण्यात उडी टाकली. अंदमानातील ती काळी कोठडी सहन केली. कोल्हूच्या चरकातून तेल काढले…होय… ते स्वातंत्र्य..!

हिंदु महासभेचे अनेक कार्यकर्ते तात्यारावांना भेटायला आले होते. त्या सर्वांच्या उपस्थितीत क्रांतीवीर विनायक सावरकरांनी दोन ध्वज उभारले. एक भगवा, अखंड हिंदुस्थानाचं प्रतीक म्हणून आणि दुसरा भारताचा राष्ट्रध्वज तिरंगा ! दोन्ही ध्वजांना पुष्प अर्पित करून तात्याराव काही वेळ स्तब्ध उभे राहिले. – श्री. प्रशांत पोळ


१. हिंदु-मुसलमान तणाव नसणे

कोलकाता शहरही रात्रभर जागे होते. लोकांना स्वातंत्र्याचा अनुभव पुरेपूर घ्यायचा होता; मात्र मोठा चमत्कारिक पालट शहरात जाणवत होता. कुठेही ‘हिंदु – मुसलमान’ तणावाचा लवलेश नव्हता. अवघ्या २ – ३ दिवसांपूर्वीपर्यंत जे हिंदु आणि मुसलमान एकमेकांच्या नरडीचा घोट घेण्याच्या मागे होते, तेच आता गळ्यात गळे घालून फिरत होते.

२. सिंगापूर येथे स्वातंत्र्यानंतरचा पहिला दिवस आणि तेथे गायले गेलेले राष्ट्रगीत !

भारतात सकाळचे ८.३० वाजले, तर सिंगापूर येथे सकाळचे ११ वाजले आहेत. ऑर्चर रोड, वाटरलू स्ट्रीट, सेरंगून रोड येथे भारतीय समुदायाने भारताच्या स्वातंत्र्याप्रीत्यर्थ मोठमोठे ध्वजवंदनाचे कार्यक्रम ठेवले होते. या कार्यक्रमासाठी राष्ट्रगीत कुठले असेल ? याविषयी संभ्रम होता; म्हणून सिंगापूरच्या भारतियांनी पुढील गीत राष्ट्रगीत म्हणून म्हणण्यास प्रारंभ केला.

सुधा, सुख चैनकी बरखा बरसे भारत भाग हैं जागा ।
पंजाब, अवध, गुजरात, मराठा द्रविड़, उत्कल, बंगा ।
चंचल सागर, विन्ध हिमाला ।
नीला जमुना गंगा तेरे नित गुण गाये ।
तुझसे जीवन पायें सब तन पाये आशा ।
सूरज बनकर जग पर चमके भारत भाग हैं जागा ।।
जय हो, जय हो, जय हो, जय जय जय जय हो ।।

३. गांधींचे प्रसारण जगभर ऐकले जाणार असतांनाही त्यांनी ‘माझ्याजवळ कसलाच संदेश नाही’, असे माध्यमांना सांगणे

सकाळी ९ वाजता भारत शासनाच्या ‘सूचना आणि प्रसारण मंत्रालया’चे अधिकारी त्यांची उपकरणे घेऊन गांधीजींची प्रतिक्रिया घेण्यास आलेले होते; मात्र गांधीजींचे उत्तर सपाट होते. ते म्हणाले, ‘माझ्याजवळ सांगण्यासारखे काहीच नाही.’ परत जेव्हा त्यांना आग्रह केला, तेव्हाही त्यांचे उत्तर तसेच, ‘‘माझ्याजवळ कसलाच संदेश नाही. हे बरं दिसणार नसेल, तर तसं..!’’ काही वेळाने बी.बी.सी.च्या प्रतिनिधींनाही त्यांनी तेच उत्तर दिले. खरेतर त्यांचे प्रसारण जगभर ऐकले जाणार होते.

४. गांधींनी लिहिलेली पत्रे !

सकाळी ८ वाजता गांधीजींनी त्यांची ब्रिटीश मैत्रीण मिस अगाथा हेरीसन हिला सूत कताई करता करता पत्र लिहिले. त्यात त्यांनी गमतीने लिहिले की, तू राजाजींद्वारे (राज्यपाल राजगोपालचारी) पाठवलेले पत्र मिळाले. अर्थात् राजाजींना ते स्वतः येऊन देणे शक्यच नव्हते; कारण काल रात्रीपासून त्यांच्या गव्हर्नर हाऊसमध्ये सर्वसामान्य माणसे इंग्रजांचे घर पहायला आली आहेत.

यानंतर गांधीजींनी बंगालच्या नवनियुक्त मंत्र्यांना पत्र लिहिले. यात प्रामुख्याने त्यांनी त्यांची आवडती तत्त्वे ‘सत्य, अहिंसा आणि नम्रता’ यांचे पालन करण्याचा आग्रह केला. सत्तेविषयी गांधींनी चेतावणी देतांना म्हटले, ‘लक्षात ठेवा, सत्ता भ्रष्ट करते. विसरू नका, तुम्ही गरिबांची सेवा करण्यासाठी येथे आलेला आहात.’

५. बंगालचे नवनियुक्त गव्हर्नर आणि गांधी यांची भेट

सकाळी १० वाजता बंगालचे नवनियुक्त गव्हर्नर चक्रवर्ती राजगोपालाचारी, गांधींना भेटण्यासाठी आले. भेटताच राजाजींनी म्हटले, ‘‘बापू, अभिनंदन ! तुम्ही कोलकात्यात अक्षरशः जादू केलीत.’’ यावर गांधी म्हणाले, ‘‘पण मी समाधानी नाही. जोपर्यंत ते दंग्यांनी होरपळलेल्या आपापल्या घरांमध्ये परत जात नाहीत, तोपर्यंत काही झाले आहे’, असे वाटतच नाही.’

६. देहलीत स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या दिवशी आनंद, कुतूहल, उत्साह, जल्लोष अशा संमिश्र भावना सर्वांमध्ये असणे

सकाळी १०.३० वाजता अधिकृतरित्या भारताचा राष्ट्रध्वज म्हणून ‘अशोक चक्रांकित तिरंगा’ फडकावण्याचा शासकीय कार्यक्रम होता. ‘व्हॉइस रिगल पॅलेस’मधून शपथ घेतलेले सर्व मंत्री, वरिष्ठ अधिकारी आणि काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते कौन्सिल हाऊसकडे येत होते.  कार्यक्रम साधाच होता. टेकडीवर असलेल्या गोलाकार आकाराच्या कौन्सिल हाऊसच्या अवतीभवती मोठ्या संख्येने लोक जमा झाले होते. स्वतंत्र भारताचे नागरिक होते हे सर्व ! इंग्रजांच्या काळात सामान्य भारतियाला येथे प्रवेश नव्हता. आता मात्र तसे नाही; म्हणून आनंद, कुतूहल, उत्साह, जल्लोष या सर्व भावनांच्या संमिश्र गोंधळात ही माणसे ‘वन्दे मातरम्’च्या घोषणा देत होती. काय करू अन् काय नाही, असे त्यांना झालेले होते. इतक्यात जवाहरलाल नेहरू आले. त्यांच्यासमवेत मंत्रीमंडळाचे सहकारीही होते. एडविन लुटीयन्स आणि हर्बर्ट बेकर यांनी बांधलेल्या टेकडीवरच्या या कौन्सिल सभागृहात प्रथमच तिरंगा फडकावला जात होता. अजून राष्ट्रगीत निश्चित झालेले नसल्याने लोकांनी ‘वन्दे मातरम्’चा जयजयकार करून आसमंत दणाणून टाकला होता.

७. पंजाब येथील हिंदु-शीख यांनी मुसलमानांच्या आक्रमणांना घाबरून घरदार सोडून पलायन करणे !

लाहोर येथील डी.ए.व्ही. कॉलेजच्या परिसरात आणि हॉस्टेलमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने संचालित केलेले ‘पंजाब साहाय्यता समिती’चे शरणार्थी शिबिर होते. ‘लाहोर मेडिकल कॉलेज’मधील स्वयंसेवक डॉक्टर, विद्यार्थी, महिला डॉक्टर आणि परिचारिका २० खाटांचे रुग्णालय चालवत होत्या. पश्चिम पंजाबमधून हिंदु आणि शीख त्यांचे घर, गृहस्थी, शेती-वाडी, दुकाने, कारखाने यांच्यावर पाणी सोडून सर्वस्व गमावलेल्या अवस्थेत शिबिरात पोचत होते. रात्रीपासून संपूर्ण हिंदुस्थान स्वातंत्र्याचा सोहळा साजरा करत असतांना पश्चिम पंजाबमथील परिस्थिती पुष्कळ भयंकर झालेली होती. हिंदु-शिखांचे अनेक जथ्थे कसाबसा आपला जीव वाचवून शिबिरात पोचत होते. त्या सर्वांच्या कथा अक्षरशः सुन्न करणार्‍या आणि प्रचंड चीड आणणार्‍या होत्या. अनेकांच्या बहिणी-बायका यांना मुसलमान गुंडांनी उचलून नेले होते, तर काहींच्या बायकांनी विहिरीत उड्या टाकल्या होत्या.

८. मुसलमानांना सुरक्षित राहू देण्याविषयी गांधी मंत्रीमंडळाला पत्र लिहित असतांनाच मुसलमान गुंडांनी संघ स्वयंसेवकाची भर रस्त्यात चाकूने भोसकून हत्या करणे

प्रतिदिन दुपारी दीड वाजता कुलवंत सिंह लाहोर येथील या रुग्णालयातील रुग्ण, आधुनिक वैद्य, परिचारिका यांच्यासाठी जेवणाचा डबा आणत असे. हे जेवण लाहोरच्या ‘भाटी गेट’ या हिंदु परिसरात संघाचे काही स्वयंसेवक सिद्ध करत होते; मात्र ३ – ४ दिवसांपासून तेही कठीण होत होते. एकदा ‘अडीच वाजले, तरी कुलवंत सिंह का आला नाही ?’, म्हणून त्याला बघायला दीनदयाल हा स्वयंसेवक गेला. दीनदयाल हा संघाच्या एका भागाचा कार्यवाह होता. अर्ध्या वाटेत जाताच भर रस्त्यात कुलवंत सिंह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला त्याला दिसला. शेजारीच त्याची दुचाकी आडवी पडली होती आणि तिला बांधलेल्या डब्यांमधून भाजीच्या रश्श्याचे ओघळ त्याच्या पसरलेल्या रक्तात मिसळले जात होते.

देहलीत मंत्र्यांच्या शपथविधीचा कार्यक्रम चालू असतांना बेलियाघाट कोलकात्यात गांधी ‘मुसलमानांना सुरक्षित राहू द्या’, असे पत्र मंत्रीमंडळाला लिहित होते; पण त्याच वेळी लाहोरमध्ये घायाळ झालेल्या हिंदू – शीख रुग्णांना जेवण पोचवणार्‍या संघ स्वयंसेवकाला मुसलमान गुंडांनी भर रस्त्यात चाकूने भोसकून ठार मारले होते.

९. स्वातंत्र्यकाळात अनेक ठिकाणी हिंदूंवर आक्रमणे होऊनही हिंदु – मुसलमान ऐक्याचा संदेश देणारे आणि मुसलमानांना त्रास न देण्यास सांगणारे मुसलमानप्रेमी गांधी !

कोलकाता (बेलीयाघाट) येथे संध्याकाळी साडेपाच वाजता गांधीची आजची सायं प्रार्थना ही बेलियाघाटमधील राश बागान मैदानात आयोजित केलेली होती. गांधीजींची स्वतंत्र भारतातील पहिली सायं प्रार्थना होती. त्यामुळे लोक मोठ्या प्रमाणात येतील, हा अंदाज होता. ‘पायी मैदानात जाणार’, असा गांधीजींचा हट्ट होता. ३० सहस्र लोकांनी मैदान अगदी गच्च भरलेले होते. त्यामुळे गांधीजींना मैदानातील व्यासपिठापर्यंत पोचण्यास २० मिनिटे लागली.

प्रार्थना आणि थोडी सूत कताई झाल्यावर गांधीजी बोलू लागले, ‘काल मी जे बोललो, तेच परत सांगतो. तुम्हा कोलकातावासीय हिंदु- मुसलमान यांचे अभिनंदन ! तुम्ही अशक्य ते शक्य करून दाखवले. आता मुसलमानांना मंदिरात प्रवेश द्या आणि हिंदूंना मशिदीत प्रवेश म्हणजे हे ऐक्य अधिक मजबूत होईल. मी कुठे कुठे मुसलमानांना त्रास दिल्या गेल्याच्या बातम्या ऐकत आहे. लक्षात घ्या, कोलकाता आणि हावडा येथे एकाही मुसलमानाला त्रास होता कामा नये.’

गांधीजींनी आदल्या मध्यरात्री राजभवनात घडलेल्या एका प्रसंगाचा उल्लेख केला. ते म्हणाले, ‘‘काही लोकांना वाटते की, स्वातंत्र्य मिळाले म्हणजे आपल्यावरचे सर्व निर्बंध संपले. आपण कसेही वागू शकतो; पण हे योग्य नाही. भल्या पहाटे राजभवनात जे काही झाले, ते पुष्कळ दुर्भाग्यपूर्ण होते. आपण सर्वांनी या स्वातंत्र्याचा नीट उपयोग केला पाहिजे. जे युरोपीयन भारतातच रहातील, त्यांच्याशी आपण तोच व्यवहार केला पाहिजे, जो आपल्याला त्यांच्याकडून अपेक्षित होता.’’

१०. स्वातंत्र्यानंतर मोठी आव्हाने पेलण्यासाठी दूरदृष्टीच्या नेतृत्वाच्या हाती देश सोपवला जाणे आवश्यक होते !

अनेक वर्षांचा अंधःकार संपवून देश परत एकदा स्वतंत्र झाला होता. मागील अनेक पिढ्यांच्या गुलामगिरीने काहीशी निबर झालेली मानसिकता पालटण्याचे मोठे आव्हान समोर होते. विभाजन झालेले आहे; पण ते कुठल्याही निकषांवर नाही. ‘महंमद अली जीनांनी मुसलमानांसाठी पाकिस्तान बनवले’, असे म्हटले, तर नवीन निर्माण झालेल्या पाकिस्तानपेक्षा अधिक मुसलमान भारतात आहेत. आंबेडकरांनी आग्रह केलेली जनसंख्येच्या अदलाबदलीची योजनाही काँग्रेसने फेटाळून लावली. देशाच्या अनेक भागांत धार्मिक विद्वेषाचा अक्षरशः वणवा पेटला. तो अधिक पसरेल, अशीही चिन्हे आहेत.

काश्मीरचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही. मोठा भूभाग असलेले निझामाचे संस्थान आजही हिंदुस्थानात समाविष्ट झालेले नाही आणि ते हिंदूंचा छळ करत आहे. गोवा अजूनही पोर्तुगिजांच्या पारतंत्र्यात आहे. पाँडिचेरी, चंदननगर हिंदुस्थानात परत आलेले नाहीत. नेहरूंच्या हट्टामुळे ‘नॉर्थ वेस्ट फ्रंटियर प्रोव्हिन्स’ आपण गमावून बसलो आहोत. आज स्वातंत्र्याचे स्वागत करतांना हे चित्र पाहिले की, छाती दडपते. हे सर्व भूभाग नसल्याने, संरक्षणदृष्ट्या, सामरिकदृष्ट्या आपण पुष्कळ दुर्बल झालेलो आहोत. नेतृत्वाच्या दुबळेपणाने आणि दूरदृष्टी नसल्याने देशाच्या भविष्यासमोर प्रश्नचिन्हच उभे आहे. देश स्वतंत्र होऊन एका नव्या युगात प्रवेश करत असतांना या सर्व प्रश्नांची मालिका समोर फेर घालून नाचत आहे. एखाद्या बळकट, दमदार आणि दूरदृष्टीच्या नेतृत्वाच्या हाती देश सोपवला, तरच या देशाचे भविष्य उज्ज्वल होईल, हे नक्की !

– श्री. प्रशांत पोळ, राष्ट्रचिंतक, अभियंता आणि लेखक, जबलपूर, मध्यप्रदेश.

(साभार : ‘ते पंधरा दिवस (मराठी)’ या पुस्तकातून)