अमेरिकेतील विलियम जेनकिन्स याने वर्ष १६५२ मध्ये एका प्रवचनामध्ये म्हटले, ‘पाण्यापेक्षा रक्त हे अधिक दाट असते.’ याचा भावार्थ ‘कौटुंबिक नाते हे नेहमीच अधिक घट्ट असते’, असा आहे. हा विचार आता एक म्हण झाली असून त्याचा व्यापक प्रमाणात अर्थ घेतल्यास समविचार समुदाय हे विषम समुदायांपेक्षा अधिक सुसंवाद साधणारे असतात. सध्या जगाचे २०० राष्ट्रांमध्ये विभाजन झालेले असून विशेषतः इस्लाम धर्मीय ५७ राष्ट्रे आहेत. या मूलतत्त्ववादाविषयी सुसंस्कृत राष्ट्रांचा काहीही आक्षेप नाही, तसेच तथाकथित उदारमतवादी, लोकशाही किंवा साम्यवादी राष्ट्रांना या सांप्रदायिक आणि हिंसाचाराला प्रोत्साहन देणार्या राष्ट्रांविषयी कोणताही आक्षेप नाही. उलट ही सर्व राष्ट्रे या आदीम समाज असलेल्या राष्ट्रांची संपत्ती आणि त्यांचा धर्म पाळण्याविषयी त्यांच्यामध्ये असलेले ऐक्य यांमुळे लांगूलचालन करत आहेत.
१. देशातील बहुसंख्य लोकांचा धर्म हाच देशाचा धर्म !
राष्ट्रामधील बहुतांश लोकांमधील समानता किंवा एकजीवता यांसाठी एखाद्या राष्ट्राला अधिकृत धर्म असण्यामध्ये काहीही चुकीचे नाही. ‘एखाद्या देशाने एखाद्या विशिष्ट धर्माशी निष्ठा राखू नये’, हे मूर्खपणाचे वाटेल. ज्या देशामध्ये देशातील लोकांचा अधिकृत असलेला एक धर्म हा देशाचा धर्म आहे, त्यांच्यावर कोणतेही आभाळ कोसळलेले नाही. आपल्या देशाच्या राज्यघटनेमध्ये निहित केलेली लोकशाहीची तत्त्वे या कथानकाला जोरदार पाठिंबा देतात. खरे म्हणजे राज्यघटनेची अधिकृत मूळ प्रत हिंदु धर्मातील गीता, रामायण आणि महाभारत या ग्रंथातील व्यंगचित्रातून सजवली गेली आहे. वर्ष १९४७ मध्ये पाकिस्तानची निर्मिती हीसुद्धा धर्माच्या आधारावर करण्यात आली आणि भारतात रहाणार्या ९५ टक्के मुसलमानांनी त्या वेळी त्याला पाठिंबा दर्शवला. त्यामुळे काही मुसलमान नेते ‘आम्ही धर्माच्या आधारावर भारताची फाळणी करण्यास विरोध केला’, असे म्हणत आहेत, त्याला काही आधार नाही. उर्वरित ५ टक्के मुसलमानांपैकी काही जणांनी पाकिस्तानच्या निर्मितीला विरोध केला, तर काही जण तटस्थ राहिले; परंतु ही एक घटना भारतात रहाणार्या बहुसंख्य हिंदूंना भारत हे ‘छद्म धर्मनिरपेक्ष राष्ट्र’ रहावे कि ठामपणे ‘हिंदु राष्ट्र’ म्हणून घोषित व्हावे ? हे ठरवण्यापासून वंचित करू शकत नाही.
२. निधर्मीपणामुळे हिंदु आणि राष्ट्र विरोधी अपप्रकारांना मोकळे रान मिळणे !
याही पुढे जाऊन पाहिले, तर फाळणी झाल्यानंतर ७ दशकांहून अधिक काळ झाला. असे असूनही एका बाजूला हिंदु आणि दुसर्या बाजूला मुसलमानांच्या नेतृत्वाखालील विरोधी पक्ष यांच्यामधील कटुता न्यून न होता प्रचंड प्रमाणात वाढली आहे. जरी अल्पसंख्यांकांपैकी अगदी काही लोक सहअस्तित्व आणि शांततामय जीवन याला पाठिंबा देत असले, तरी या प्रश्नावर मोठ्या प्रमाणात पूर्णपणे विभाजन आहे. काही कट्टर मुसलमानांनी ‘वन्दे मातरम’ आणि ‘भारतमाता की जय’, हे म्हणण्यास नकार देण्याचे धाडस दाखवले आहे. त्याऐवजी ते ‘हमास’ या आतंकवादी गटाचे घर असलेल्या ‘पॅलेस्टाईन’ या देशाचा उदो उदो करत आहेत. अगदी अलीकडे लोकसभेत विरोधी पक्षनेते म्हणून नव्याने निवडून आलेल्या काँग्रेसचे खासदार राहुल गांधी हे हिंदु धर्मियांविषयी केलेल्या निंदेवरून हिंदु धर्माचा अवमान करण्याची भाषा बोलत आहेत, हे उघड होते. ‘इंडी’ ही विरोधी पक्षांची आघाडी सिद्ध करणार्या इतर लहान पक्षांनी राहुल गांधी यांच्या दायित्वशून्य आणि अवमान करणार्या विधानाला पाठिंबा दर्शवून स्वतःचे खरे रंग दाखवले आहेत. दुर्दैवाने राहुल गांधी आणि त्यांचे घटक पक्ष यांचा भाजपच्या नेतृत्वाखाली असलेल्या केंद्र सरकारने केवळ शब्दांतून निषेध व्यक्त करण्याऐवजी अजून ठोस असे काही केले नाही.
३. भाजपने ‘भारताला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करावे’, अशी राष्ट्र आणि धर्म प्रेमींची अपेक्षा !
खरे म्हणजे वर्ष २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत यंदाच्या वर्षीच्या निवडणुकीच्या प्रसाराच्या वेळी झालेल्या पराभवाविषयी भाजपने अधिक व्यावहारिक दृष्टीने विचार केला पाहिजे. वर्ष २०१४ मध्ये भाजपच्या नेतृत्वातील सरकार आल्यानंतर हिंदु मतदारांनी वर्ष २०१९ मध्ये भाजपला अधिक मते दिली. त्या वेळी हिंदु मतदार ‘वर्ष २०१९ मध्ये भाजपला लोकसभेत आम्ही पूर्ण बहुमत दिल्यानंतर भाजपचे सरकार धाडसीपणे देशाला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करण्यासारखा निर्णय घेईल’, अशी आशा करत होते; परंतु वर्ष २०१९ मध्ये संसदेमध्ये भाजपच्या ३०३ खासदारांचे पीक येऊनही हिंदु मतदारांना तसेच कोरडे ठेवण्यात आले. भाजपकडून मतदारांचा भ्रमनिरास झाला आणि त्यामुळे आताच वर्ष २०२४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला पाठिंबा दिला नाही, असे वाटत आहे. आता मात्र भाजपने आपण ‘सेक्युलर’ (धर्मनिरपेक्ष) असल्याचा मुखवटा सक्तीने काढून ‘भारताला हिंदु राष्ट्र घोषित करण्यासाठी जनसंघाचा मार्ग अनुसरावा’, असे राष्ट्र आणि धर्म प्रेमींना वाटते !
– अधिवक्ता (डॉ.) एच्.सी. उपाध्याय, भाग्यनगर, तेलंगाणा.