|
भिवंडी (जिल्हा ठाणे), ८ ऑगस्ट (वार्ता.) – गुजरात येथील आतंकवादविरोधी पथकाने भिवंडी परिसरातील नदी नाका भागात असलेल्या एका खोलीमध्ये धाड घालून ८०० कोटी रुपयांच्या अमली पदार्थांच्या साठ्यासह महंमद युनूस आणि महंमद आदिल या भावांना अटक केली आहे.
१८ जुलै या दिवशी गुजरात आतंकवादविरोधी पथकाने गुजरातमधील पलसाना तालुक्यातील करेली गावात एका ठिकाणी धाड घातली होती. या अन्वेषणात मुंबईतील महंमद युनूस आणि भिवंडीतील महंमद आदिल या दोघा भावांचा या धंद्यात सहभाग असल्याचे पुढे आले. या दोघांचा दुबईतून इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे आणणे आणि सोन्याच्या तस्करीतही हात असल्याचे अन्वेषणात उघड झाले. दुबईतील व्यक्तीने त्यांना ‘एम्.डी. पावडर’ या अमली पदार्थाच्या उत्पादनात साहाय्य केले होते. त्यांनी भिवंडीत अमली पदार्थ निर्माण करण्यासाठी एक खोली भाड्याने घेतली होती. भिवंडीत चालू असलेल्या या अमली पदार्थाच्या धंद्याविषयी मुंबई, ठाणे, तसेच भिवंडी पोलीस प्रशासनाला ठाऊक नसल्याचे दिसून आले आहे. या गुन्ह्यातील तिसरा साथीदार पसार आहे.