Israel Hezbollah Attack : हिजबुल्लाने इस्रायलवर केलेल्‍या हवाई आक्रमणात १२ जण ठार !

  • हिजबुल्लाचे इस्रायलवरील १० महिन्‍यांतील सर्वांत मोठे हवाई आक्रमण

  • हिजबुल्लाशी युद्ध करण्‍याची वेळ अगदी जवळ ! – इस्रायलचे परराष्‍ट्रमंत्री

तेल अविव – इराण समर्थक आतंकवादी संघटना हिजबुल्लाने गेल्‍या १० महिन्‍यांतील इस्रायलवरील सर्वांत मोठा आक्रमण केले आहे. हिजबुल्लाने गोलान हाइट्‍सच्‍या फुटबॉल मैदानात लेबनॉनमधून रॉकेट डागले. या आक्रमणात १२ जण ठार झाले, तर ३० जण घायाळ झाले आहेत. मृतांमध्‍ये बहुतांश १० ते २० वर्षे वयोगटातील मुले आहेत.

१. अमेरिकेच्‍या दौर्‍यावर असलेले इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्‍याहू (Benjamin Netanyahu) यांना आक्रमणाची माहिती मिळताच ते तातडीने मायदेशी परतले. हिजबुल्लाने आरंभी आक्रमणाचे दायित्‍व स्‍वीकारले होते; मात्र काही वेळाने त्‍याने त्‍याचे म्‍हणणे मागे घेतले.

२. इस्रायल डिफेन्‍स फोर्सने म्‍हटले आहे की, हे आक्रमण ‘फलाक-१’ रॉकेटच्‍या साहाय्‍याने करण्‍यात आले आहे. याचा वापर केवळ हिजबुल्लाकडून केला जातो.

३. काही दिवसांपूर्वी इस्रायलने दक्षिण लेबनॉनमधील टायर शहरावर आक्रमण केले होते.  यामध्‍ये हिजबुल्लाचा वरिष्‍ठ कमांडर महंमद निमाह नसीर मारला गेला. त्‍याचा सूड उगवण्‍यासाठी हिजबुल्लाने हवाई आक्रमण केल्‍याचे बोलले जात आहे.

४. इस्रायलचे परराष्‍ट्रमंत्री इस्रायल कॅट्‌झ म्‍हणाले की, हिजबुल्लाने सर्व मर्यादा ओलांडल्‍या आहेत. या आक्रमणाचे उत्तर आम्‍ही नक्‍कीच देऊ. आम्‍ही आतंकवादी संघटनेसोबतच्‍या युद्धाच्‍या अगदी जवळ आलो आहोत.


हिजबुल्ला संघटना कोण आहे?

हिजबुल्ला या शब्‍दाचा अर्थ ‘देवाचा पक्ष’ असा होतो. ही संघटना स्‍वतःला शिया मुसलमानांची राजकीय, सैन्‍य आणि सामाजिक संघटना म्‍हणून स्‍वतःचे वर्णन करते. हिजबुल्ला हा लेबनॉनमधील एक शक्‍तीशाली गट आहे. अमेरिका आणि अनेक देश यांनी याला आतंकवादी संघटना घोषित केले आहे. वर्ष १९८० च्‍या दशकाच्‍या आरंभी इस्रायलने लेबनॉन कह्यात घेतले, तेव्‍हा इराणच्‍या साहाय्‍याने ही संघटना अस्‍तित्‍वात आली. अशा प्रकारे हमास ही सुन्‍नी मुसलमानांची पॅलेस्‍टिनी आतंकवादी संघटना आहे, तर इराण समर्थित हिजबुल्ला ही शिया मुसलमानांची आतंकवादी संघटना आहे; मात्र इस्रायलच्‍या सूत्रावर दोन्‍ही संघटना एकजूट आहेत.