Jalabhishek’ At Taj Mahal : तेजोमहालय (ताजमहाल) मध्ये जलाभिषेक करण्याच्या मागणीवरील सुनावणी पुढे ढकलली !

आगरा (उत्तरप्रदेश) – येथील तेजोमहालयामध्ये (ताजमहालमध्ये) प्रमुख हिंदु सणांच्या वेळी जलाभिषेक, दूग्धाभिषेक आणि पूजा करण्याची मागणी करणार्‍या याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. या प्रकरणातील प्रतिवादी भारतीय पुरातत्व खाते (ए.एस्.आय.) आणि मुसलमान पक्ष यांच्या अधिवक्त्यांनी न्यायालयाकडे वेळ मागितला, ज्यामुळे न्यायालयाने सुनावणी पुढे ढकलली आहे. आता पुढील सुनावणी ६ मार्च या दिवशी होईल.

१. प्रतिवादी पक्षांकडून वारंवार वेळ मागून खटला लांबवण्याचा प्रयत्न केला जात आहे. प्रतिवादी हे न्यायालयाचा वेळ वाया घालवत आहेत. त्यांच्याकडे कोणतेही ठोस पुरावे नाहीत, तर पुराव्यांच्या आधारे आपण ताजमहालला ‘शिवमंदिर तेजोमहालय’ म्हणत आहोत, असा दावा याचिकाकर्त्याने केला आहे.

२. २३ जुलै २०२४ या दिवशी योगी युवा ब्रिगेडचे राज्य अध्यक्ष अजय तोमर यांनी आगर्‍याच्या न्यायालयात अधिवक्त्यांच्या माध्यमातून याचिका प्रविष्ट (दाखल) केली होती. ताजमहाल हे भगवान शिवाचे मंदिर आहे. मुघल आक्रमकांनी मंदिर पाडले आणि त्याची मुख्य रचना पालटली. याविषयीचे ठोस पुरावे उपलब्ध आहेत, असा युक्तिवाद याचिकाकर्त्याने केला. त्यांना श्रावण महिन्यात तेजोमहालयामध्ये जलाभिषेक, दूग्धाभिषेक आणि पूजा करण्याची अनुमती द्यावी, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे.

३. या प्रकरणाची सुनावणी २० जानेवारीला होणार होती; परंतु प्रतिवादी पक्षाच्या युक्तिवादावर सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे.

४. याचिकाकर्ता अजय तोमर यांनी सांगितले, प्रतिवादी पक्षाने आतापर्यंत तीनदा न्यायालयात वेळ मागून घेतला आहे. खटला प्रलंबित ठेवून न्यायालयाचा वेळ वाया घालवला जात आहे, असा आरोप तोमर यांनी केला.

५. अजय तोमर म्हणाले की, आता २६ जानेवारी या दिवशी प्रयागराज महाकुंभात तेजोमहालयाच्या मुक्तीसाठी मोहीम चालू केली जाईल. तेजोमहालय चळवळीला गती देण्यासाठी महाकुंभात जुना आखाडा, निर्वाणी आखाडा, निरंजनी आखाडा इत्यादी विविध आखाड्यांमधील प्रमुख संत आणि महामंडलेश्‍वर यांच्याकडून पाठिंब्याची पत्रे घेतली जातील.