Prayagraj Kumbh Parva 2025 : २७ जानेवारीला होणार्‍या धर्मसंसदेत ‘सनातन बोर्डा’ची ‘ब्लू प्रिंट’ निश्‍चित होणार !

प्रयागराज कुंभपर्व २०२५

(ब्लू प्रिंट म्हणजे कार्यप्रणाली)

प्रयागराज (उत्तरप्रदेश) : प्रसिद्ध कथाकार पू. देवकीनंदन ठाकूर यांच्या पुढाकाराने २७ जानेवारी या दिवशी महाकुंभपर्वात होणार्‍या धर्मसंसदेत ‘सनातन बोर्डा’ची (सनातन मंडळाची) कार्यप्रणाली (ब्लू प्रिंट) निश्‍चित करण्यात येणार आहे. या धर्मसंसदेत सनातन हिंदु धर्माचे संत, महंत, महामंडलेश्‍वर, तसेच आध्यात्मिक विभूती उपस्थित रहाणार आहेत. यासाठी संपर्क अभियान चालू करण्यात आले आहे. सनातन हिंदु धर्माचा अधिक प्रभावीपणे प्रसार करण्यासाठी एक ठोस आणि प्रभावी धोरण सिद्ध करणे, मथुरा येथील श्रीकृष्णजन्मभूमी मुक्ती, तिरूपती बालाजी देवस्थान लाडू प्रसाद भेसळ प्रकरण आणि अन्य अनेक समस्या, यांविषयी ऊहापोह करण्यात येणार आहे.

या धर्मसंसदेत संपूर्ण सनातन मंडळाची संरचना आणि त्याचे उद्दिष्ट काय असेल ?, याविषयी विचारमंथन करण्यात येईल. विशेषतः संप्रदाय, धार्मिक व्यवस्थापन आणि आध्यात्मिक कार्याच्या संदर्भात एक सुसंगत कार्यप्रणाली सिद्ध करण्याचे उद्दिष्ट आहे. यासह या धर्मसंंसदेत विविध सूत्रांवर चर्चा होईल, ज्यात सनातन हिंदु धर्माच्या सांस्कृतिक, धार्मिक आणि सामाजिक भूमिकांचाही समावेश असेल. धर्मसंसदेमध्ये पू. देवकीनंदन ठाकूर यांच्यासह धर्मगुरु, संत, महामंडलेश्‍वर आणि विचारवंत त्यांचे विचार मांडतील.