
खेड – पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत विदर्भ आणि कोकण यांचा विकास झाला नाही, हे वास्तव आहे. कोकणचा विकास आणि सिंचन यांचा अनुशेष भरून काढण्यासाठी सरकारच्या माध्यमातून प्रयत्न करणार असल्याची ग्वाही गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिली.
कोकणवासिय मित्र परिवाराच्या वतीने पिंपरी (पुणे) येथे गृहराज्यमंत्री कदम यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या वेळी गृहराज्यमंत्री कदम बोलत होते. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे माजी सदस्य सद्गुरु कदम अध्यक्षस्थानी होते. या वेळी शशिकांत चव्हाण, अण्णा कदम, माजी नगरसेवक ममता गायकवाड, प्रमोद ताम्हणकर, कॅप्टन श्रीपत कदम आदी अन्य मान्यवर उपस्थित होते.
मंत्री योगेश कदम पुढे म्हणाले, ‘‘मूळ कोकणवासी असणार्या आणि पिंपरी-चिंचवड, पुणे शहरात रहाणार्या नागरिकांनी माझा सत्कार केला आहे. त्यामुळे मी भारावलो आहे. आपल्या आशीर्वादानेच मी कोकणातून मोठ्या मताधिक्याने निवडून आलो. आता मतदारसंघाचा विकास करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. साडेतीन सहस्र कोटी रुपयांची कामे संमत केली असून, ५ सहस्र कोटी रुपयांपर्यंतची विकासकामे करण्याचा मानस आहे. कोकणातील प्रस्तावित आणि प्रलंबित धरणांची कामे करण्याविषयीचे पत्र मुख्यमंत्र्यांना दिले आहे.’’