प्रयागराज कुंभपर्व २०२५

प्रयागराज, २१ जानेवारी (वार्ता.) – महाकुंभपर्वातील सनातन संस्थेचे प्रदर्शन आणि प्रसार कार्य हे समस्त हिंदूंसाठी प्रेरणादायक आहे. सनातन धर्म परंपरा पुनरुज्जीवित करून हिंदूंना धर्मशिक्षण आणि धर्माचरण करण्यासाठी उद्युक्त् करणारे हे प्रदर्शन अन् ग्रंथसंपदा हा या महापर्वातील अत्यंत समर्पक कल्याणकारी असा वेद, तसेच धर्मग्रंथातील दिव्य संदेशच आहे, असे मार्गदर्शन पुणे जिल्ह्यातील आळंदी येथील ह.भ.प. संतोष शास्त्री महाराज यांनी येथे केले. कुंभक्षेत्री सेक्टर १९ येथे लावण्यात आलेले सनातनचे ग्रंथ पाहिल्यानंतर ते बोलत होते. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक डॉ. चारुदत्त पिंगळे यांची वंदनीय उपस्थिती लाभली.
ह.भ.प. संतोष शास्त्री महाराज म्हणाले, ‘‘सनातन संस्थेचे कार्य संपूर्ण भारतात पसरले आहे. पाश्चिमात्यांच्या अंधानुकरणाकडे भरकटत चाललेल्या युवा पिढीसाठी खर्या अर्थाने हे कार्य अत्यंत महत्त्वपूर्ण आणि आवश्यक आहे. सनातनचे युवा साधक आणि साधिका महाविद्यालयांत जाताना टिळा लावणे, बांगड्या घालणे आणि अलंकार धारण करणे यासारख्या धार्मिक कृती करतात, हे कौतुकास्पद आहे. हिंदूंचे प्रबळ आणि प्रभावी संघटन हाच धर्मांध मानसिकतेवरील एकमेव उपाय आहे. या कार्यात सहभागी होऊन संघटित होऊया.’’