|

पुणे – बांगलादेशात झालेल्या विद्यार्थी आंदोलनानंतर तत्कालीन पंतप्रधान शेख हसीना यांना पायउतार व्हावे लागले. त्यानंतर तेथे अराजक माजले आणि संपूर्ण व्यवस्था कोलमडली. यामागे केवळ या विद्यार्थी आंदोलनांचा नव्हे, तर अमेरिका, चर्च, जिहादी इस्लाम आणि चीन या ‘डीप स्टेट’मधील चार शक्तींचा छुपा पाठिंबा होता. याच ४ शक्तींकडून भारतातही नागरिकत्व कायदा, शेतकरी आंदोलनांच्या माध्यमातून अराजक माजवण्याचा प्रयत्न केला गेला. जगावर राज्य करण्याच्या हेतूने या शक्ती आज कार्य करत आहेत, तर या विरोधात हिंदु धर्माने ‘वसुधैव कुटुंबकम्’ हा उद्देश जगासमोर ठेवला. म्हणूनच या सर्व शक्ती हिंदु धर्माविरोधात एकत्र आल्या आहेत. आज भारतात हिंदु धर्म आहे; म्हणूनच ‘डीपस्टेट’ समोर भारताचे अस्तित्व टिकून आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध लेखक श्री. अभिजित जोग यांनी केले. येथील इंद्रप्रस्थ सभागृह येथे हिंदु राष्ट्र समन्वय समिती आयोजित जिल्हास्तरीय हिंदु राष्ट्र अधिवेशन पार पडले. त्या वेळी ते बोलत होते. या प्रसंगी व्यासपिठावर ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त), हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे श्री. सचिन घुले, हिंदु जनजागृती समितीचे श्री. पराग गोखले उपस्थित होते. हिंदु राष्ट्राचे ध्येय घेऊन कृतीशील होण्यासाठी १७० हून अधिक हिंदुत्वनिष्ठ आणि धर्मप्रेमी कटिबद्ध झाले. कार्यक्रमस्थळी सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये, तसेच सनातन संस्थेच्या १२३ व्या संत पू. (सौ.) मनीषा पाठक यांची वंदनीय उपस्थिती होती.

या वेळी हिंदु राष्ट्र समन्वय समितीची आवश्यकता काय आहे आणि या समितीचे पुढचे कार्य काय असेल, याविषयी श्री. सचिन घुले आणि श्री. सोमनाथ लोहट यांनी मार्गदर्शन केले.
समितीचे श्री. पराग गोखले यांनी विखुरलेल्या हिंदूंचे संघटन करण्याची आवश्यकता आणि संघटन कसे करावे, याविषयी सांगितले. महाराष्ट्र मंदिर महासंघाचे पुणे जिल्हा संयोजक ह.भ.प. दत्तात्रय चोरघे महाराज यांनी महाराष्ट्र मंदिर महासंघाने केलेल्या यशस्वी कार्याचा लढा आणि पुढील दिशा यांविषयी सर्वांना अवगत केले. डॉ. नीलेश लोणकर यांनी हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या माध्यमातून दौंड येथे केलेल्या आंदोलनाचे फलित आणि त्यातून झालेल्या संघटनाविषयी अनुभवकथन केले. समितीच्या कु. प्राची शिंत्रे आणि श्री. नीलेश शेटे यांनी समितीकडून घेण्यात येणार्या स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांच्या माध्यमातून हिंदु युवक-युवतींमध्ये शौर्य जागृतीसाठी केलेले प्रयत्न यांविषयी सांगितले. परिसंवादामध्ये ‘पुण्यात होत असलेले इस्लामीकरण आणि त्याविरोधात दिलेला यशस्वी लढा’ याविषयी अधिवक्ता मंगेश जेजुरीकर, सौ. उज्ज्वला गौड, श्री. ऋषिकेश कामथे यांनी अनुभवकथन केले. पोलीस उपअधीक्षक प्रकाश लोंढे (निवृत्त) यांनी ‘हिंदूंच्या मागण्या लोकप्रतिनिधींकडे ठेवा आणि त्यांना प्रश्न विचारा’, असे सांगितले.
बांगलादेशी घुसखोरांना रोखण्यासाठी पोलीस यंत्रणा सबळ करा ! – ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त)

वर्ष १९५० मध्ये बांगलादेशात २६ टक्के हिंदू शिल्लक होते. आज ८ टक्क्यांंहून अल्प आहेत. पाकिस्तानमध्ये तर १ टक्क्याहून अल्प हिंदू आता शिल्लक आहेत. अनेक घटनांमुळे १-२ टक्के हिंदू भारतात आले आणि बाकी मारले गेले, धर्मांतरित झाले. त्याउलट आज केवळ महाराष्ट्रात ४० लाखांहून अधिक बांगलादेशी घुसखोर आहेत. ‘बॉर्डर सिक्युरिटी फोर्स’ (सीमा सुरक्षा दल) त्यांचे काम नीट करत नाही. आसामसारख्या राज्यांची परिस्थिती अशी आहे की, पुढील निवडणुकीत तेथील मुख्यमंत्री बांगलादेशी घुसखोर होईल, अशी शंका व्यक्त केली जात आहे. एकीकडे एका अभिनेत्याच्या घरात चोर घुसला, तर १०० पोलिसांची यंत्रणा जोमाने कामाला लागते; परंतु घुसखोरीविषयी स्थानिक पोलीस यंत्रणा संवेदनशून्यता दाखवत आहेत. बांगलादेशी घुसखोरी रोखण्यासाठी आता पोलीस यंत्रणेला सबळ करण्याची आवश्यकता आहे. आज भारतात साम्यवादी विचारसरणीचे लोक, तथाकथित पुरोगामी, काही एन्.जी.ओ. (स्वयंसेवी संस्था), रझा अकादमी यांसारख्या जिहादी संघटना विविध मार्गांनी देशाला पोखरण्याचे षड्यंंत्र रचत आहेत. यांना रोखण्यासाठी सशक्त कृती करायला हवी.
हिंदु राष्ट्रासाठी खारीचा नव्हे, तर सिंहाचा वाटा उचलण्यासाठी सिद्ध व्हा ! – सद्गुरु स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था

बहुसंख्य हिंदूंच्या देशात हिंदूंनाच हिंदु राष्ट्राची मागणी करावी लागणे दुर्दैवी आहे. भारत हे हिंदु राष्ट्रच होते; परंतु आज ते पुन्हा स्थुलातून स्थापन होण्यासाठी संघटित व्हायला हवे. महाराष्ट्रात लव्ह जिहाद विरोधी कायदा होण्यासाठी सहस्रो हिंदूंचे मोर्चे निघाले; पण कायदा झाला नाही. ‘केरळ स्टोरी’ झाली, तशी ‘महाराष्ट्र स्टोरी’ होण्याची वाट पहात आहोत का ? मंदिरांचे उत्पन्न सरकारकडे जाते; पण अन्य धर्मियांच्या प्रार्थनास्थळांचे सरकारीकरण होत नाही. भारतातील हिंदूबहुल ठिकाणे हिंदू अल्पसंख्य झाली आहेत. पशू-पक्षी, मानव अन् सूक्ष्मातील सूक्ष्म जिवाच्या उद्धाराची व्यवस्था असलेले हिंदु राष्ट्र स्थापन करण्यासाठी सिंहाचा वाटा उचलायला हवा.
हिंदु राष्ट्रासाठी कार्य करतांना साधना करा ! – पू. (सौ.) मनीषा पाठक, सनातन संस्था
आपण सर्वांनी हिंदु राष्ट्रासाठी कार्य करतांना साधनेचे प्रयत्न आवश्यक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी कुलस्वामिनी आई भवानीची उपासना करत हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. कोणत्याही कार्यात ‘साधना’ हा पाया असायला हवा. हिंदु राष्ट्राचे कार्य करतांना ईश्वराचे चैतन्य ग्रहण करण्यासाठी साधनाच करायला हवी.
सर्वधर्मसमभाव नव्हे, सर्व ‘हिंदु समभाव’ बाळगा ! – सौ. उज्ज्वला गौड, संस्थापक अध्यक्षा, रणरागिणी महिला विचार मंच आणि भाजपच्या पुणे शहर महिला मोर्चा सरचिटणीस

पुण्यात अनेक ठिकाणी राजरोसपणे मजारी निर्माण केल्या जात आहेत. शनिवारवाडा परिसरातील वसंत चित्रपटगृहाच्या पार्किंगमध्ये ३ मजारी निर्माण करण्यात आल्या. आई जिजामाता साहेबांच्या वास्तव्याने पुनित झालेल्या लाल महाल परिसरात आज मजारी झाल्या, उद्या मजारींचे दर्गे होतील, त्यानंतर मशिदी होतील. हे रोखण्यासाठी आम्ही पुढे आलो आणि तिथल्या अनधिकृत मजारी काढून टाकल्या. देवभूमी आळंदी येथे चिंबळी ग्रामपंचायतीने ठराव करूनही ४७ गुंठे परिसरात मशीद उभी केली जात आहे. या घटनांना कोण रोखणार ? हिंदु बांधवांनो, सर्वधर्मसमभाव नव्हे, सर्व ‘हिंदु समभाव’ बाळगा ! अन्य धर्मियांकडून केल्या जाणार्या अनधिकृत बांधकामांविरोधात आता आवाज उठवा, कृतीशील व्हा !
‘हलाल जिहाद’ विरोधात जागृती करून हलालचे षड्यंत्र हाणून पाडण्याचे आवाहन !

हलाल जिहादविषयी बोलतांना रणरागिणी शाखेच्या कु. क्रांती पेटकर म्हणाल्या की, आज हलाल प्रमाणपत्राच्या माध्यमातून इस्लामी राष्ट्र स्थापन करण्याचे षड्यंत्र उघडपणे केले जात आहे. हलाल मांस विकणार्या खाटिकांमुळे हिंदु खाटिक रस्त्यावर आले आहेत. आज ‘हलाल’ ही संज्ञा सर्वच उत्पादनांमध्ये हलाल प्रमाणपत्र देणार्यांकडून लागू केली जात आहे. या ‘हलाल जिहाद’ला विरोध करण्यासाठी हिंदु जनजागृती समितीने ‘हलालमुक्त दिवाळी, हलाल विरोधात आंदोलन’ यांसारखे उपक्रम घेतले आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. यातून जागृती होऊन हिंदु व्यापारी आज हलाल प्रमाणपत्र नाकारत आहेत. आपण सर्वांनीही ‘हलाल जिहाद’ विरोधात जागृती करून हलालचे षड्यंत्र हाणून पाडायचे आहे.

* आरंभी श्री. सुमित खामणकर यांनी शंखनाद केला. पुरोहित श्री. जीवन जोशीगुरुजी आणि पुरोहित श्री. विपुल मांडकेगुरुजी यांनी वेदमंत्रपठण केले.
* प.पू. रामनाथजी येवले महाराज, पू. पप्पाजी पुराणिक, ह.भ.प. दत्तात्रय चोरघे महाराज, श्री. सचिन घुले, श्री. पराग गोखले यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.
* कार्यक्रमस्थळी उपस्थित सद्गुरु आणि संत यांचा सन्मान करण्यात आला. हिंदुत्वनिष्ठांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

* प.पू. रामनाथजी येवले महाराज, पू. पप्पाजी पुराणिक यांनी आशीर्वचनपर मार्गदर्शन केले, तसेच हिंदु जनजागृती समितीचे प्रेरणास्थान सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी दिलेला आशीर्वादरूपी संदेश हिंदु जनजागृती समितीचे श्री. महेश पाठक यांनी वाचून दाखवला. ‘अधिवेशनाचा उद्देश आणि हिंदु संघटनाची आवश्यकता’ या विषयावरील मार्गदर्शनानंतर उपस्थित मान्यवरांनी हिंदूंवर होणारे आघात आणि आघातांना रोखण्यासाठी करावयाची कृती यांविषयी मार्गदर्शन केले.
* परिसंवाद आणि गटचर्चा यांच्या माध्यमातून उपस्थितांचे अनुभवकथन, कार्याची पुढील दिशा आणि कृतीच्या स्तरावर करावयाच्या प्रयत्नांचे नियोजन केले. समारोपीय सत्रात सद्गुरु स्वाती खाडये, तसेच पू. (सौ.) मनीषा पाठक यांनी ‘हिंदु संघटनासाठी कार्य करतांना साधना करण्याची आवश्यकता’ याविषयी अनमोल मार्गदर्शन केले. त्यानंतर श्री. रामदास पडवळ, श्री. बसवराज बिरादर, डॉ. मोहन कदम यांनी मनोगत व्यक्त केले. अधिवेशनाचा शेवट संपूर्ण ‘वन्दे मातरम्’ म्हणून झाला.
क्षणचित्रे
१. पुण्याचे ग्रामदैवत श्री कसबा गणपति येथे श्री गणेशाच्या चरणी ‘हिंदु राष्ट्र अधिवेशन निर्विघ्नपणे पार पडावे’ यासाठी प्रार्थना करण्यात आली.
२. अधिवेशनात दीपप्रज्ज्वलन झाल्यानंतर प्रज्वलित केलेली समई पुष्कळ वेळ तेवत होती. त्यातील ज्योत अतिशय स्थिर होती.
३. या अधिवेशनात अनेक अधिवक्ते उपस्थित होते. अधिवेशनाच्या अंतर्गत अधिवक्त्यांची एक बैठक घेण्यात आली. विविध माध्यमांतून हिंदुत्वाचे कार्य करणार्या हिंदुत्वनिष्ठांना साहाय्य करण्यासाठी अधिवक्त्यांनी पुढाकार घेण्याचा निर्धार केला.
४. हिंदु राष्ट्र समन्वय समिती अंतर्गत कार्य करणारे हिंदुत्वनिष्ठ श्री. सचिन घुले, श्री. सोमनाथ लोहट, डॉ. नीलेश लोणकर आणि श्री. गणेश ताकवणे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
५. कार्यक्रमाच्या प्रारंभी आशीर्वचनपर संदेश देतांना प.पू. रामनाथ येवले महाराज यांनी हिंदु जनजागृती समितीप्रणित हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे कौतुक केले. ते म्हणाले की, हिंदु जनजागृती समिती यांसारख्या संघटना मोठ्या प्रमाणात हिंदूंच्या संघटनासाठी निःस्वार्थ भावनेने, कोणताही पक्षपात न करता कार्य करत आहेत. त्यांच्या कार्याला आमची साथ आहे. आपल्याला हिंदूंच्या गौरवशाली इतिहासाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. या इतिहासाशी प्रामाणिक राहून कार्य करायला हवे.
हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या कार्यकर्त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला



